विधानसभेच्या नोटीसीवर संजय राऊत म्हणाले, हवं तर मला तुरुंगात टाका अजूनही दौऱ्यात आहे घरी पोहोचल्यावर कळेल

शिंदे गटाला उद्देशून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सध्याचे विधिमंडळ हे ४० चोरांचे विधिमंडळ असल्याचे वक्तव्य केल्याने विधानसभेत सत्ताधारी पक्षाच्यावतीने संजय राऊत यांच्या विरोधात हक्कभंग प्रस्ताव आणण्यात आला. तसेच या हक्कभंगाच्या अनुंगाने विधानसभेच्या विशेषाधिकार समितीने राऊत यांना नोटीसही पाठविण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. यापार्श्वभूमीवर सध्या ठाकरे गटाच्या शिवगर्जना यात्रेच्या निमित्ताने पश्चिम दौऱ्यावर असलेल्या संजय राऊत यांना याबाबत विचारले असता ते म्हणाले की, मला नोटीस अद्याप मिळालेली नाही. तसेच मी सध्या दौऱ्यावर असून मी घरी आणि कार्यालयात गेल्यानंतर बघेन. मी विधिमंडळाचा आदरच करतो, असे स्पष्ट केले.

तसेच पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात शिवगर्जना यात्रेला मिळत असलेल्या मोठया प्रतिसादानंतर गद्दारांना गाडण्यासाठी जनता सज्ज झाल्याचे दिसून येत आहे. “शिवगर्जना” असे या यात्रेचे नाव आहे, ही गर्जना आमची नसून जनतेची आहे. जनतेच्या मनातील चीड आम्ही पाहात आहोत, असे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सातारा येथे सांगितले.

तसेच शिंदे गटाचे मंत्री अब्दुल सत्तार यांच्या वक्तव्याबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले, हवं तर टाका म्हणावं तुरुंगात.

शिवगर्जना संपर्क अभियानाच्या निमित्ताने खासदार संजय राऊत हे पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी साता-यात शाहू कला मंदिर सभागृहात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.यावेळी लक्ष्मण हाके, जिल्हा प्रमुख सचिन मोहिते, संजय भोसले, हर्षद कदम, बाबुराव माने, हणमंत चवरे, आदींची प्रमुख उपस्थित होते.

त्या वक्तव्यावर स्पष्टीकरण देताना संजय राऊत म्हणाले, ४० चोर ज्या पद्धतीने शिवसेनेशी बेइमानी करून पळून गेले. त्यांनी पैशाच्या जोरावर शिवसेना आणि धनुष्यबाण विकत घेण्याचा प्रयत्न केला. त्या चोरांच्या विषयी मी म्हटलं आहे. विधिमंडळ पक्ष तोच त्यांनी पक्ष फोडला. त्यामुळे विधिमंडळ पक्षाची विधिमंडळाची प्रतिष्ठा खालावल्याची खंतही असल्याची भावनाही व्यक्त केली.

खासदार संजय राऊत यांनी शिंदे सरकारसह भाजपा, मोदी, शहांसह पालकमंत्री शंभूराज देसाई त्यांच्यावर जोरदार टीका केली. मला माफी मागण्याची सवयी नाही, कारण मी कोणाच्या बापाला घाबरत नाही. शिवसेना संपली म्हणतात तीच शिवसेना आज आम्ही रस्त्यावर पहात आहोत. आता ही शिवसेना धगधगत्या मशालीचे अग्नीकुंड झाले आहे. सध्या शिवसेनेची अवस्था अजिंक्यतारा किल्ल्यासारखी झाली आहे. या किल्ल्यान छातीवर आणि पाठीवर अनेक घाव झेलले आहेत. आता शिवसेना गद्दारीचे घाव झेलत आहे. तरीही आमची शिवसेना टिकून आहे. पण कितीही काही झाले तरी शिवसेनेची बस कधीही रिकामी राहिली नाही. कायम हाऊसफुल राहिली आहे, असा विश्वासही व्यक्त केला.

तसेच संजय राऊत यांनी भाजपा खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्याबाबत बोलताना म्हणाले, साता-याच्या छत्रपतींच्या वंशजाबद्दल आम्हाला आदर आहे. पण या भाजपाला अजिबात छत्रपतींच्या बद्दल आदर नाही. पूर्वी छत्रपती पेशव्यांच्या नेमणुका करत होते आता पेशवे छत्रपतींना नेमायला लागले आहेत. छत्रपतींच्या वंशजांनी ज्या प्रकारे तडजोड केली ही कधीच मान्य होणार नाही.
उद्धव ठाकरे यांच्या बिघडलेल्या प्रकृतीचा फायदा घेऊन या पंताने आणि मिंध्याने कट रचून सरकार पाडलं. आता पुन्हा एकदा शिवसेनेचा मुख्यमंत्री आम्ही बसवून दाखवू असे आत्मविश्वासाने संजय राऊत यांनी नमूद केले.

शंभूराज देसाईं यांच्यावरही संजय राऊत यांनी टीकेची झोड उठवली जोरदार टीका केली. पाटणच्या पापाचे पित्तर असा उल्लेख करून तेथील शंभू की चंभुला शिवसेना नसती तर साधं मंत्री पदही मिळाले नसते. त्यांचे आजोबा बाळासाहेब देसाई यांनी बाळासाहेबांच्या खांद्याला खांदा लावून काम केले व शिवसेनेला ताकत दिली. महाराष्ट्रापासून मुंबई तोडणे काम चालू होते. त्यावेळी या भागातील काँग्रेस नेत्यांनी शिवसेना वाढली पाहिजे अशी भूमिका घेतली. पण ही कालची कार्टी शिवसेना संपवायला निघाली आहेत. महाराष्ट्र मोदी, शहापुढे कधीही झुकणार नाही आणि वाकणारही नाही. निवडणूक आयोग बेकायदेशीर असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने आता जाहीर केले आहे. या पुढील काळात आयोगाला चुना मळत बसायला लावणार आहोत. आगामी काळात दिल्ली आणि महाराष्ट्रात भगव्याचे राज्य येणार असल्याचेही ते म्हणाले.

About Editor

Check Also

मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, मेट्रो मार्गांच्या माध्यमातून शहरी भागांमध्ये सुरक्षित, जलद सार्वजनिक वाहतुकीस मोठी चालना २०३० पर्यंत ३०० किमीहून अधिक नवीन मार्ग सुरू करण्याचे नियोजन

राज्यातील मेट्रो प्रकल्पांची कामे वेगाने सुरू असून मुंबई, पुणे, नागपूर तसेच मुंबई महानगर प्रदेश एमएमआरडीए च्या शहरी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *