राज्यातील भाजपचे सरकार सर्वसामान्यांचे नव्हे तर धनिकांचे ‘पतंजली’बाबतचे परिपत्रक तातडीने रद्द करण्याची विखे पाटील यांची मागणी

मुंबई: प्रतिनिधी

राज्यातील भाजपचे सरकार हे सर्वसामान्यांचे नसून मूठभर धनिकांचे आहे. त्यामुळेच मुठभर धनिकांच्या फायद्यासाठी अर्थात पंतजलीची उत्पादने विकण्यासंदर्भात राज्य सरकारने शासकीय सेवा क्रेंद्रातून उत्पादने विकण्याचा निर्णय घेण्याची कृती हे स्पष्ट दर्शवित असल्याची टीका विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी करत ते परिपत्रक रद्द करण्याची मागणी केली.

हे सरकार सर्वसामान्यांचे नसून, मूठभर धनिकांचे असल्याचे आम्ही वारंवार जनतेच्या निदर्शनास आणून दिले आहे. शासकीय सेवा केंद्रातून पतंजलीची उत्पादने विकण्यासंदर्भातील परिपत्रकातून आमचे म्हणणे पुन्हा एकदा पुराव्यानिशी स्पष्ट झाले आहे.

या सरकारच्या काळात राज्यातील महिला बचत गटांच्या खच्चीकरणाचे काम सुरू झाले आहे. रोजगार हमी योजनेसारखी ग्रामीण भागात सहजपणे रोजगार उपलब्ध करून देणारी योजना या सरकारला योग्यपणे राबवता आलेली नाही. शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव देण्याचेही या सरकारला जमलेले नाही. मात्र, निवडक खासगी उद्योगपतींचा गल्ला भरून देण्याचे काम हे सरकार चोखपणे बजावते असल्याची खरमरीत टीकाही त्यांनी यावेळी केली.

या परिपत्रकाच्या माध्यमातून सरकारने विशिष्ट कंपन्यांप्रती आपले झुकते माप सिद्ध केले आहे. एकिकडे ‘मेक इन महाराष्ट्र’चा घोषा लावायचा आणि दुसरीकडे विशिष्ट कंपनीला जणू शासन मान्यता देऊन नवउद्योजकांना हतोत्साहित करायचे, असे या सरकारचे दुटप्पी धोरण आहे. विशिष्ट कंपनीची उत्पादने शासकीय सेवा केंद्रातून विकणे म्हणजे इतर उद्योगांवर विशेषतः छोट्या उद्योजकांवर मोठा अन्याय केल्यासारखेच असल्याचेही विरोधी पक्षनेत्यांनी सांगितले.

सरकारला करावयाची कामे तर या सरकारला निटपणे करता येत नाही. अनेकदा राज्य सरकारची कामे न्यायालयांनाच करावी लागत असल्याचे दिसते. असे असताना निदान जी कामे सरकारची नाहीत, ती तरी सरकारने करू नयेत, असा उपरोधिक टोलाही त्यांनी यावेळी लगावला.

About Editor

Check Also

हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, एमपीएससीच्या अनागोंदी कारभाराप्रकरणी अध्यक्ष व सचिवांची हकालपट्टी करा एमपीएससीच्या भोंगळ कारभाराला कंटाळून धाराशीव जिल्ह्यातील प्रथमेश देशमुखची आत्महत्या हा सरकारने घेतलेला बळी, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा

भाजपा सरकारच्या काळात पेपरफुटीने विद्यार्थ्यांच्या भविष्याचा खेळखंडोबा करून ठेवला आहे. पेपरफुटीने त्रस्त विद्यार्थ्यांना MPSC च्या भोंगळ कारभाराचाही …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *