अमित शाह, फडणवीस बोलले…देशमुख यांची हकालपट्टी करा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

मुंबई: प्रतिनिधी
पालघर जिल्ह्यात पोलिसांच्या साक्षीने दोन साधूंची जमावाकडून हत्या झाल्याची मॉब लिंचिंगची घटना अत्यंत धक्कादायक आणि निषेधार्ह आहे. राज्यात वारंवार कायदा सुव्यवस्थेची समस्या निर्माण होत असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी व या घटनांची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी केली.
चंद्रकांत पाटील यांनी पालघर जिल्ह्यातील साधूंच्या हत्याकांडाविषयी राज्यपाल, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना पत्र पाठवले असून त्यामध्ये वरील मागणी केली आहे.
पालघरच्या घटनेची मुख्यमंत्र्यांना सरकारी यंत्रणेकडून तातडीने माहिती मिळाली असेलच. तथापि, याविषयी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी स्वतः विचारणा केली, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आवाज उठवला आणि सोशल मीडियावरून या प्रकरणी सरकारची नाचक्की झाली. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यातील जनतेशी बोलले. या गंभीर घटनेनंतर मुख्यमंत्र्यांनी तातडीने स्वतः जनतेशी संवाद साधायला हवा होता. तरीही त्यांनी चार दिवस वेळ लावला याबद्दल त्यांनी खेद व्यक्त केला.
राज्यात गेल्या काही दिवसात गंभीर घटना घडल्या. ठाण्यात एका तरुणाला एका मंत्र्याच्या बंगल्यात नेऊन मारहाण करण्यात आली. हजारो कोटींच्या गैरव्यवहारात तपास यंत्रणांना हवा असलेल्या आरोपीला राज्याच्या गृहखात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडून लॉकडाऊनच्या काळात सवलत देण्यासाठी पत्र देण्यात आले. लॉकडाऊनमुळे संचारबंदी असताना तसेच चौकाचौकात पोलिसांचा बंदोबस्त असतानाही मुंबईत बांद्रा येथे हजारोंचा जमाव जमला. आता पालघर जिल्ह्यात पोलिसांच्या साक्षीने साधूंचे हत्याकांड झाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या घटनांबद्दल गृहमंत्री अनिल देशमुख यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करून वरील घटनांची निःपक्ष चौकशी करावी, अशी मागणी करत ठाणे येथे तरुणाच्या मारहाणप्रकरणी निःपक्ष चौकशीसाठी संबंधित मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी राजीनामा द्यावा या मागणीचा पुनरुच्चार त्यांनी केला.
साधूंच्या हत्याकांडातील गुन्हेगारांवर कठोर कारवाई करावी तसेच घटनास्थळी उपस्थित असूनही साधूंना वाचविण्यासाठी काहीही न करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांवरही कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली.

About Editor

Check Also

एमपीएससी अध्यक्ष-सचिवांच्या राजीनाम्यासाठी पुण्यात हजारो विद्यार्थ्यांचा आक्रोश मोर्चा माजी मंत्री आ. विश्वजीत कदम यांच्यासह काँग्रेस नेते पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मोर्चात सहभाग

एमपीएससी MPSC च्या परीक्षा प्रक्रियेतील कथित गैरप्रकार, अनियमितता, संशयास्पद मूल्यमापन, निकालातील गोंधळ आणि विद्यार्थ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांविरोधात एमपीएससी MPSC अध्यक्ष व …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *