नाना पटोले यांचा टोला, डॉ. मोहन भागवतांना भेटल्यानंतर वानखेडेंच्या मागे चौकशी…. समीर वानखेडेंच्या सीबीआय चौकशीचा भाजपाला एवढा त्रास का?

वादग्रस्त सरकारी अधिकारी समीर वानखेडे यांची सीबीआय चौकशी सुरु झाल्यापासून भारतीय जनता पक्षाचे नेते वानखेडेंचा बचाव करण्यासाठी सरसावले आहेत. समीर वानखेडे हे सरकारी अधिकारी असताना नागपुरमधील संघ मुख्यालयात सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांना भेटले व त्यानंतरच सीबीआय चौकशीचा ससेमिरा त्यांच्या मागे लागला आहे, हे संशयास्पद वाटते, असा खोचक टोला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी लगावला.

यासंदर्भात प्रसारमाध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, समीर वानखेडे सरसंघचालकांना भेटल्यानंतर त्यांची चौकशी सुरु होण्याची कारणं काय? ‘दाल में कुछ काला है’ असे दिसत आहे. या प्रकरणात काही ना काही लपलेले आहे, काही तरी संशयास्पद आहे, किंवा समीर वानखेडे यांच्याकडे काहीतरी अशी माहिती आहे, ज्यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भारतीय जनता पक्षाची पोलखोल ते करु शकतात. तर दुसरीकडे वानखेडे यांची सीबीआय चौकशी सुरु होताच महाराष्ट्रातील भाजपाचे नेते, उपमुख्यमंत्री फडणवीस व इतर काही मंत्री वानखेडेंच्या केसाला धक्का लावला तर पाहून घेऊ, असे म्हणत आहेत. सीबीआय, ईडी या तपास यंत्रणा तर भाजपा सरकारच्याच अखत्यारित आहेत. मग वानखेडे यांच्या सीबीआय चौकशीचा भाजपाला एवढा त्रास का होत आहे? सरकारी अधिकारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात जाणे यात काही ना काही लपलेले आहे, हा काही आरोप नाही तर असा प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक आहे.

आघाडीतील जागा वाटपाचा निर्णय मेरिटनुसार…

महाविकास आघाडीतील जागा वाटपावर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, प्रत्येक पक्षाने चाचपणी केली पाहिजे यात काही गैर नाही पण जागा वाटपाचा निर्णय हा मेरिटवरच होईल. काँग्रेस पक्षाने काही कमिट्या नेमलेल्या आहेत, सर्व बाजूंचा विचार करुन जागा वाटप होईल. मेरिटवर निर्णय झाला तर अनावश्यक चर्चा थांबेल. महाराष्ट्र हा परंपरागत काँग्रसेचा बालेकिल्ला राहिलेला आहे. काँग्रेसची भूमिका स्पष्ट असून महापुरुषांचा अपमान व संविधानाचा अपमान करणाऱ्या भाजपाला पराभूत करणे यासाठी आमचे काम सुरु आहे, असे नाना पटोले म्हणाले.

About Editor

Check Also

जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी विद्यार्थ्यांना तीन महिन्यांची मुदतवाढ शेवटची तीन महिन्यांची मुदतवाढ

२०२६-२७ या शैक्षणिक वर्षामध्ये अभियांत्रिकी, वैद्यकीय तसेच इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आरक्षित प्रवर्गातून प्रवेश निश्चित झालेल्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *