अध्यक्ष बागडे आणि काँग्रेसचे आमदार अग्रवाल यांच्यात खडाजंगी बोलण्यास संधी न दिल्याने अध्यक्षांनी दिली तंबी

नागपूर : प्रतिनिधी

पावसाळी अधिवेशनात मांडण्यात आलेल्या पुरवणी मागण्यांवर आपल्यालाही संधी द्यावी म्हणून सर्व सदस्यांच्या शेवटी काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार आणि लोकलेखा समितीचे प्रमुख गोपाळदास अग्रवाल यांनी विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे केली. मात्र अध्यक्षांनी अग्रवाल यांना परवानगी नाकारत शांत बसा नाही तर बाहेर काढेन अशी तंबी दिल्याने अग्रवाल आणि अध्यक्ष बागडे यांच्यात चांगलीच खडाजंगी झाली.

राज्य सरकारच्या विविध विभागांच्या विकास कामासाठी लागणारा अतिरिक्त निधी पुरवणी मागण्याच्या माध्यमातून मांडण्यात येतो. यावर काल सोमवार पासून विविध विभागावर चर्चा सुरु करण्यात आली असून आज सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, सार्वजनिक आरोग्य विभाग, आदिवासी विकास विभाग, महिला व बालविकास विभाग, मृद व जलसंधारण विभागावर चर्चा करण्यात येत होती. मात्र विधानसभेच्या कामकाजाचे दुपारी ४ वाजता गिलोटीन होते. त्यामुळे सर्व आमदारांना या मागण्यावरील चर्चा पूर्ण करून त्यावर मंत्यांचे उत्तर घेवून कामकाज संपवायचे होते.

मात्र सर्व आमदारांनी आपले म्हणणे मांडून झाल्यावर काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार गोपालदास अग्रवाल यांनी आपल्यालाही बोलण्याची संधी द्यावी अशी मागणी. परंतु अध्यक्ष बागडे यांनी गिलोटीन असल्याने तुम्हाला संधी देता येत नसल्याचे सांगितले. त्यावर अग्रवाल यांनी जोरजोरात ओरडत एकच संधी द्या अशी मागणी करू लागले. त्यावर पुन्हा बागडे यांनी शांत बसा, ओरडून बोलू नका नाही तर बाहेर काढेन अशी सक्त भाषेत तंबी दिली. या तंबीवर अग्रवाल यांनी कसे काय बाहेर काढता? असा सवाल अध्यक्षांना करत मी सदस्य असून मला बोलण्याची संधी मिळाली पाहिजे अशी मागणी केली.

त्यावर तुमच्या मुख्य प्रतोदांना तुम्ही आधीच नाव द्यायला का नाही सांगितले ? असा सवाल पुन्हा अध्यक्षांनी करत तुम्हाला आता संधी नसल्याचे सांगत मंत्री पंकजा मुंडे यांना चर्चेवरील उत्तर देण्यास सांगितले.

About Rajesh Salgaonkar

Check Also

जयंत पाटील यांची टीका, सत्ताधारी प्रधानांचं असं‌ समर्थन करत आहे जणू प्रधान निष्पाप मराठ्यांचा जाज्वल्य इतिहास पुसु पाहणाऱ्यांना धडा शिकवला गेला

जेव्हापासून राजीनामा झाला तेव्हापासून अनेक केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री, राज्याचे मंत्री, सत्ताधारी आमदार – खासदार धर्मेंद्र …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *