राज्यमंत्री डॉ पंकज भोयर यांचे आदेश, एसआरपीएफ प्रशिक्षण केंद्राचा सर्वंकष आराखडा तयार करावा वर्धा संदर्भात आढावा बैठक मंत्रालयात घेण्यात आल्यानंतर दिले निर्देश

राज्य राखीव पोलीस बलाचे (एसआरपीएफ) अत्याधुनिक व जागतिक दर्जाचे प्रशिक्षण केंद्र वर्धा येथे उभारण्यासाठी सर्वंकष आराखडा तयार करण्यात यावा, अशा सूचना  गृह (ग्रामीण) राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी दिल्या.

राज्य राखीव पोलीस बल प्रशिक्षण केंद्र, वर्धा संदर्भात आढावा बैठक मंत्रालयात घेण्यात आली. यावेळी राज्य राखीव पोलीस बलाचे अपर महासंचालक राजकुमार व्हटकर, पोलीस गृहनिर्माण मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक वर्मा, महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण आणि कल्याण महामंडळाच्या मुख्य अभियंता दीपाली भाईक, गृह विभागाचे उपसचिव अजित कवडे, वर्धा जिल्हाधिकारी वान्मथी सी., वर्धा पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.

राज्यमंत्री डॉ पंकज भोयर म्हणाले की, याप्रसंगी प्रस्तावित एसआरपीएफ विशेष प्रशिक्षण संस्था, वर्धा बाबत सविस्तर सादरीकरण करण्यात आले. वर्धा येथे सुमारे ३०० एकर जागेवर २ हजार प्रशिक्षणार्थी क्षमतेचे अत्याधुनिक प्रशिक्षण केंद्र उभारण्याचा प्रस्ताव आहे. या केंद्रात प्रशिक्षणार्थींसाठी शैक्षणिक व प्रशिक्षण ब्लॉक, सिम्युलेशन लॅब, परेड ग्राउंड, ड्रिल एरिया, क्रीडा व अडथळा प्रशिक्षण क्षेत्र, वसतिगृह, भोजनालय आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात, अशा सूचनाही दिल्या.

पुढे डॉ पंकज भोयर म्हणाले, त्याचप्रमाणे केंद्रात वैद्यकीय केंद्र, सेवा व युटिलिटी झोन, स्टाफ सुविधा, व्हीआयपी गेस्ट हाऊस, सभागृह, कॉन्फरन्स हॉल, अनुभव केंद्र व संग्रहालय यांचाही समावेश प्रशिक्षण केंद्रात करावा. एसआरपीएफचा इतिहास आणि परंपरा नव्या पिढीसमोर मांडणारे अनुभव या प्रकल्पाचे विशेष आकर्षण ठरावे, अशी अपेक्षाही राज्यमंत्री डॉ. भोयर यांनी व्यक्त केली.

प्रशिक्षण केंद्राची वैशिष्ट्ये

शेवटी बोलताना डॉ पंकज भोयर म्हणाले की, प्रशिक्षण केंद्राची संकल्पना ‘दगडापासून सामर्थ्याकडे’ (स्टोन टू स्ट्रेंथ) या संकल्पनेवर आधारित आहे. दगड उत्खननापासून कापणी, घडण, तावणे, स्थिरावणे, परीक्षण आणि संस्करण या प्रक्रियेतून तयार होतो. त्याच धर्तीवर भरती झालेल्या प्रशिक्षणार्थ्याला विविध टप्प्यांतून घडवून सक्षम, शिस्तबद्ध आणि कुशल पोलीस अधिकारी-कर्मचारी तयार करण्याची संकल्पना मांडण्यात आली.  वर्धा शहरापासून सुमारे १० किलोमीटर, वर्धा रेल्वे स्थानकापासून ११ किलोमीटर आणि नागपूरपासून सुमारे ७५ किलोमीटर अंतरावर ही जागा प्रस्तावित असून समृद्धी महामार्गाचीही जवळीक आहे. केंद्राचे प्रवेशद्वार किल्ल्याच्या महाद्वाराच्या धर्तीवर भव्य स्वरूपाचे असावे. मुख्य रस्ता १५ मीटर रुंदीचा असावा, तसेच संपूर्ण प्रकल्पाचा आराखडा अधिक व्यवस्थित आणि कार्यक्षम पद्धतीने अंतिम करण्यात यावा, अशा सूचनाही दिल्या.

About Editor

Check Also

क्रीडा आरक्षणासाठी ‘क्रीडा ई-प्रमाण’ प्रणालीचा लाभ घ्यावा शासकीय, निमशासकीय व इतर क्षेत्रांतील नोकरीमध्ये ५ टक्के आरक्षण

राज्याच्या क्रीडा धोरणांतर्गत शासकीय, निमशासकीय व इतर क्षेत्रांतील नोकरीमध्ये ५ टक्के क्रीडा आरक्षणाचा लाभ सुलभ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *