शिवसेना उबाठाचा सोनम वांगचुक आणि अभिजित दिपकेच्या आंदोलनाला पाठिंबा विद्यार्थी आंदोलनाला महाराष्ट्रातून पहिली राजकीय मदत शिवसेना उबाठाची, सीजेपीच्या मोर्चात सामील

जवळपास मागील १५-१६ दिवस झाले, नीट परिक्षेच्या पेपर फुटीप्रकरणी आणि विद्यार्थ्यांच्या आत्महत्ये प्रकरणी दिल्लीच्या जंतरमंतर येथे कॉकरोज जनता पार्टीचे आंदोलन आणि वातावरणीय कार्यकर्त्ये सोनम वांगचुक यांचे उपोषणाचे आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आम आदमी पार्टी, तृणमूल काँग्रेसचे खासदार, कम्युनिस्ट पक्षाचे काही पदाधिकारी आणि काही कलावंतांनी स्वतःहून पुढे येत आहेत. मात्र आतापर्यंत अनेक गोष्टीत सर्वात पुढारलेले राज्य म्हणून ओळखले जाणाऱ्या महाराष्ट्रातून मात्र पुढे जाताना कोणी दिसत नव्हते. अखेर शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोनम वांगचुक आणि अभिजीत दिपके यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत असल्याचे जाहिर केले.

प्रत्येक राजकीय पक्षांनी देशभर ह्या आंदोलनाच्या समर्थनार्थ काहीतरी करणं गरजेचं आहे. कारण जोपर्यंत देश जागा होत नाही तोपर्यंत बेफिकीर सत्ताधाऱ्यांना त्यांची जागा कळणार नाही. मी शिवसेनेतर्फे सोनम वांगचुक आणि अभिजित दिपके ह्यांच्या आंदोलनाला पाठींबा जाहीर करत असल्याचे शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

मातोश्रीवर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, सोनम वांगचूक, अभिजित दिपके आणि त्यांचे सहकारी युवक कुणासाठी लढताहेत? देशातील पालकांनी पण जागं झालं पाहिजे, हा देशाचा विषय आहे याची आठवणही यावेळी करून दिली.

उद्धव ठाकरे पुढे बोलताना म्हणाले की, अभिजित दिपके हा दिल्लीमध्ये देशातील युवकांचा आवाज उठवतोय. २० तारखेला होणाऱ्या त्यांच्या आंदोलनासंदर्भात त्याने दावा केला आहे की, ह्या आंदोलनात काही गुंड सोडून आंदोलन उधळण्याचा काहींचा प्रयत्न आहे. हे हिणकस आणि नीच वृत्तीचं लक्षण आहे अशी टीका करत नीट परीक्षेच्या पेपरफुटीचं केंद्र महाराष्ट्रातच आहे; असं म्हटल्यावर आणि मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्र द्रोह वाटू शकतो! असा उपरोधिक टोलाही यावेळी लगावला.

उद्धव ठाकरे पुढे बोलताना म्हणाले की, पालक संतापलेले आहेत. मुलांचं संपूर्ण शिक्षण आणि त्यांच्या पालकांची आयुष्यभराची संपूर्ण कमाई बरबाद झाली आहे; त्याचंही कोणाला काही पडलेलं नाही. लाखो विद्यार्थ्यांचं नुकसान होत असेल तर धर्मेंद्र प्रधान ह्यांचा राजीनामा घेऊन त्या ठिकाणी सक्षम व्यक्तीची नेमणूक केली गेली तर त्यात कमीपणा मानण्याचं कारण काय? असा उपरोधिक सवालही यावेळी केंद्र सरकारला केला.

पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, सत्ताधारी पक्षाला इतर पक्ष फोडण्यात जास्त रस आहे पण जिथे देशाचं नशीब फुटतंय, विद्यार्थी आत्महत्या करताहेत; त्यांच्याकडे लक्ष द्यायला त्यांना वेळ नाही. नीट परीक्षेचे पेपर फुटले, त्यानंतर अनेक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली, पण सरकारने त्यांच्याकडे लक्ष दिलेलं नाही अशी आठवणही यावेळी करून दिली.

शेवटी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, मी हात जोडून विनंती करतो, सोनम वांगचुकजी आपल्यासारखी माणसं देशाला हवी आहेत. हे सरकार असंवेदनशील आहे. आपल्यासारखी लोक राहिली काय किंवा राहिली नाही सरकारला काही फरक पडत नाही. तुमच्या बुद्धिमत्तेची देशाला गरज आहे, उपोषण सोडा! असे आवाहनही यावेळी केले.

About Editor

Check Also

प्रकाश आंबेडकर यांची टीका, दिल्लीतील आरक्षणविरोधी आंदोलन उच्च जातींचे वर्चस्व टिकवण्याचा प्रयत्न काँग्रेस नेतृत्वाचे मौन तितकेच निंदनीय आणि यामध्ये सामील असल्याचा संकेत

दिल्लीतील ‘आरक्षणविरोधी’ आंदोलने तथाकथित उच्च जातींकडून आपले वर्चस्व टिकवण्याचा एक उघड प्रयत्न दर्शवत असल्याचे वंचित …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *