अजितदादांच्या अपघातादिवशी भोंदू अशोक खरातच्या मोबाईलवर आर्थिक व्यवहाराचे १९ मेसेज समता पतसंस्था व्यवहारांची चौकशी करा; अंजली दमानियांची मागणी

राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाताच्या दिवशी भोंदू अशोक खरातच्या मोबाईलवर समता पतसंस्थेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात संशयास्पद आर्थिक व्यवहार झाल्याचा दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केला.

दि. २७ ते ३१ जानेवारी या कालावधीत खरातच्या मोबाईलवर “समता पतसंस्थेकडून मोठ्या प्रमाणात एसएमएस आले होते. विशेष म्हणजे, २८  जानेवारी या दिवशी तब्बल १९ मेसेज आले होते. त्याआधी २७ जानेवारीला १७  मेसेज, दि.२९ जानेवारीला १०, तर दि. ३० आणि ३१  जानेवारीला प्रत्येकी ८ मेसेज आले होते. “इतक्या मोठ्या प्रमाणावर एका दिवसात मेसेज येणे ही अत्यंत संशयास्पद बाब असून, त्या दिवशी नेमके कोणते व्यवहार झाले, या सर्व व्यवहाराची सखोल चौकशी करण्याची मागणी दमानिया यांनी केली.

नुकतीच दमानिया यांनी भोंदूबाबा अशोक खरात सोबत संपर्कात असलेल्या राजकीय नेत्यांची नावे एका सीडीआरच्या माध्यमातून जाहीर करत राजकीय खळबळ उडवून दिली होती. त्यानंतर शिवसेना (ठाकरे) पक्षाचे नेते संजय राऊत, सुषमा अंधारे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, राष्ट्रवादीचे सूरज चव्हाण यांच्यासह काही सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींनी दमानिया यांना मिळालेल्या सीडीआरवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्यांची चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यानंतर पहिल्यांदाच प्रसारमाध्यमांसमोर येत दमानिया यांनी संबधित सीडीआरबाबत आपली बाजू मांडत सुषमा अंधारेसह विरोधकांच्या टिकेला प्रत्युत्तर दिले. यावेळी सीडीआरबाबत दमानिया यांनी दावा केला की, त्यांना एका अज्ञात व्यक्तीकडून अशोक खरात यांचा कॉल डिटेल रेकॉर्ड (सीडीआर) आणि संबंधित माहिती मिळाली. ही माहिती मिळाल्यानंतर त्यांनी प्रथम त्याची सत्यता तपासली आणि त्यानंतर तात्काळ संबंधित यंत्रणांना पाठवली. “मी कोणाकडूनही बेकायदेशीर माहिती मागितलेली नाही. माझ्याकडे आलेली माहिती मी पारदर्शकपणे तपास यंत्रणांना दिली आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, या सीडीआरच्या आधारे काही राजकीय नेत्यांशी झालेल्या कॉल्सबाबतही त्यांनी भाष्य केले. एकनाथ शिंदे, चंद्रकांत पाटील, आशिष शेलार, संजय शिरसाठ, मिलिंद नार्वेकर यांच्यासह विविध पक्षांतील काही नेत्यांचे कॉल रेकॉर्ड्स आढळल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, “हा विषय राजकारणाचा नसून सत्य बाहेर आणण्याचा आहे. या प्रकरणात कोणत्याही प्रकारचे राजकारण न करता वस्तुस्थिती समोर आणावी, असे आवाहन त्यांनी केले.

दमानियांना रडू कोसळले

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांना खरात प्रकरणाशी संबधित सीडीआर कसा उपलब्ध झाला ? या विरोधकांकडून करण्यात आलेल्या आरोपांचे खंडन करताना दमानियांना पत्रकार परिषदेत अश्रू अनावर झाले. सामाजिक क्षेत्रात काम करताना आणि कोणत्याही राजकीय पक्षाच्या छत्राशिवाय लढताना किती त्रास होतो हे एकदा आरोप करणाऱ्यांनी आपल्या जागेवर येऊन पहावे ? असे आव्हान दमानिया यांनी यावेळी विरोधकांना दिले.

About Editor

Check Also

प्रकाश आंबेडकर यांची टीका, दिल्लीतील आरक्षणविरोधी आंदोलन उच्च जातींचे वर्चस्व टिकवण्याचा प्रयत्न काँग्रेस नेतृत्वाचे मौन तितकेच निंदनीय आणि यामध्ये सामील असल्याचा संकेत

दिल्लीतील ‘आरक्षणविरोधी’ आंदोलने तथाकथित उच्च जातींकडून आपले वर्चस्व टिकवण्याचा एक उघड प्रयत्न दर्शवत असल्याचे वंचित …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *