नाना पटोले यांची घोषणा,… राज्यभर ‘शर्म करो मोदी, शर्म करो’ आंदोलन सत्यपाल मलिकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना भाजपला उत्तर द्यावेच लागेल

पुलवामा घटनेच्या मागे एक मोठे षडयंत्र लपलेले आहे हे जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवरून स्पष्ट होते. सत्यपाल मलिक यांना गप्प बसण्यास का सांगितले? पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री यांनी सत्य का लपवले? पुलवामा घटनेवर मौन बाळगणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात काँग्रेस रस्त्यावर उतरुन ‘शर्म करो मोदी, शर्म करो’, बॅनरखाली उद्या सोमवारी १७ एप्रिल रोजी राज्यव्यापी आंदोलन करत आहे, अशी माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली.

यासंदर्भात बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, पुलवामा घटनेने सारा देश हादरला होता. सीआरपीएफच्या ४० जवानांना स्फोटाने उडवून देण्यात आले. एवढी मोठी घटना घडली तरी अद्याप या घटनेचे सत्य बाहेर आलेले नाही. या घटनेच्या तपासाचे काय झाले? या स्फोटात ३०० किलो RDX वापरण्यात आले. ते कुठून आले? जवानांना विमानसेवा का पुरवली नाही? गुप्तचर यंत्रणांच्या इशाऱ्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले का? पुलवामा घटना ही सरकारची चुक आहे, असे सत्यपाल मलिकांनी सांगितल्यावर त्यांना गप्प राहण्यास का सांगितले? यासह अनेक प्रश्नांची उत्तरे मोदी सरकारने दिलेली नाहीत. या अनुत्तरित प्रश्नांची उत्तरे मोदी सरकारला द्यावीच लागतील. पुलवामा घटनेवर सत्यपाल मलिक यांनी मोदी सरकारची झोप उडवल्याने या मुद्द्यावरून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा भाजपा सरकारने कितीही प्रयत्न केला तरी जनता त्यांच्या षडयंत्राला बळी पडणार नाही.

सत्यपाल मलिक यांनी पुलवामा घटनेसंदर्भात एका मुलाखतीत उपस्थितीत केलेले प्रश्न अत्यंत गंभीर व देशाच्या सुरक्षेशी संबंधित आहे. पुलवामा घटनेचे सत्य बाहेर यावे यासाठी सोमवार दिनांक १७ एप्रिल रोजी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काँग्रेस शर्म करो मोदी, शर्म करो, आंदोलनाच्या माध्यमातून जाब विचारणार आहे. या आंदोलनात जिल्ह्यातील प्रदेश पदाधिकारी, आजी-माजी आमदार, खासदार, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील पदाधिकारी, आघाडी संघटना, सेल, विभागचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहतील, असे पटोले म्हणाले.

About Editor

Check Also

प्रताप सरनाईक यांची माहिती, परवानाधारक रिक्षा व टॅक्सी चालकांसाठी १ मे पासून मराठी भाषा आवश्यक अन्यथा लायसन्स इश्यू करणाऱ्या अधिकाऱ्यावर आणि चालकावर कारवाई करणार

येत्या १ मे, महाराष्ट्र दिनापासून परवानाधारक रिक्षा व टॅक्सी चालकांना मराठी भाषा येणे आवश्यक करण्यात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *