Special Intensive Revision : महाराष्ट्रात विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला मुदतवाढ दावे-हरकतींसाठी १२ ऑक्टोबरपर्यंत मुदत, ‘अनमॅप्ड’ मतदारांकडील कागदपत्रे बीएलओ घरी जाऊन घेणार, अंतिम मतदार यादी १६ नोव्हेंबरला प्रसिद्ध होणार

मुंबई : महाराष्ट्रात सुरू असलेल्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण (SIR – Special Intensive Revision) प्रक्रियेला भारत निवडणूक आयोगाने मुदतवाढ दिली आहे. मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या विनंतीची दखल घेत आयोगाने आज झालेल्या बैठकीत दावे व हरकती दाखल करण्याची मुदत १२ ऑक्टोबर २०२६ पर्यंत वाढवली आहे. प्राप्त नोटिसा, दावे व हरकती निकाली काढण्यासाठी १० नोव्हेंबर २०२६ पर्यंतची मुदत देण्यात आली असून, महाराष्ट्राची अंतिम मतदार यादी १६ नोव्हेंबर २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

बीएलओ घरी जाऊन कागदपत्रे संकलित करणार

विशेष सखोल पुनरीक्षणादरम्यान ‘जुळणी न झालेले मतदार’ (Unmapped) किंवा ‘तार्किक विसंगती’ (Logical Discrepancies) या कारणांमुळे ज्या नागरिकांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत, अशा मतदारांच्या घरी जाऊन मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) आवश्यक कागदपत्रे संकलित करतील.

प्रत्यक्ष सुनावणीसाठी कार्यालयात जाण्याची गरज नाही

कागदपत्रांचे संकलन घरातूनच करण्यात येणार असल्याने संबंधित मतदारांना प्रत्यक्ष सुनावणीसाठी मतदार नोंदणी अधिकारी (ERO) किंवा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी (AERO) यांच्या कार्यालयात जाण्याची आवश्यकता राहणार नाही. केवळ अपवादात्मक परिस्थितीतच ऑनलाइन पद्धतीने सुनावणी घेतली जाईल. अशा सुनावणीस मतदाराच्या वतीने कुटुंबातील कोणताही प्रौढ सदस्य उपस्थित राहू शकणार आहे.

बेघर, मजूर व गरजू नागरिकांसाठी विशेष मदत कक्ष

राज्यातील बेघर नागरिक, मजूर, गरीब तसेच रात्र निवाऱ्यांमध्ये (Night Shelters) राहणाऱ्या नागरिकांना मतदार नोंदणी व मतदार यादीतील दुरुस्तीच्या प्रक्रियेत सुलभता मिळावी, यासाठी जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना (DEO) गरजेनुसार विशेष मदत कक्ष (Help Desks) आणि विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे, असे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.

About Editor

Check Also

Congress protests nationwide against the Chief Election Commissioner.

मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात काँग्रेसचे देशव्यापी आंदोलन, कारवाईची मागणी

नवी दिल्ली : कथित ‘मतचोरी’च्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची आणि अटकेची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *