उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी सुनेत्रा पवार यांच्याकडे ? राष्ट्रवादीच्या नेत्यांनी घेतली फडणवीस यांची भेट राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाची उद्या विधिमंडळात बैठक

अजित पवार यांच्या अपघाती जाण्याने त्यांच्या नेतृत्वाखालील पक्ष बिगर नेतृत्वाचा बनला. त्यापार्श्वभूमीवर पक्षाच्या नव्या नेता निवडीची बैठक राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची आणि पदाधिकाऱ्यांची होणार आहे. त्या बैठकीत पक्षाचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाच्या पक्षनेते पदाची निवड करण्यात येणार आहे. या पदासाठी अजित पवार यांच्या पत्नी तथा खासदार सुनेत्रा पवार यांची निवड करण्यात येणार असल्याची माहिती पक्षाचे कार्याध्यक्ष प्रफुल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी दिली. तसेच तत्पूर्वी या गोष्टीची कल्पना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना दिल्याचे माहिती प्रफुल पटेल यांनी दिली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल पटेल, सुनिल तटकरे, छगन भुजबळ आदी नेत्यांनी आज दुपारनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रफुल पटेल यांनी ही माहिती दिली.

यासंदर्भात प्रफुल पटेल प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले की, अजित पवार यांच्या निधनाला आज तीन दिवस पूर्ण होत आहेत. त्यामुळे पवार कुटुंबियांच्या घरी कार्यक्रम होणार आहे. तो कार्यक्रम झाल्यानंतर रात्री उशीरा किंवा उद्या सुनेत्रा पवार यांच्याशी चर्चा करून आमदारांच्या बैठकीत सर्वानुमते निवड करण्यात येणार असल्याचे सांगितले.

पुढे बोलताना प्रफुल पटेल म्हणाले की, पक्षाचे राष्ट्रीय पक्षाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात येणार आहे. त्यानंतर विधिमंडळ पक्षाच्या प्रमुख पदीही निवड करण्यात येणार आहे. त्यामुळे अजित पवार यांच्याकडे असलेले उपमुख्यमंत्री पदावर सुनेत्रा पवार यांची निवड करणे सोयीचे होणार असल्याचेही सांगितले.

प्रफुल पटेल यांच्यानंतर प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनीही सुनेत्रा पवार यांच्या निवडीसंदर्भात बैठक होणार असून त्यानंतर सुनेत्रा पवार यांचा उद्या किंवा परवा शपथविधी होणार असल्याचे सांगितले. तसेच अजित पवार यांच्याकडील मंत्री पदाचा कार्यभारही सुनेत्रा पवार यांच्याकडे तसाच सोपविला जावा अशी मागणी मुख्यमंत्र फडणवीस यांच्याकडे केल्याचे सांगितले.

दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ म्हणाले की, सुनेत्रा पवार यांची पक्षाच्या विधिमंडळ प्रमुख पदी निवड होणे आवश्यक आहे. त्यानंतर त्यांना विधिमंडळाच्या पक्ष बैठकीला उपस्थित राहता येईल आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री पदी निवड करणे शक्य होणार आहे. त्यामुळे सर्वात आधी सुनेत्रा पवार यांची विधिमंडळ पक्षाच्या प्रमुख पदी निवड करण्यात येणार असल्याचे सांगितले.

About Editor

Check Also

हर्षवर्धन सपकाळ यांची माहिती, काँग्रेसच्या नगरपालिका, नगरपंचायत उमेदवारांसाठी निवासी प्रशिक्षण शिबिर पहिल्या टप्प्यात कोकण विभागातील तीन दिवसीय निवासी शिबिर २७, २८ फेब्रुवारी आणि १ मार्च रोजी चिपळूणमध्ये

राज्यात नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका व नगर पंचायत निवडणुकांमधील काँग्रेस पक्षाच्या सर्व उमेदवारांसाठी निवासी प्रशिक्षण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *