एकनाथ शिंदे यांची स्पष्टोक्ती, धम्म म्हणजे जीवनाचा मार्ग; बुद्धांच्या विचारांतूनच समाज परिवर्तन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना 'बुद्ध रत्न' पुरस्कार प्रदान

“बौद्ध हा केवळ धर्म नसून तो एक व्यापक सामाजिक विचारसरणी आहे. तो फक्त श्रद्धेचा विषय नाही, तर परिवर्तनाची चळवळ आहे. ही केवळ धार्मिक क्रांती नसून सामाजिक आणि राजकीय क्रांती होती. बुद्धांचे विचार हे प्रवचनापुरते मर्यादित नसून आचरणासाठी आहेत असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

सम्राट अशोक जयंतीचं औचित्य साधून ठाण्यात आठव्या आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्म परिषदेचं आयोजन करण्यात आले होते. बुद्धरत्न सागर वेलफेअर फाउंडेशनतर्फे गडकरी रंगायतन येथे हा कार्यक्रम पार पडला. या वेळी मार्गदर्शन करताना एकनाथ शिंदे बोलत होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला “नमो बुद्धाय, नमो धम्माय, नमो संघाय” या मंत्रोच्चारांनी वातावरण भारावलं. भगवान गौतम बुद्ध आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून शिंदे यांनी उपस्थित भिक्खू संघ, विद्वान, विचारवंत आणि धम्मप्रेमी बांधव-भगिनींचं स्वागत केलं.
या वेळी खासदार ज्योती वाघमारे, महापौर शर्मिला पिंपळोलकर, शिवसेना प्रवक्ते राहुल लोंढे, प्रवक्ते किरण सोनावणे, तसेच विविध देशांतून आलेले भिक्खू—भन्ते रत्नप्रिय थेरो, विशुद्धारत्न महाथेरो, विनय बोधी महाथेरो, शांतीप्रिय थेरो, भंते डॉ. राजरत्न थेरो, रत्नप्रिय थेरो, तसेच बौद्ध अनुयायी उपस्थित होते.

ठाण्याच्या ऐतिहासिक वारशाचा उल्लेख करत एकनाथ शिंदे म्हणाले की, सम्राट अशोक आणि सातवाहन काळात या भूमीत बौद्ध धर्माचा मोठ्या प्रमाणात प्रसार झाला होता. कान्हेरी लेणी आणि प्राचीन सोपारा (नालासोपारा) येथील स्तूप व शिलालेख हे त्याचे पुरावे आहेत. त्यामुळे ठाण्यात ही परिषद होणं अभिमानास्पद असल्याचं सांगितलं.

धम्म परिषद ही धम्मचळवळीतील महत्त्वाची घटना असल्याचं सांगत त्यांनी आयोजक भंते रत्नप्रिय थेरो आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं कौतुक केलं. भिक्खू संघाला संघदान करण्याची संधी मिळाल्याबद्दल एकनाथ शिंदे यांनी समाधान व्यक्त करत, “संघदान ही केवळ परंपरा नसून भिक्खू संघाच्या माध्यमातून बुद्धांच्या शिकवणीप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची भावना आहे,” असं म्हणाले.

या परिषदेत एकनाथ शिंदे यांना ‘बौद्ध रत्न’ पुरस्कार देण्यात आला. या सन्मानाबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त करत, “अशा पुरस्कारांमुळे जबाबदारी वाढते आणि समाजासाठी अधिक काम करण्याची प्रेरणा मिळते,” असं सांगितलं.

महाकवी वामनदादा कर्डक यांच्या ओळी उद्धृत करत एकनाथ शिंदे यांनी “मी वादळ वारा, मी भीमपुत्र आहे… मी बुद्धांचा अनुयायी, शांतीचा दूत आहे,” असं सांगितलं. मुख्यमंत्री असताना वर्षा निवासस्थानी आयोजित केलेल्या वर्षावास, भोजनदान, धम्मदान आणि चिवरदान कार्यक्रमांचीही त्यांनी आठवण करून दिली.

एकनाथ शिंदे म्हणाले की, “बौद्ध धम्म हा दुःखातून मुक्ती देणारा मार्ग आहे. सत्य, अहिंसा आणि करूणेवर आधारित जीवनपद्धती म्हणजे धम्म,” असं सांगत धम्म हा ‘वे ऑफ लाइफ’ असल्याचं स्पष्ट केलं. १४ ऑक्टोबर १९५६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घेतलेल्या धम्मदीक्षेमुळे लाखो लोकांना समानता आणि स्वाभिमानाचा मार्ग मिळाल्याचं नमूद केलं.

पुढे बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, गौतम बुद्ध यांनी पेरलेली विचारांची बीजं दलितांच्या हृदयात रुजली, शोषितांच्या रक्तात मिसळली आणि अस्पृश्यांच्या अश्रूंमध्ये भिजली. बुद्धांनी दिलेला धम्म डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नव्या जोमाने समाजात रुजवला. बुद्धांनी दिलेला प्रकाश बाबासाहेबांनी सर्वदूर पोहोचवला आणि ज्या धम्माने जगाला शांततेचा मार्ग दाखवला, त्याच धम्माच्या आधारावर बाबासाहेबांनी दलितांना मुक्ती दिली.

पुढे बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, जगातील वाढत्या युद्धपरिस्थितीचा संदर्भ देत त्यांनी इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यातील तणावाचा उल्लेख केला. “द्वेषाने द्वेष संपत नाही, प्रेमानेच तो शांत होतो,” हा बुद्धांचा संदेश आजच्या काळात अधिक महत्त्वाचा असल्याचं सांगत “जगाला युद्ध नको, बुद्ध हवा,” असा संदेश दिला.

एकनाथ शिंदे शेवटी म्हणाले की, भौतिक सुखाच्या स्पर्धेत मानसिक शांतता हरवत चालल्याची खंत व्यक्त करत बुद्धांनी दाखवलेला मार्गच मानवतेला तारणारा आहे. “बुद्धांना मूर्तीत नव्हे तर विचारात शोधलं पाहिजे,” “न तलवार की धार से, न गोलियों की बौछार से… दुनिया बदलेगी तो सिर्फ बुद्ध के विचार से,” या ओळींनी त्यांनी भाषणाचा समारोप केला.

About Editor

Check Also

दिव्यांग विद्यार्थ्यांच्या दहावीनंतरच्या शिष्यवृत्तीमध्ये १२ वर्षानंतर भरीव वाढ राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

दिव्यांग विद्यार्थ्यांना दहावीनंतरच्या शिक्षणासाठी पाठबळ मिळेल अशारितीने शिष्यवृत्तीमध्ये भरीव वाढ करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *