गणेशोत्सवात साखर, बेसन, रवा अन् पामतेल सवलतीच्या दरात द्या मुंबई जनता दल (सेक्युलर) ची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वाढत्या महागाईने होरपळणाऱ्या मुंबईकरांना मोठा आर्थिक दिलासा देण्यासाठी ‘मुंबई जनता दल (सेक्युलर)’तर्फे राज्य सरकारकडे एक महत्त्वपूर्ण मागणी करण्यात आली आहे. पक्षाच्या शिष्टमंडळाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अधिकृत पत्र पाठवून गणेशोत्सवाच्या काळात आवश्यक असणारे किराणा साहित्य सवलतीच्या म्हणजेच अनुदानित दरात उपलब्ध करून देण्याची आग्रही विनंती केली आहे. महाराष्ट्राचा सर्वात मोठा आणि लाडका उत्सव असलेल्या गणेशोत्सवात घरोघरी मोदक, मिठाई आणि विविध फराळाचे पदार्थ बनवण्यासाठी साखर, बेसन, रवा आणि पामतेल या अन्नधान्याची व जिन्नसांची मोठ्या प्रमाणावर गरज भासते. मात्र, यावर्षी किराणा साहित्याचे आणि नित्योपयोगी वस्तूंचे भाव प्रचंड वाढल्यामुळे सर्वसामान्य आणि मध्यमवर्गीय मुंबईकरांचे बजेट पूर्णपणे कोलमडले असून, या महागाईचा मोठा फटका नागरिकांना बसत आहे. या गंभीर समस्येकडे राज्य शासनाचे लक्ष वेधत मुंबई जनता दल (सेक्युलर) यांनी सर्वसामान्य मुंबईकरांना दिलासा देण्यासाठी तातडीने पावले उचलण्याची मागणी केली.

जनता दल पक्षाने पत्राद्वारे मागणी केली आहे की, सवलतीच्या दरातील हे किराणा साहित्य सर्वसामान्य मुंबईकरांसाठी खुले असावे आणि ते सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या (रेशन दुकाने) माध्यमातून तसेच अपना बाजार, सहकारी भांडार व इतर सहकारी संस्थांच्या दुकानांमधून सहज उपलब्ध करून देण्यात यावे. गणेशोत्सव अगदी काही दिवसांवर येऊन ठेपला असल्याने, राज्य सरकारने यावर लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घेऊन घोषणा करावी, जेणेकरून सणापूर्वी हे साहित्य नागरिकांपर्यंत पोहोचू शकेल आणि लाखो सामान्य कुटुंबांना या सणाच्या काळात खूप मोठा आर्थिक दिलासा मिळेल, असा विश्वास पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. हे पत्र मुंबई जनता दल (सेक्युलर) चे अध्यक्ष सुरेंद्रकुमार बाजपेयी, कायम निमंत्रित सदस्य निलेश कंटारिया, सुहास बने व विनोधन मोरे, प्रधान महासचिव संजीवकुमार सदानंदन, खजिनदार प्रमोद खंडेलवाल, तसेच उत्तर मुंबई जिल्हाध्यक्ष सुजीत कटियार आणि उत्तर मध्य मुंबई जिल्हाध्यक्ष प्रशांत शेडगे यांच्या संयुक्त स्वाक्षरीने प्रसिद्धीस देण्यात आले आहे.

About Editor

Check Also

रुग्णालयाच्या डॉक्टर आणि कर्मचाऱ्यावर शिंदे गटाच्या शिवसैनिकांचा पुन्हा एकदा हल्लाबोल दही हंडीच्या दिवशी जखमी गोविंदाला डिस्चार्ज देण्यावरून पालघरमधील रुग्णालयातील घटना

जखमी गोविंदाला डिस्चार्ज देण्यावरून पालघरच्या रुग्णालयात रात्री उशिरा शिवसेना (शिंदे गट) कार्यकर्त्यांचा डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांशी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *