चंद्रकांत पाटील यांचे निर्देश, ट्यूशन फी, डेव्हलपमेंट फी आणि इतर शुल्काची माहिती सूचना फलक व प्रवेश माहितीपुस्तिकेत नमूद करा प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शुल्काची संपूर्ण माहिती देण्याचे महाविद्यालयांना निर्देश

उच्च शिक्षण संचालनालयाच्या अधिपत्याखालील महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश शुल्काबाबत संपूर्ण आणि अद्ययावत माहिती उपलब्ध करून देण्याचे निर्देश सर्व विभागीय सहसंचालक, उच्च शिक्षण आणि राज्य सार्वजनिक विद्यापीठांच्या कुलसचिवांना दिले आहेत, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.

मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, नुकताच उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता १२ वीचा निकाल जाहीर झाला असून, सर्व महाविद्यालयांमध्ये पदवी अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे किंवा सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर महाविद्यालयांनी विद्यापीठ किंवा शुल्क नियामक प्राधिकरण यांच्या नियमानुसार व मान्यतेनुसार आकारण्यात येणारे प्रवेश शुल्क, ट्यूशन फी, डेव्हलपमेंट फी आणि इतर शुल्क यांची अद्ययावत माहिती महाविद्यालयाच्या दर्शनी भागात सूचना फलकावर लावणे अनिवार्य करण्यात यावे, असे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच प्रवेश शुल्काबाबतची संपूर्ण माहिती शुल्कासहित महाविद्यालयाच्या प्रवेश माहितीपुस्तिकेत आवश्यक असलेल्या भागात अनिवार्यरित्या नमूद करण्यात यावी. शुल्काबाबतची माहिती आणि प्रवेश माहितीपुस्तिकेतील शुल्काबाबतची माहिती सर्व प्रवेश इच्छुक विद्यार्थ्यांना प्रवेशापूर्वी देणे ही संबंधित महाविद्यालयांची जबाबदारी राहील, असे स्पष्ट करण्यात आले.

तसेच पुढे बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, शुल्काबाबतची माहिती सूचना फलकावर आणि प्रवेश माहिती पुस्तिकेमध्ये दिसण्याबाबतची खबरदारी घेण्याची जबाबदारी संबंधित विद्यापीठ आणि संबंधित विभागीय सहसंचालक यांची राहील. सर्व विभागीय सहसंचालक आणि राज्य सार्वजनिक विद्यापीठांच्या कुलसचिवांनी बाब आपल्या अधिनस्त आणि संलग्नित महाविद्यालयांना आपल्या स्तरावरून तात्काळ सूचित करावी, असे निर्देश देण्यात आले.

शेवटी उच्च शिक्षण संचालनालयाने यासंदर्भात कोणत्याही प्रकारची तक्रार उद्भवणार नाही, याची दक्षता संबंधित महाविद्यालयांनी घ्यावी. तसेच कोणत्याही प्रकारची तक्रार उद्भवल्यास संबंधित महाविद्यालय जबाबदार राहील, असे स्पष्ट केले.

About Editor

Check Also

काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांसाठी नाशिकमध्ये १० दिवसांचे निवासी प्रशिक्षण; राहुल गांधी मार्गदर्शन करणार ! सोमवार, २४ ऑगस्ट ते २ सप्टेंबरदरम्यान शिबिर; प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह राष्ट्रीय व राज्यातील वरिष्ठ नेत्यांची उपस्थिती

काँग्रेसच्या ‘संघटन सृजन अभियान’ अंतर्गत जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षांची निवड व नियुक्ती प्रक्रियेचा भाग म्हणून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *