केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील मतदार याद्यांच्या सखोल फेरतपासणीची (SIR) घोषणा केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी समाजवादी पक्षाचे भिवंडी पूर्वचे आमदार रईस शेख यांनी महाविकास आघाडी (MVA) नेत्यांना या प्रक्रियेवर देखरेख ठेवण्यासाठी आणि पश्चिम बंगालमध्ये झालेल्या मतदार वगळण्याच्या घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी राज्यस्तरीय कृती दल (टास्क फोर्स) स्थापन करण्याचे आवाहन केले. एसआयआर प्रक्रियेमुळे तृणमूल काँग्रेसचा बंगाल मध्ये पराभव झाला होता. महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेस (सपा) चे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांना उद्देशून लिहिलेल्या पत्रात आमदार रईस शेख म्हणाले की, महाविकास आघाडीने मतदारांना मार्गदर्शन करण्यासाठी, बूथ-स्तरीय एजंटांना (बीएलए) प्रशिक्षण देण्यासाठी आणि निवडणूक आयोगाशी समन्वय साधण्यासाठी एक कार्यदल स्थापन करावी अशी मागणी एका पत्राद्वारे केली.
आमदार रईस शेख पुढे बोलताना म्हणाले की, “बिहार आणि पश्चिम बंगालमध्ये एसआयआर प्रक्रियेमुळे मोठ्या प्रमाणावर मतदार वगळले गेले, विशेषतः आदिवासी, दलित, अल्पसंख्याक आणि दुर्बल गटांमधील मतदारांना याचा फटका बसतो आहे. या प्रक्रियेमध्ये बिहारमध्ये ६८ लाख आणि पश्चिम बंगालमध्ये ९१ लाख मतदार वगळले गेले आहेत.जर विरोधी पक्षांनी वेळेवर कारवाई केली नाही, तर महाराष्ट्रालाही अशाच परिस्थितीचा सामना करावा लागू शकतो,” असा इशाराही दिला.
आमदार रईस शेख पुढे बोलताना म्हणाले की, “अलीकडेच झालेल्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत, एसआयआर प्रक्रिये दरम्यान ज्या मतदारसंघांमध्ये २५,००० पर्यंत मतदार वगळण्यात आले तेथे भाजपाने ९५ जागा जिंकल्या, तर तृणमूल काँग्रेसने ५१ जागा मिळवल्या, ज्यामुळे टीएमसीचा पराभव झाल्याचा दावाही यावेळी केला.
पुढे बोलताना आमदार रईस शेख म्हणाले की, एसआयआर (SIR) उपक्रमांतर्गत, बूथ-स्तरीय अधिकारी (BLOs) ३० जून ते २९ जुलै दरम्यान मतदारांच्या घरी भेट देतील. “मतदारांना आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणे, नवीन मतदार नोंदणीची प्रक्रिया आणि आक्षेप नोंदवण्याची प्रक्रिया समजून घेण्यासाठी मदतीची आवश्यकता असेल. मविआ आघाडीतील पक्ष एसआयआर उपक्रमाशी संबंधित प्रशिक्षण कार्यक्रम आधीच आयोजित करत आहेत. आघाडीतील सर्व पक्षांच्या बूथ-स्तरीय अधिकाऱ्यांना (BLAs) प्रशिक्षण देण्यासाठी आणि राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी व केंद्रीय निवडणूक आयोगाशी समन्वय साधण्यासाठी संयुक्त कृती दलाची आवश्यकता असल्याचेही यावेळी सांगितले.
शेवटी बोलताना आमदार रईस शेख म्हणाले की, महाविकास आघाडीने यासंदर्भात तातडीने पावले उचलली पाहिजेत. अन्यथा, सत्ताधारी पक्षाकडून होणारी मतचोरी आम्ही थांबवू शकणार नाही. प्रस्तावित राज्यस्तरीय कृती दलामध्ये आघाडीतील सर्व मित्रपक्षांच्या प्रतिनिधींचा समावेश असावा,” असेही पत्राद्वारे सांगितले.
Marathi e-Batmya