साखरेच्या दरवाढीवरून ॲड. प्रकाश आंबेडकर आक्रमक जनतेने लोकप्रतिनिधींच्या घरांसमोर आंदोलन करण्याचे आवाहन

वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शनिवार, २२ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी २ वाजता सुभेदारी गेस्ट हाऊस, औरंगाबाद येथे महत्त्वाची पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेला वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी संबोधित केले. यावेळी त्यांनी देशातील साखरेचे वाढते दर, इथेनॉल निर्मितीकडे वळवण्यात येणारी साखर व मळी, तसेच आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या परिस्थितीवर सरकारवर जोरदार टीका केली.

ॲड. प्रकाश आंबेडकर म्हणाले की, भारत यापूर्वी साखरेचा सरप्लस देश होता आणि साखर निर्यात केली जात होती. मात्र, सरकारच्या नियोजनाअभावी रॉ शुगर आणि मळी मोठ्या प्रमाणात इथेनॉल निर्मितीकडे वळवण्यात आली आहे. या कारणामुळे यावर्षी भारताला मोठ्या प्रमाणात साखर आयात करण्याची वेळ आली असून, त्याचा थेट परिणाम साखरेच्या किमतीवर होत असल्याचे सांगितले.

पुढे बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, आज साखरेचा भाव ८० रुपये आहे. येत्या १०-१२ दिवसांत तो १०० रुपयांवर जाऊ शकतो. मोदक आता गोड लागण्याऐवजी कडू लागण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे, असे ॲड. आंबेडकर म्हणाले. नवरात्र, दिवाळी यांसारखे सण जवळ येत असताना साखरेचे दर वाढल्यामुळे सर्वसामान्यांच्या सणांचा गोडवा हिरावला जात असल्याचे सांगितले.

प्रकाश आंबेडकर पुढे म्हणाले की, महाराष्ट्र देशातील साखर उत्पादनात मोठा वाटा उचलतो. या पार्श्वभूमीवर साखरेच्या दरवाढीचा फायदा काही साखर व्यावसायिकांकडून घेतला जात असल्याचा आरोप केला. रॉ शुगर आणि मळी इथेनॉल निर्मितीकडे वळवल्यामुळे देशात साखरेचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता असल्याचे सांगितले.

तसेच दरवाढीवर नियंत्रण आणण्यासाठी जनतेने आंदोलनाची भूमिका स्वीकारण्याचे आवाहन करत ॲड. प्रकाश आंबेडकर म्हणाले की, सत्तेत असलेल्या तसेच सत्तेत जाण्याच्या तयारीत असलेल्या पक्षांच्या जिल्हाध्यक्ष, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, नगरपालिका व महानगरपालिका सदस्य, आमदार आणि खासदार यांच्या घरांसमोर जनतेने निदर्शने केली पाहिजेत.

प्रकाश आंबेडकर म्हणाले की, जनतेने हे आंदोलन आपल्या हातात घेतले पाहिजे. जनता रस्त्यावर उतरली तरच साखरेतील गोडवा कायम राहील; अन्यथा कडूपणा सर्वांनाच सहन करावा लागेल,. हे व्यापक आंदोलन आहे. जनतेने सुरुवात केली तर आम्ही त्यांच्यासोबत राहू, अशी भूमिका स्पष्ट केली. सरकारच्या धोरणांविरोधात जनतेने तिरंगा घेऊन लोकप्रतिनिधींच्या घरांसमोर आंदोलन करण्याचे आवाहनही यावेळी केले.

सरकारच्या कारभारावर टीका करताना ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी सरकारला “डिक्टेटरचे सरकार” असे संबोधले. “डिक्टेटर कोणत्याही राजकीय पक्षाला किंवा नेत्याला घाबरत नाही; तो जनतेला घाबरतो. जंतरमंतरच्या आंदोलनावरून हे दिसून आले आहे,”. कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी जनतेची असल्याचे सांगत त्यांनी पोलिसांबाबतही बोलले. मालक ही जनता आहे आणि मालक ही जनता असल्यामुळे कायदा व सुव्यवस्था लागू करण्याची जबाबदारी ही जनतेची आहे, पोलिसांची नाही. पोलीस हा जनतेचा नोकर आहे असेही यावेळी सांगितले.

याशिवाय मतदार यादी आणि मोठ्या प्रमाणावर मतदार वगळले जाण्याच्या मुद्द्यावरही ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी भाष्य केले. महाराष्ट्रातील आकडेवारीचा संदर्भ देत मोठ्या संख्येने मतदार वगळले जाणार असल्याचे सांगितले.

About Editor

Check Also

डॉ अशोक उईके यांची माहिती, आंदोलनकर्त्या युवक-युवतींशी दोन दिवस सकारात्मक चर्चा वसतिगृह प्रवेशाबाबत आदिवासी विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय

आदिवासी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताला सरकारचे सर्वोच्च प्राधान्य असून वसतिगृह प्रवेशासाठी आंदोलन करणाऱ्या युवक-युवतींना विश्वासात घेऊन …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *