मुंबईतील काही सोसायट्यांना दहा टक्के पाणी कपातीचा फटका बसत आहे आणि या सोसायटीमधील नागरिकांना पाण्याचे टँकर बोलावावे लागतात. एखाद्या भागात विकास झाला नसेल, पाण्याची पाइपलाइन पोहोचली नसेल, पाण्याचे डेडिकेटेड स्त्रोत नसतील, तर टँकरने पाणी पुरवठा करणे हे समजू शकते परंतु पाणी कपात असताना या टँकरला पाणी कोठून मिळते, या टँकर लॉबीचे मालक कोण व त्यांना कोणाचा आशिर्वाद आहे, असा प्रश्न महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे वरिष्ठ प्रवक्ते अतुल लोंढे यांनी विचारला.
मुंबईतील टँकर लॉबीवर बोलताना काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते अतुल लोंढे पुढे म्हणाले की, पाणी टंचाई असतानाही टँकरमधून पाणी पुरवठा केला जातोच कसा या टँकरला पाणी मिळते कोठून? म्हणूनच तर शंका बळावते की टँकर लॉबी कोण आहे? या टँकर लॉबीचे मालक कोण आहेत? काही नगरसेवक आहेत का? नगरसेवकांच्या जवळचे कॉन्ट्रॅक्टर किंवा त्यांचे नातेवाईक आहेत का? हे सत्य पुढे आले पाहिजे. सरकार चौकशी वगैरे काही करत नाहीच पण निदान सत्य तरी पुढे आणा की हे टँकर कोणाचे आहेत आणि ते टँकरचे ज्यांचे आहेत, त्यांचे आणि नगरसेवकांचे लागेबांधे काय आहेत? मुंबईकरांना याचे उत्तर हवे आहे. मुंबई महानगरपालिका प्रशासन, बीएमसी आयुक्त व राज्य सरकार यांनी या टँकर लॉबीवर सविस्तर खुलासा करावा, अशी मागणी केली.
Marathi e-Batmya