नाशिक जिल्ह्यातील अनेक तालुक्यात द्राक्ष, बेदाणे, डाळिंब, टोमॅटो आणि कांदा या निर्यातक्षम पिकांचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन होते. पिंपळगाव बसवंत हे या उत्पादन पट्ट्याच्या मध्यभागी असून द्राक्ष निर्यातदारांचे प्रमुख केंद्र म्हणून ओळखले जाते. सध्या येथील शेतकरी आणि निर्यातदारांना किटकनाशक अवशेष तपासणीसाठी खासगी प्रयोगशाळांवर अवलंबून राहावे लागत असल्याने येथे किटकनाशक अवशेष चाचणी प्रयोगशाळा उभारण्यात येणार असल्याची माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी मंगळवारी येथे दिली.
निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत येथील कांदा आणि द्राक्ष संशोधन केंद्राच्या बळकटीकरणासोबतच राष्ट्रीय कृषि विकास योजनेअंतर्गत किटकनाशक अवशेष चाचणी प्रयोगशाळा स्थापन करण्यासाठी येणाऱ्या अडचणींचा आढावा घेण्यासाठी मंत्रालयात आज भरणे यांनी आढावा बैठक घेतली. या बैठकीत कृषी मंत्र्यांनी निर्यातक्षम कृषी मालाच्या तपासणीसाठी अत्याधुनिक सुविधा, आवश्यक मानांकन आणि सर्व सोयींनी युक्त अशी प्रयोगशाळा उभारण्याबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.
या बैठकीत प्रस्तावित प्रयोगशाळेच्या उभारणीसंदर्भातील तांत्रिक बाबी, आवश्यक पायाभूत सुविधा, मनुष्यबळ नियोजन, प्रशासकीय प्रक्रिया तसेच निधी उपलब्धतेबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. येणाऱ्या अडचणी तातडीने सोडवून पुढील कार्यवाही लवकर पूर्ण करावी, अशी सूचना भरणे यांनी यावेळी केली.
किटकनाशक अवशेष चाचणी प्रयोगशाळा सुरू झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या उत्पादनाची शास्त्रीय तपासणी स्थानिक पातळीवर होणार असून निर्यात प्रक्रियेला मोठी गती मिळेल. तसेच आंतरराष्ट्रीय मानकांनुसार गुणवत्ता सुनिश्चित होऊन शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनासाठी अधिक विश्वासार्हता प्राप्त होईल आणि जागतिक बाजारपेठेत चांगले दर मिळण्यास मदत होईल, असा विश्वासही भरणे यांनी व्यक्त केला. या बैठकीला आमदार दिलीपर बनकर, कृषी विभागाचे उपसचिव संतोष कराड, कृषी संचालक सुनील बोरकर तसेच संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
Marathi e-Batmya