प्रकाश आबिटकर यांची माहिती, आरोग्य विभागाचे प्रशिक्षण धोरण जाहीर प्रशिक्षण धोरणात आमुलाग्र बदलाने कौशल्यवृद्धीला चालना

राज्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी आरोग्य विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणावर भर देण्यात येत आहे. आरोग्य सेवा देणाऱ्या मनुष्यबळाचे ज्ञान, कौशल्य आणि दृष्टिकोन अधिक सक्षम करणे हा प्रशिक्षण धोरणाचा केंद्रबिंदू आहे. या प्रशिक्षण प्रणालीमध्ये आमुलाग्र बदल करण्यात आल्याने कौशल्यवृद्धीला चालना मिळणार असल्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी सांगितले. नुकतेच आरोग्य विभागाचे प्रशिक्षण धोरण जाहीर केल्याचेही त्यांनी सांगितले.

पुढे बोलताना प्रकाश आबिटकर म्हणाले की, प्रशिक्षण धोरणानुसार आरोग्य विभागातील सर्व स्तरांवरील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षणाची व्यवस्था करण्यात येणार असून प्रशिक्षण अधिक परिणामकारक व एकसंध करण्यासाठी राज्यातील प्रशिक्षण संस्थांना सार्वजनिक आरोग्य सेवा प्रशिक्षण संचालनालय, नागपूर यांच्या तांत्रिक व प्रशासकीय नियंत्रणाखाली आणण्यात येणार आहे. प्रशिक्षणाला केवळ प्रशासकीय बाब न मानता मनुष्यबळ विकासातील महत्वाची गुंतवणूक म्हणून या धोरणात स्थान देण्यात आले आहे. राज्यातील प्रशिक्षण व्यवस्थेत एकसूत्रता आणून आरोग्य सेवेची गुणवत्ता सुधारण्यावर भर देण्यात आला आहे.

तीन स्तरांवर प्रशिक्षणाची व्यवस्था

प्रकाश आबिटकर पुढे बोलताना म्हणाले की, राज्य आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण संस्था (SIHFW), नागपूर ही सार्वजनिक आरोग्य विभागाची नोडल प्रशिक्षण संस्था राहणार आहे. विभागीय, जिल्हा आणि तालुका स्तरावरील प्रशिक्षण व्यवस्था अधिक सक्षम करण्यात येणार असून आवश्यकतेनुसार नवीन प्रशिक्षण केंद्रेही निर्माण केली जाणार आहेत.

पदोन्नतीसाठी प्रशिक्षण अनिवार्य

प्रकाश आबीटकर म्हणाले की, नवीन कर्मचारी सेवेत रुजू झाल्यानंतर एका वर्षाच्या आत प्रारंभिक प्रशिक्षण पूर्ण करणे आवश्यक राहणार आहे. पदोन्नतीनंतरही संबंधित प्रशिक्षण पूर्ण करावे लागेल. तसेच चार ते सहा वर्षांच्या सेवेनंतर मध्य-स्तर उजळणी अभ्यासक्रम आणि दहा वर्षांनंतर प्रगत किंवा वरिष्ठ स्तरावरील प्रशिक्षणाची तरतूद करण्यात आली आहे. प्रशिक्षण सर्व पदांवरील नियमित तसेच कंत्राटी अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी अनिवार्य राहणार आहे. प्रशिक्षणास विनापरवानगी अनुपस्थित राहिल्यास प्रचलित नियमानुसार प्रशासकीय कारवाईची तरतूद करण्यात आली आहे.

कौशल्य प्रयोगशाळेत प्रत्यक्ष प्रशिक्षण

आरोग्य कर्मचाऱ्यांना केवळ पुस्तकी प्रशिक्षण न देता प्रत्यक्ष कौशल्य आत्मसात करण्यासाठी २८ दिवसांचे निवासी ‘स्किल लॅब’ प्रशिक्षणही प्रस्तावित करण्यात आले आहे. यामध्ये २० दिवस कौशल्य प्रयोगशाळेत सराव तर आठ दिवस जिल्हा रुग्णालयात प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यात येणार आहे. याशिवाय आशा, अंगणवाडी सेविका आणि आरोग्यसेविका यांच्यासाठीच्या प्रशिक्षणात राज्य व जिल्हा स्तरावरील प्रशिक्षकांचा सातत्याने सहभाग राहणार आहे.

पाच वर्षांचा प्रशिक्षण आराखडा

प्रत्येक पदाच्या प्रशिक्षण गरजांचे विश्लेषण करून पाच वर्षांची प्रशिक्षण रूपरेषा आणि वार्षिक प्रशिक्षण आराखडा तयार केला जाणार आहे. प्रशिक्षण कार्यक्रम आणि प्रत्यक्ष कामकाज यांचा समन्वय साधण्यावरही विशेष भर देण्यात आला आहे. प्रशिक्षणासाठी आवश्यक आर्थिक तरतूद सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अर्थसंकल्पातून करण्यात येणार असून हे प्रशिक्षण धोरण योजना म्हणून राबविण्यात येणार आहे.

“दर्जेदार आरोग्य सेवा देण्यासाठी सक्षम, कुशल आणि प्रशिक्षित मनुष्यबळ अत्यंत आवश्यक आहे. मानव संसाधन विकास आणि क्षमता विकासाच्या माध्यमातून आरोग्य विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढवून राज्यातील नागरिकांना अधिक गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा देण्याच्या दिशेने हे प्रशिक्षण धोरण महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे.’’ असे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी सांगितले.

“राष्ट्रीय प्रशिक्षण धोरणाच्या अंतर्गत महाराष्ट्र राज्याने आरोग्य कर्मचाऱ्यांच्या कौशल्यवृद्धीसाठी, सार्वजनिक आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी तसेच प्रशिक्षण संस्थांमध्ये एकसूत्रता आणण्यासाठी आराखडा तयार केला आहे. हे धोरण सार्वजनिक आरोग्य सेवेचा दर्जा वाढ करण्यासोबतच आरोग्य सेवा अधिक लोकाभिमुख होऊन नागरिकांचा आरोग्यसेवेवरील विश्वास वाढविण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल.” असे प्रधान सचिव, सार्वजनिक आरोग्य विभाग डॉ. निपुण विनायक यांनी सांगितले.

About Editor

Check Also

प्रकाश आबिटकर यांचे आवाहन, गरीब, गरजू रुग्णांच्या अवयव प्रत्यारोपणासाठी कॉर्पस फंडातून मदत द्यावी रुबी हॉल क्लिनिक आणि सार्वजनिक आरोग्य विभागाची बैठक

गरीब व गरजू रुग्णांच्या अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी शासकीय योजनेतील निधीपेक्षा अधिक खर्च येत असल्यास तो …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *