मुख्यमंत्री शिंदेच्या भेटीनंतर बच्चू कडू म्हणाले, जे उशीरा आले ते पहिल्या पंगतीत… राजकारणात हे चालूच असतं

काल मंगळवारी शिंदे-फडणवीस सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात डावलले गेलेले शिंदे समर्थक अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज सकाळी नंदनवन या त्यांच्या शासकिय निवासस्थानी भेट घेतली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना बच्चू कडू म्हणाले की, जे उशिरा आले त्यांना पहिल्या रांगेत बसवलं असं सूचक विधान करत आपली नाराजी व्यक्त केली.

आपण नाराज असल्याचे सांगत धोका देणाऱ्यांचं राज्य असून, धोका देईल तोच मोठा नेता असून त्याला मंत्रीपद मिळतं असं उपहासात्मक भाष्यही त्यांनी केले.

जो उशिरा आला त्याला पहिल्या पंगतीत बसवलं आणि जो पहिला गेला त्याला शेवटच्या रांगेत बसवलं आहे. पण याची काही नाराजी नाही. राजकारणात असं चालू राहतं. आम्ही तितके समजूतदार आहोत. फक्त मंत्रिपदासाठी आम्ही गेलो नव्हतो. फक्त मंत्री आहे म्हणून बच्चू कडू नाही. मंत्रीपदापेक्षा बच्चू कडू जास्त महत्त्वाचा आहे. त्यामुळे याचं जास्त दु:ख नाही अशी सारवासारवही त्यांनी यावेळी करण्याचा प्रयत्न केला.

धोका देणाऱ्यांचंच राज्य आहे. जो जास्त धोका देणार, तो मोठा नेता होणार. धोका दिल्यानेच अनेक पक्ष मोठे झाले. भाजपा, शिवसेना असो किंवा इतर कोणी, बंडखोरी सगळीकडे झाली आहे. कोणत्या पक्षात बंडखोर नाहीत? बंडखोरांचंच राज्य आहे. बंडखोरी करुन येतो त्याला सर्वात आधी मंत्रीपद मिळतं अशी उद्विग्नताही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

नाराजी नाही असं नाही, थोडी नाराजी असतेच. पण ती इतकीही नाही की, आपलं घर सोडून दुसऱ्या पक्षात निघून जाऊ. ही क्षणिक नाराजी आहे. अजून पूर्णपणे मंत्रीमंडळ विस्तार झालेला नाही. पूर्ण विस्तार झाला असता आणि संधी मिळाली नसती तर गोष्ट वेगळी असती असेही ते म्हणाले.

मी फक्त मंत्रिपदासाठी शिंदे गटाला पाठिंबा दिला नव्हता. काही मुद्द्यांच्या आधारे पाठिंबा दिला होता, जर ते मुद्दे विचारात घेतले नाही तर वेगळा विचार करु,” असा इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे. आश्वासन देण्यात आलं होतं, त्यामुळेच आम्ही मागणी करत आहोत, अन्यथा केलीही नसती असंही ते म्हणाले.

“एकनाथ शिंदे यांनी आम्ही तुम्हाला मंत्री करु असं आश्वासन देत शपथ घेतली होती. पहिल्या यादीत नाव नसेल, तर अखेरच्या यादीत तरी असेल,” अशी आशा बच्चू कडू यांनी व्यक्त केली आहे. दुसरी यादी अडीच वर्षानंतर येऊ शकते असंही त्यांनी सांगितलं. राजकारणात काहीही होऊ शकतं, इथे दोन आणि दोन चार नाही तर पाच होतात असंही ते म्हणाले.

About Editor

Check Also

एकनाथ शिंदे यांची माहिती, मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरील घाटाला मिळणार, ‘मिसिंग लिंक’: १ मेला उद्घाटन घाटातील अपघात आणि विलंबाला कायमचा ब्रेक; वेगवान आणि सुरक्षित प्रवासाने अर्थव्यवस्थेला मिळणार गती

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाला पूर्णतः ‘ऍक्सेस कंट्रोल’ बनवणाऱ्या महत्त्वाच्या ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे ९९ टक्के काम पूर्ण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *