मराठवाडा, विदर्भात भूकंपाचे धक्के जीवीत व वित्तहानी झाली नसल्याची अजित पवार यांची निवेदनाद्वारे विधानसभेत माहिती

राज्यातील हिंगोली, परभणी, नांदेड, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, वाशीम जिल्ह्यांसह मराठवाडा, विदर्भातील काही भागात बुधवारी सकाळी ७ वाजून १४ मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले असून या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ४.५ नोंदविण्यात आली आहे. भूकंपाचा केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील रामेश्वर तांडा गावाजवळ असून सौम्य स्वरूपाच्या भूकंपामुळे कुठेही जीवित किंवा वित्तहानी झाल्याची माहिती प्राप्त झाली नसल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत दिली.

विधानसभेत राज्य शासनाच्या वतीने निवेदन करताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, मराठवाडा, विदर्भातील काही जिल्ह्यात झालेल्या भूकंपाची राज्य शासनाने गंभीर नोंद घेतली असून संबंधित जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसिलदार तसेच सर्व प्रशासकीय यंत्रणांना सतर्क राहण्याचे आणि नागरिकांना आवश्यक मदत तातडीने उपलब्ध करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. नागरिकांनी घाबरुन जावू नये, मात्र सतर्क राहून बचावासाठीच्या उपाययोजनांची अंमलबजावणी करावी. गावांमध्ये ज्या घरांवर पत्र्याचे छत आहे, त्यावर आधारासाठी ठेवलेले दगड काढून टाकावेत, असे आवाहनही यावेळी केले.

अजित पवार पुढे बोलताना म्हणाले की, राज्य शासन संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या संपर्कात असून या भूकंप आणि नुकसानीसंदर्भातील अधिकची माहिती स्थानिक प्रशासनाकडून घेण्यात येत आहे.

About Editor

Check Also

संयुक्त महाराष्ट्राच्या १०६ हुतात्म्यांना नव्या प्रशासकीय इमारतीत मानाचे स्थान मिळणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मुख्य सचिवांना कार्यवाहीचे निर्देश

संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी हौतात्म्य पत्करलेल्या १०६ हुतात्म्यांचे चिरंतन स्मरण व्हावे, यासाठी महाराष्ट्र शासनाने ताब्यात घेतलेल्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *