सचिन सावंत यांचा इशारा, राहुल गांधींबद्दल मनोज जरांगेंनी वापरलेली भाषा अत्यंत निषेधार्ह, मर्यादा पाळा मनोज जरांगेंच्या भाषेने मराठा समाजाची अप्रतिष्ठा, आरक्षणाचा लढा खालच्या पातळीवर आणू नये

मनोज जरांगे यांनी लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांच्याबद्दल जी भाषा वापरली ती अत्यंत निषेधार्ह आहे. मराठा समाजाचे नेतृत्व करत असताना, ही भाषा सुसंस्कृत आणि समंजस असलेल्या मराठा समाजाला शोभणारी नाही, हे लक्षात घ्यावे. मनोज जरांगे यांच्या भाषेने मराठा समाजाची अप्रतिष्ठा होत आहे. मराठा समाजाची ही भाषा नव्हे. त्यामुळे आरक्षणाचा लढा हा मनोज जरांगे यांनी खालच्या पातळीवर आणू नये, असे खडे बोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते सचिन सावंत यांनी जरांगे यांना सुनावले आहेत.

मनोज जरांगे यांनी राहुल गांधी व काँग्रेस पक्षावर केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना सचिन सावंत म्हणाले की, मनोज जरांगे यांनी राहुल गांधी यांच्याबद्दल खालच्या दर्जाची भाषा वापरली असली तरी राहुल गांधी यांनीच जातीय जनगणनेसाठी रान पेटवले आहे आणि काँग्रेस पक्ष सत्तेवर आल्यानंतर आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवली जाईल असेही ठणकावून सांगितले आहे. कोणत्याही जातीय संघर्षाशिवाय व कोणालाही न दुखावता मराठा समाजाला आरक्षण मिळण्याचा मार्ग, हा याच ५० टक्क्यांची मर्यादा हटवण्याच्या राहुल गांधी यांच्या निर्धारातून सुकर होईल. काँग्रेस पक्षाने सुरुवातीपासून कोणावरही अन्याय न करता मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी प्रयत्न केले आहेत.

सचिन सावंत पुढे म्हणाले की, काँग्रेस पक्ष संविधान व संविधानिक मर्यादा मानतो. प्रत्येकाला राजकीय पक्षांवर व नेत्यांवर टिका करण्याचा अधिकार आहे आणि त्या टिकेला उत्तर देण्याचाही अधिकार आहे परंतु ही टिका संविधानिक चौकटीत, संस्कृतीच्या परिघात आणि सुसंस्कृतपणाच्या मर्यादेत असावी. मराठा समाजाच्या माय भगिनींनी आपल्या ५८ विराट मूक मोर्चांनी देशाला आदर्श घालून दिला आहे. त्या आदर्शाची आठवण प्रत्येकाला असली पाहिजे. आरक्षणाचा लढा लढताना केवळ आरक्षण मिळवून देणे नव्हे तर समाजाला आदर्श घालून देणे ही जबाबदारीही नेत्यांची असते. समाजाची प्रतिमा वाईट होता कामा नये याची काळजी घेतली पाहिजे. त्यातही सर्व मोर्चे आणि हा लढा यापूर्वी राजकीय नव्हता त्यामुळे माझ्यासहित काँग्रेस पक्षाच्या अनेक नेत्यांनी या मोर्चामध्ये सहभाग घेतला, पण आता मात्र मनोज जरांगे यांच्या वक्तव्यांना राजकीय वास येत आहे.

शेवटी बोलताना सचिन सावंत म्हणाले की, काँग्रेस पक्ष सर्वसामान्यांचा व सर्वांचा पक्ष आहे तो कोणत्याही विशिष्ट जाती धर्माचा नाही. कोणावरही अन्याय होता कामा नये हीच काँग्रेस पक्षाची भूमिका आहे. काँग्रेसच्या शब्दकोशात जुमलेबाजी, जनतेची फसवणूक, खोटे जीआर, गॅझेटच्या नावाने शब्दच्छल हे प्रकार नसतात. जे करायचे ते प्रामाणिकपणे जनसेवेसाठी आणि संविधानाच्या चौकटीत करण्याची धारणा आहे, असेही सांगितले.

About Editor

Check Also

आशिष शेलार यांची माहिती, गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी नवे प्राधिकरण स्थापन करणार विधानसभेत सांस्कृतिक कार्य विभागाच्या चर्चेला उत्तर देताना दिली माहिती

राज्यातील गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी व्यापक पावले उचलली जात असून युनेस्को मानांकन मिळालेल्या गडकिल्ल्यांच्या व्यवस्थापनासाठी तसेच असंरक्षित …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *