सुनिल तटकरे यांची माहिती, १८ व १९ ला दोन दिवसीय राष्ट्रवादीचे शिबीर छत्रपती संभाजीनगर येथे अडीचशे निमंत्रितांसाठी शिबीराचे आयोजन

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे १८ व १९ जानेवारी रोजी अडीचशे निमंत्रितांसाठी दोन दिवसीय शिबीर छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित करण्यात आले असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

या शिबिरात विद्यमान खासदार, विद्यमान आमदार, माजी खासदार, आमदार, विधानसभा लढलेले सर्व उमेदवार, फ्रंटल सेलचे प्रमुख व इतर सेलचे प्रमुख आणि विशेष निमंत्रित असणार आहेत असेही यावेळी सांगितले. यावेळी पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर, आमदार शिवाजीराव गर्जे, आमदार सना मलिक – शेख, युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण, प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे, प्रदेश प्रवक्ते प्रशांत पवार, प्रदेश सरचिटणीस लतिफ तांबोळी आदी उपस्थित होते.

सुनिल तटकरे पुढे बोलताना म्हणाले की, या शिबिरात पाच वर्षाचा रोडमॅप प्रदेशाध्यक्ष म्हणून तयार करणार आहे. शिवाय सभासद नोंदणी मोहीम याच महिन्यात सुरू केली जाणार आहे. त्यानंतर संघटनात्मक कामाला गती द्यायची आहे. पक्षाचे काम फक्त राष्ट्रीय स्थितीपर्यंत मर्यादित न रहाता समाजाच्या विविध क्षेत्रांशी निगडित असलेल्या बाबींवर लक्ष केंद्रित करत पक्षाची वाटचाल पुढच्या कालावधीत अधिक मजबूतीने कशी करता येईल यादृष्टीने विचार करणार आहोत असेही सांगितले.

पुढे बोलताना सुनिल तटकरे म्हणाले की, आज राज्याच्या सेलप्रमुखांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीला राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार उपस्थित होत्या. या बैठकीत आम्ही घेतलेल्या भूमिकेपासून ज्या पदाधिकाऱ्यांवर जबाबदारी सोपवली होती त्याचे मुल्यमापन केले. विधानसभा निवडणुकीत केलेल्या कामाचा अहवालही घेतला. आगामी कालावधीत अधिक जबाबदारीने आपल्याला संघटनेची पाळंमुळं खोलवर रुजवण्याबाबत सूचना दिल्याचे सांगितले.

सुनिल तटकरे पुढे बोलताना म्हणाले की, विधानसभेत आम्हाला ४१ जागांवर यश मिळाले. स्ट्राईक रेट दुसर्‍या क्रमांकावर राहिला आहे. पण पक्षाचा विस्तार राज्यभर करायचा आहे. काही जिल्हयात आमचा आमदार नाही. काही जिल्हयात एक – एक आमदार आहे. त्यामुळे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकर होतील अशी अपेक्षा आहे. त्यावरही या बैठकीत चर्चा झाल्याची माहितीही यावेळी दिली.

पुढे बोलताना सुनिल तटकरे म्हणाले की, या बैठकीत पक्षातील जे सहकारी आहेत त्यांच्याकडून सूचना व त्यांची मते काय आहेत हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. संघटनेच्या पदावर जी संधी मिळाली आहे त्यात सक्रियपणे काम करण्याची सूचना केली. पक्ष आणि पक्षाची शिस्त यापुढे कसोशीने पाळली गेली पाहिजे अशी भूमिका बैठकीत मांडली. प्रवक्त्यांचीही स्वतंत्र बैठक घेतली. प्रवक्ते बोलतात त्यावेळी ते व्यक्तीगत मत नसते तर ते पक्षाचे मत असते. पक्षाची अधिकृत भूमिका असते. त्यामुळे प्रवक्त्यांची जबाबदारी ही मोठी असते. त्याबद्दल सूचना करतानाच कुटुंब म्हणून पुढच्या कालावधीत अधिक सक्षमपणे महाराष्ट्रात पक्ष संघटना वाढवण्याच्या दृष्टीने यशस्वी होऊ असा विश्वासही व्यक्त केला.

About Editor

Check Also

प्रकाश आंबेडकर यांची टीका, दिल्लीतील आरक्षणविरोधी आंदोलन उच्च जातींचे वर्चस्व टिकवण्याचा प्रयत्न काँग्रेस नेतृत्वाचे मौन तितकेच निंदनीय आणि यामध्ये सामील असल्याचा संकेत

दिल्लीतील ‘आरक्षणविरोधी’ आंदोलने तथाकथित उच्च जातींकडून आपले वर्चस्व टिकवण्याचा एक उघड प्रयत्न दर्शवत असल्याचे वंचित …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *