ओबीसी आरक्षणप्रश्नी ही तर भाजपाची नौटंकी, पाप झाकता येणार नाही मोदी व फडणवीसच ओबीसी आरक्षणाचे मारेकरी त्यांच्याविरोधात आंदोलन करावे-नाना पटोले

मुंबई : प्रतिनिधी

ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्यातील भारतीय जनता पक्ष करत असलेले आंदोलन ही नौटंकी आहे. केंद्र सरकारने जातीनिहाय जनगणनेची आकडेवारी न दिल्याने व तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परिपत्रक काढून जिल्हा परिषद निवडणुका पुढे ढकलल्याने फक्त महाराष्ट्राच नाही तर देशातील ओबीसींचे राजकीय आरक्षण धोक्यात आले आहे. आंदोलनाची नौटंकी करून त्यांना आपले पाप झाकता येणार नाही. हिम्मत असेल तर त्यांनी नरेंद्र मोदी यांच्या विरोधात आंदोलन करावे असा टोला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी लगावला.

ओबीसी आरक्षण प्रश्नी भाजपाच्या आंदोलनाचा समाचार घेताना नाना पटोले पुढे म्हणाले की, केंद्र सरकारकडे जातीनिहाय जनगणनेची आकडेवारी असतानाही ती माहिती राज्य सरकारांना देत नाही. सुप्रीम कोर्टानेही ओबीसी आरक्षणाच्या सुनावणी दरम्यान ओबीसींचा इम्पिरिकल डेटा मागितला असता केंद्र सरकारने ते देण्याचे जाणीवपूर्वक टाळले. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री थावरचंद गहलोत यांना पत्र लिहून ओबीसींचा इम्पिरीकल डेटा देण्याची मागणी केली, पण केंद्राने तो दिला नाही. केंद्राने ओबीसींचा डेटा दिला नाही, त्यामुळेच सर्वोच्च न्यायालयात ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द होण्याची नामुष्की ओढवली. या प्रकरणात मोदी सरकार जेवढे जबाबदार आहे तेवढेच फडणवीस सरकारही जबाबदार आहे.

२०१७ साली नागपूर जिल्हा परिषदेची निवडणूक फडणवीस यांनी एक परिपत्रक काढून पुढे ढकलली. नंतर इतर जिल्हा परिषदाही कोर्टात गेल्या, यातून गुंता वाढत गेला आणि परिणामी आरक्षण धोक्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या इशा-यावर चालणा-या भारतीय जनता पक्षाची विचारधाराच आरक्षण विरोधी असून ओबीसींचे राजकीय आरक्षण घालवून ओबीसी समाजाला सत्तेपासून वंचित ठेवण्याचा डाव आहे. भाजपाच्या या भूमिकेमुळेच आरक्षणाची गुंतागुंत वाढली असताना त्याचे खापर मात्र राज्यातील महाराष्ट्र विकास आघाडी सरकारवर फोडण्यासाठी आंदोलनाचा कांगावा ते करत आहेत. भाजपाचे हे ढोंग जनतेला विशेषतः बहुजन समाजाच्या लक्षात आले आहे. भाजपाचे आंदोलन हा केवळ फार्स असून आपण केलेले पाप दुस-याच्या माथी मारण्याचा केविलवाणा प्रयत्न असल्याची टीका त्यांनी केली.

भाजपाच्या बेजबाबदारपणामुळे ओबीसींचे राजकीय आरक्षण संकटात आले असून स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीतील जवळपास ५५ ते ५६ हजार जागांवर पाणी सोडावे लागणार आहे. ओबीसी समाजातील नेतृत्व संपुष्टात आणण्याचे पाप भाजपाने केले आहे. पाच वर्ष सत्तेत असताना फडणवीसांनी झोपा काढल्या आणि आता आंदोलन करून ओबीसी समाजाची दिशाभूल करत आहेत. भाजपाला जर ओबीसी समाजाचा खराच कळवळा असता तर ही वेळच येऊ दिली नसती. त्यांचे षडयंत्र उघडे पडल्यामुळे आपल्यालाच ओबीसी समाजाच्या हिताची चिंता असल्याचे भासवण्यासाठी हा सर्व खटाटोप सुरू आहे असल्याचा आरोप त्यांनी केला.

About Editor

Check Also

मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, तिसऱ्या मुंबईच्या विकासाला आंतरराष्ट्रीय भागीदारीमुळे गती मिळणार रायगड-पेण ग्रोथ सेंटरमध्ये १०० एकरांचा जागतिक दर्जाचा मिश्र-वापर विकास प्रकल्प, मॅपलट्रीकडून १.१ अब्ज डॉलरपेक्षा अधिक FDI अपेक्षित; सुरबाना ज्युराँगची प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून नियुक्ती

मुंबई महानगर प्रदेश (एमएमआर) आणि त्यापलीकडील परिसर हा देशाच्या आर्थिक विकासाचे प्रमुख केंद्र बनण्याची क्षमता …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *