अतुल लोंढे यांचा सवाल, ७/१२ कोरा करण्याच्या आश्वासनाचे काय झाले? मुख्यमंत्री फडणवीसांनी शेतकऱ्यांनाच सांगावे १९७२ च्या भीषण दुष्काळानंतर काँग्रेस सरकारने ‘मनरेगा’ आणली; फलोद्यान योजना आणली, फूड प्रोसेसिंगमध्ये मोठी क्रांती घडवली, तुम्ही काय केले?

राज्यात कोरड्या दुष्काळाची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. १९७२ च्या दुष्काळापेक्षाही गंभीर दुष्काळ असल्याचे चित्र आहे. शेतकरी मोठ्या संकटात आहे, तो सरकारकडे मदतीची आस लावून बसला आहे, पण भाजपाचे फडणवीस सरकार अजून अभ्यास करण्यातच मग्न आहे. शेतकऱ्यांचा संताप लक्षात आल्याने शेवटी मुख्यमंत्री शेतकऱ्यांच्या बांधावर गेले आहेत पण त्याचा उपयोग काय? भाजपा सरकारने निवडणुकीवेळी शेतकऱ्यांचा ७/१२ पूर्णपणे कोरा करण्याचे आश्वासन दिले होते, त्याचे काय झाले?, याचे उत्तर दस्तुरखुद्द मुख्यमंत्री महोदय तुम्हीच शेतकऱ्यांना द्या, असे आव्हान काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते अतुल लोंढे यांनी दिले आहे.

मुख्यमंत्र्यांच्या दुष्काळी दौऱ्यावर बोलताना काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते अतुल लोंढे पुढे म्हणाले की, भाषणाने केवळ राजकारण साधता येते पण सत्य परिस्थितीचा सामना करण्याची धमक त्याच्यामध्ये असत नाही, असेच भाजपा महायुती सरकारबद्दल म्हणावे लागेल. मराठवाड्यातील पुढच्या पिढीला दुष्काळ पहावा लागणार नाही, या विधानाचा पाढा याच देवेंद्र फडणवीस यांनी आजपर्यंत कितीतरी वेळा वाचला आहे. आज ते शेतकऱ्यांच्या बांधावर गेले ही चांगली गोष्ट आहे, आम्ही त्याचे स्वागतच करतो. हा दुष्काळ १९७२ नंतरचा सर्वात मोठा दुष्काळ आहे, असे ते म्हणाले, पण १९७२ च्या दुष्काळातून काँग्रेसच्या सरकारने शिकवण घेतली आणि रोजगार हमी योजना त्यातून जन्माला आली,  या योजनेने लाखो हाताला रोजगार दिला, हीच योजना पुढे केंद्र सरकारने स्वीकारली, कायदा केला आणि त्याची मनरेगा झाली, कोरोनामध्येही याच मनरेगाने रोजगार दिला परंतु भाजपा सरकारने ही मनरेगा कशी तोडता येईल यासाठी सातत्याने काम केले. मनरेगाच्या निधीमध्ये मोठ्या प्रमाणात कपात केली, आतातर ही योजनाच मोडीत काढण्याचे काम भाजपा सरकार करत आहे.

अतुल लोंढे म्हणतात, राज्यात याआधीही अतिवृष्टी आली, दुष्काळ आला, खरेच भाजपा सरकारने शेतकऱ्यांना मदत केली का, ते सांगावे, किती मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली हे मुख्यमंत्री यांनी शेतकऱ्यांनाच विचारावे. भाजपा महायुती सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी केली तीही फसवी निघाली, हेच शेतकऱ्यांकडून ऐकायला मिळेल. भाजपा सरकार यातून धडे घेणार आहे का? तुम्ही काही नव्याने उभे करणार आहात का? दुष्काळाचा सामना करता आला पाहिजे, यासाठी कोणत्या ठोस योजना या सरकारकडे आहेत?  २०१४ साली जाहीर केलेल्या ४९ हजार कोटींच्या वॉटर ग्रीडचे काय झाले?

अतुल लोंढे शेवटी म्हणाले की,  काँग्रेसचे सरकार असताना शेतकऱ्यांसाठी विविध योजना आणल्या व त्याची अंमलबजावणीही केली. शरद पवार साहेब मुख्यमंत्री असताना कमी पाण्यावर तग धरू शकणारी फलोद्यान योजना आणली आणि त्यानंतर फूड प्रोसेसिंगमध्ये मोठी क्रांती महाराष्ट्रात झाली. भाजपा सरकारच्या १२ वर्षांच्या कालावधीमध्ये शेती क्षेत्रात असे काही केल्याचे दिसत नाही. आज तुम्ही बांधावर गेले आहात, शेतकऱ्यांच्या समस्या तुम्हाला जवळून दिसल्या असतील, त्यांचे दुःख कळले असेल तर कदाचित काहीतरी चांगले होईल अशी अपेक्षा करूया, नाहीतर पुन्हा तेच, ये रे माझ्या मागल्या, रात्रीचा गोंधळ बरा होता, असे होऊ नये अशी आमची अपेक्षा असल्याचे सांगितले.

About Editor

Check Also

रस्ते अपघात रोखण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, • गोल्डन अवर’मध्ये अपघातग्रस्तांना तातडीने उपचार, • रस्ता सुरक्षा लेखापरीक्षण आणि एकात्मिक रुग्णवाहिका यंत्रणेवर भर

राज्यातील रस्ते अपघात आणि अपघाती मृत्यूंचे प्रमाण कमी करण्यासाठी परिवहन, पोलीस, सार्वजनिक बांधकाम, आरोग्य तसेच …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *