‘आवडेल तेथे कोठेही प्रवास पास’ आता ऑनलाइन एसटीचा प्रवास अधिक सुलभ ऑनलाईन पास काढता येणार त्यामुळे प्रवाशांना आगारात जाण्याची आवश्यकता नाही

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) प्रवाशांच्या सोयीसाठी सुरू केलेल्या ‘आवडेल तेथे कोठेही प्रवास पास’ योजनेतील पास आता ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रवाशांना आगारात जाऊन हस्तलिखित पद्धतीने पास काढण्याची आवश्यकता राहणार नसून, घरबसल्या ऑनलाइन पास मिळवता येणार आहे.

एसटी महामंडळाच्या वाहतूक विभागाने २९ सप्टेंबर २०२६ रोजी जारी केलेल्या परिपत्रकानुसार, या योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या ४ व ७ दिवसांच्या पाससाठी ऑनलाइन कार्यप्रणाली सुरू करण्यात आली आहे. महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर तसेच मोबाईल ॲप्लिकेशन मध्ये ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

ऑनलाइन पास काढताना प्रवाशांना आवश्यक माहिती भरल्यानंतर नियमानुसार पास उपलब्ध होणार आहे. प्रवाशाला प्राप्त झालेला पास प्रिंट स्वरूपात किंवा मोबाईलमध्ये PDF स्वरूपात दाखवता येणार आहे. त्यामुळे पास खरेदीची प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि सुलभ होणार आहे.

QR कोड स्कॅन करून होणार तपासणी

ऑनलाइन पद्धतीने मिळालेल्या पासवर QR कोड देण्यात येणार आहे. प्रवासाच्या वेळी वाहकाकडील ईटीआयएम मशीनद्वारे हा QR कोड स्कॅन केला जाईल. QR कोड स्कॅन केल्यानंतर प्रवाशाचे नाव, पासचा प्रकार, पासची वैधता व इतर आवश्यक माहिती ईटीआयएम मशीनवर प्रदर्शित होणार आहे. तसेच प्रवाशाने दाखविलेल्या ओळखपत्राचीही पडताळणी करण्यात येणार असून, त्यानंतरच संबंधित प्रवाशाला प्रवासाची परवानगी दिली जाईल.

आगारातील गर्दी कमी होणार

ऑनलाइन पास सुविधेमुळे प्रवाशांना आगारात रांगेत उभे राहण्याची गरज कमी होणार असून, विशेषतः सुट्टीच्या काळात आणि पर्यटनाच्या हंगामात पास काढणे अधिक सोपे होणार आहे. ‘आवडेल तेथे कोठेही प्रवास पास’ योजनेचे डिजिटल रूपांतर करत एसटी महामंडळाने प्रवाशांच्या हातातच पासची सुविधा उपलब्ध करून दिल्याने एसटी प्रवास अधिक सुलभ, आधुनिक आणि पारदर्शक होण्यास मदत होणार आहे.

About Editor

Check Also

हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी, एसआयआर (SIR) रद्द करा, निवडणूक आयोगावर जनतेचा अविश्वास नवयुवकांचा नाव नोंदणीस थंड प्रतिसाद, असंतोष पाहता पुन्हा नव्याने अर्ज- ६ भरण्याची मुभा देण्यात आली

निवडणूक आयोगाने सुरु केलेली एसआयआर मोहिम सुरुवातीपासूनच अत्यंत गुंतागुंतीची व वेळकाढूपणाची ठरली आहे. आयोगाच्या कामाच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *