महाराष्ट्र विधान परिषदेच्या ५ जागांसाठी २३ ऑक्टोबरला मतदान पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधान परिषदेतील पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील पाच जागांसाठी द्विवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार औरंगाबाद विभाग पदवीधर, पुणे विभाग पदवीधर, नागपूर विभाग पदवीधर, अमरावती विभाग शिक्षक आणि पुणे विभाग शिक्षक या पाच मतदारसंघांसाठी २३ ऑक्टोबर २०२६ रोजी मतदान होणार आहे. विद्यमान सदस्यांचा कार्यकाळ ६ डिसेंबर २०२६ रोजी संपुष्टात येणार आहे.

या निवडणुकीसाठी २९ सप्टेंबर २०२६ रोजी अधिसूचना प्रसिद्ध होईल. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख ६ ऑक्टोबर, अर्जांची छाननी ७ ऑक्टोबर, तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख ९ ऑक्टोबर २०२६ आहे. मतदान २३ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ४ या वेळेत होईल. मतमोजणी २७ ऑक्टोबर २०२६ रोजी करण्यात येणार असून, निवडणूक प्रक्रिया ३१ ऑक्टोबर २०२६ पूर्वी पूर्ण केली जाणार आहे.

महाराष्ट्रातील या पाच जागांमध्ये औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघातून सतीश चव्हाण, पुणे विभाग पदवीधर मतदारसंघातून अरुण लाड, नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघातून अभिजीत वंजारी, अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघातून किरण सरनाईक आणि पुणे विभाग शिक्षक मतदारसंघातून जयंत आसगावकर या विद्यमान सदस्यांचा समावेश आहे.

भारत निवडणूक आयोगाने या निवडणुकांची घोषणा केल्यापासून संबंधित मतदारसंघांमध्ये आदर्श आचारसंहिता तत्काळ लागू झाली आहे. पदवीधर व शिक्षक मतदारसंघांसह विधान परिषद निवडणुकांसाठी आदर्श आचारसंहितेच्या तरतुदी लागू करण्याबाबत आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांमध्येही स्पष्टता देण्यात आली असल्याचे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने कळविले आहे.

About Editor

Check Also

हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, SIR च्या माध्यमातून ३ कोटी २८ लाख मतदारांची नावे वगळली; लोकशाहीचा गळा घोटण्याचा डाव संशयास्पद मतदारांची नावे मतदारसंघ व बुथनिहाय प्रसिद्ध करा, दावे व हरकतीसाठी तीन महिन्यांची मुदत वाढवून द्या

भारतीय जनता पक्ष निवडणूक आयोगाच्या माध्यमातून मतदारांची नावे वगळून, त्यांना मतदानाच्या संवैधानिक अधिकारापासून वंचित ठेवत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *