१८ ऑक्टोबरपासून पूर्ण क्षमतेने विमाने घेणार उड्डाण बुकींग मर्यादा काढून टाकली

मुंबई: प्रतिनिधी

विमान कंपन्या आणि देशांतर्गत विमानाने प्रवास करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. सरकारने विमान कंपन्यांना १८ ऑक्टोबरपासून सर्व जागांसाठी तिकीट बुक करण्याची परवानगी दिली आहे. कोविड रुग्णांमध्ये घट झाल्यामुळे फ्लाइटवरील क्षमता मर्यादा काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे विमानभाडे कमी होण्याची शक्यता आहे. हवाईवाहतूक मंत्रालयाने विमान कंपन्यांना सवलत देताना त्यांना आणि प्रवाशांना कोविडशी संबंधित नियमांचे पालन करण्यास सांगितले आहे. सप्टेंबरमध्ये, विमान कंपन्यांना देशांतर्गत उड्डाणांमध्ये ७२.५ टक्के ऐवजी ८५ टक्के जागा बुक करण्याची परवानगी दिली. यापूर्वी जुलैमध्ये तिकिटे ५० टक्के ऐवजी ६५ टक्के जागा बुक करण्याची परवानगी होती.

कोविड 19 रोखण्यासाठी सरकारने २३ मार्च २०२० रोजी परदेशी उड्डाणांवर पूर्णपणे बंदी घातली होती. पण गेल्या वर्षी मे पासून ‘वंदे भारत’ मिशन अंतर्गत विशेष आंतरराष्ट्रीय उड्डाणांना परवानगी दिली आहे. या व्यतिरिक्त काही देशांसोबत ‘द्विपक्षीय हवाई बबल’ व्यवस्थेअंतर्गत जुलै २०२० पासून दोन्ही देशांदरम्यान परदेशी उड्डाण सेवा सुरू आहे. हवाई वाहतूक मंत्रालयाच्या आदेशानुसार, लोकांमध्ये हवाई प्रवासाची मोठी मागणी पाहता देशांतर्गत उड्डाण सेवांच्या परिस्थितीचा आढावा घेण्यात आला आहे. १८ ऑक्टोबर २०२१ पासून पूर्ण क्षमतेने देशांतर्गत उड्डाण सेवा पुन्हा सुरू करण्याची परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

दरम्यान, शेअर बाजारातील बडे गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांच्या अकासा एअर या नवीन विमान कंपनीला सरकारकडून परवानगी मिळाली आहे. एसएनव्ही एव्हिएशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीअंतर्गत अकासा एअर सेवा देणार आहे. पुढील वर्षाच्या उन्हाळ्यात अकासा एअर आपली सेवा सुरू करणार आहे.  विनय दुबे हे अकासा एअरचा कारभार सांभाळतील. विनय दुबे हे जेट एअरवेजचे माजी सीईओ आहेत. तर अकासाच्या बोर्डवर इंडिगोचे माजी अध्यक्ष आदित्य घोषही असतील.

अकासा एअरची बोईंग आणि एअरबस या कंपन्यांसोबत सध्या विमान खरेदीबाबत चर्चा सुरु आहे. झुनझुनवाला यांनी अकासात २४७.५० कोटी रुपयांची गुंतवणूक केली आली. याशिवाय दुबईचे एक गुंतवणूकदार आणि न्यू होरायझन इन्व्हेस्टमेंट फंडाचे व्यवस्थापक माधव भटकुली  यांनी ६.२४ कोटी रुपये गुंतविले आहेत. कंपनीने पुढील उन्हाळ्यात आपली सेवा सुरू करण्याची योजना आखली आहे. पुढील ४ वर्षात ते आपल्या ताफ्यात १८० आसन क्षमतेची ७० विमाने सामिल करतील.

About Editor

Check Also

विशाल, अतिविशाल प्रकल्पांना विशेष प्रोत्साहन; १८ प्रस्तावांना मुख्यमंत्र्यांची मंजुरी महाराष्ट्रात ₹२.५६ लाख कोटींची गुंतवणूक आणि १ लाखांहून अधिक रोजगारनिर्मितीचे लक्ष्य

राज्यात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक आकर्षित करून रोजगारनिर्मितीला चालना देण्यासाठी तब्बल ₹२,५६,१३७.०१ कोटींच्या १८ विशाल व …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *