ए.एन.एम. व जी.एन.एम. प्रवेशाच्या दुसऱ्या कॅप फेरीत सहभागी व्हा फ्रीशिप व शिष्यवृत्ती योजनांच्या लाभासाठी कॅप प्रवेश प्रक्रियेत सहभाग अनिवार्य

ए.एन.एम. आणि जी.एन.एम. अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत राबविण्यात येणाऱ्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेच्या (CAP) पहिल्या फेरीत पर्याय उपलब्ध न झालेल्या पात्र विद्यार्थ्यांनी दुसऱ्या फेरीत आवर्जून सहभागी व्हावे. फ्रीशिप व शिष्यवृत्ती योजनांचा लाभ मिळविण्यासाठी कॅप प्रवेश प्रक्रियेत सहभागी होणे अनिवार्य असल्याने विद्यार्थ्यांनी विहित वेळापत्रकानुसार प्रवेशाची कार्यवाही पूर्ण करावी, असे आवाहन महाराष्ट्र राज्य परिचर्या व पॅरावैद्यकीय शिक्षण मंडळामार्फत करण्यात आले आहे.

राज्य शासनाच्या धोरणात्मक निर्णयानुसार शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून ए.एन.एम. व जी.एन.एम. अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया इयत्ता बारावीच्या गुणांच्या आधारे राबविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार महाराष्ट्र राज्य परिचर्या व पॅरावैद्यकीय शिक्षण मंडळाशी संलग्नित सर्व संस्थांमधील प्रवेशासाठी २९ जून २०२६ रोजीच्या शासन आदेशानुसार राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया राबविण्यात आली होती. त्यानुसार या प्रक्रियेतील पहिल्या फेरीची निवड यादी १४ नोव्हेंबर २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात आली, त्यानंतर दुसऱ्या फेरीची प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

न्यायालयाच्या आदेशानुसार शिष्यवृत्ती लाभाची पात्रता

मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने रिट याचिका क्रमांक ११९९१/२०२६ मध्ये १९ ऑक्टोबर २०२६ रोजी दिलेल्या आदेशानुसार, केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेत (CAP) सहभागी होणारे विद्यार्थी फ्रीशिप व शिष्यवृत्ती योजनांच्या लाभासाठी पात्र राहतील. त्यामुळे या योजनांचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी कॅप प्रवेश प्रक्रियेतील सहभागाबाबत विशेष दक्षता घेणे आवश्यक आहे.

पहिल्या फेरीत प्रवेश निश्चित झालेल्या विद्यार्थ्यांनी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने निर्धारित केलेल्या कार्यपद्धतीनुसार प्रवेशाची आवश्यक प्रक्रिया पूर्ण करावी. तसेच, पहिल्या फेरीत प्रवेशाची संधी न मिळालेल्या किंवा पसंतीचा पर्याय उपलब्ध न झालेल्या पात्र विद्यार्थ्यांनी दुसऱ्या फेरीत सहभागी होऊन उपलब्ध संधीचा लाभ घ्यावा.

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळणे तसेच त्यांना शासनाच्या फ्रीशिप व शिष्यवृत्ती योजनांचा लाभ मिळण्याच्या दृष्टीने प्रवेश प्रक्रियेतील सहभाग महत्त्वाचा आहे. त्यामुळे सर्व पात्र विद्यार्थ्यांनी विहित वेळापत्रकाचे पालन करून दुसऱ्या कॅप फेरीत सहभाग नोंदवावा व प्रवेशाची कार्यवाही निर्धारित मुदतीत पूर्ण करावी, असे आवाहन मंडळामार्फत करण्यात आले आहे.

About Editor

Check Also

प्रकाश आबिटकर यांचे निर्देश, औषध गुणवत्ता तपासणीसाठी उपकरणांचा प्रभावी वापर करा औषधांच्या गुणवत्तेशी तडजोड नको

राज्यातील नागरिकांना गुणवत्तापूर्ण औषधे उपलब्ध करून देताना औषधांच्या गुणवत्तेशी कोणत्याही प्रकारची तडजोड करू नये. सार्वजनिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *