पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला, हा निर्णय घेताना बँका या सर्वसामान्य लोकांसाठी असाव्यात हा हेतू होता. इंदिरा गांधी यांच्या निर्णयाने बँकांचे दरवाजे गावखेड्यातील लोकांसाठी, गरिब व सर्वसामान्य जनता तसेच शेतकऱ्यांसाठी उघडे झाले पण भारतीय जनता पक्षाचा विचार मात्र याच्या उलट आहे. देशाची संपत्ती ही केवळ मुठभर लोकांच्या हाती असावी हा भाजपाचा विचार असून याच विचारातून भाजपा सरकार देशाची मालमत्ता व संपत्ती विकत आहे. सार्वजनिक क्षेत्रातील आयडीबीआय बँक कॅनडाच्या कंपनीला विकण्याचा निर्णय देशहिताचा नाही, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.
IDBI बँक परकीय भांडवलदारांना विकण्याच्या निर्णयाला विरोध करण्यासाठी काँग्रेसच्या वित्त विभागाने टिळक भवन येथे एका विशेष सभेचे आयोजन केले होते. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, माजी खासदार कुमार केतकर, वरिष्ठ आर्थिक पत्रकार राजीव रंजन सिंग, ऑल इंडिया बँक ऑफिसर्स असोसिएशनचे सरचिटणीस एस. नागराजन यांनी यावेळी मार्गदर्शन केले.
यावेळी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, जगातील महत्वाची आर्थिक सत्ता पाच लोकांच्या हाती एकवटली आहे. महागाई प्रचंड वाढली आहे, शेतकऱ्यांचे प्रचंड हाल होत आहेत, बेरोजगारी वाढली आहे, अर्थव्यवस्था रसातळाला गेली आहे. तर दुसरीकडे भाजपा सरकार मात्र सर्व संस्था व सरकारी संपत्ती, मालमत्ता कवडोमोल भावाने विकत आहे. फॅसिस्ट व कॅपिटॅलिस्ट एकाच बाजूला असून देशाच्या संपत्तीची लुट सुरु आहे, याविरोधात आवाज उठला पाहिजे. हा केवळ आयडीबीआय या एका बँकेचा मुद्दा नाही तर असे अनेक मुद्दे आहेत. राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर काँग्रेस पक्ष तुमच्या सोबत आहे असेही सपकाळ म्हणाले.
माजी खासदार कुमार केतकर यावेळी म्हणाले की, तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी १९ जुलै १९६९ रोजी भारतातील १४ प्रमुख खासगी बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर १९८० मध्ये आणखी ६ बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले. या निर्णयाला मोरारजी देसाई यांच्यासह अनेकांनी विरोध केला होता. भारतीय जनता पक्षाचे धोरण उद्योगपती धार्जिणे आहे म्हणूनच ते सार्वजनिक क्षेत्रातील बँका खाजगी उद्योगपती व परकीय कंपन्यांच्या घशात घालत आहेत. जगभरातील बँकिंग क्षेत्रावर ज्यू समाजाचे वर्चस्व आहे, अमेरिकेचे सर्व बँकिंग क्षेत्रही त्यांच्याच ताब्यात आहे आणि हा एक मोठा धोका आहे असेही केतकर म्हणाले..
AIBOA चे महासचिव एस. नागराजन यावेळी म्हणाले की, भाजपा सरकारने सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे खाजगीकरण सुरु केले आहे आणि हे असेच सुरु राहिले तर देशातील सार्वजनिक क्षेत्रातील १२ बँकांची संख्या केवळ ४ राहिल, हे संकट फक्त बँकांपुरते नसून ते विमा व इतर आर्थिक क्षेत्रातही शिरकाव करु शकते, पुढचा नंबर LIC चा असू शकतो. याविरोधात बँक व विमा क्षेत्रातील सर्वांनी एकत्र येऊन लढा दिला पाहिजे. आयडीबीआय बँक परकीय शक्तीच्या हाती देण्यापासून वाचवली पाहिजे. शेतकरी त्यांच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरले, ७०० शेतकरी शहिद झाले व केंद्र सरकार नरमले. शेतकऱ्यांप्रमाणे बँक व विमा क्षेत्रातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही रस्त्यावर उतरून लढा दिला पाहिजे. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचा देशाच्या विकासात मोठा वाटा आहे, भारताचे आर्थिक क्षेत्र परकीय शक्ती ताब्यात घेत असून परकीय शक्तींचा आर्थिक क्षेत्रातील प्रवेश देशासाठी घातक असल्याने तो थांबवला पाहिजे, असेही नागराजन म्हणाले..
वरिष्ठ आर्थिक पत्रकार राजीव रंजन सिंग यावेळी म्हणाले की, काँग्रेस सत्तेत आल्यास संस्थांची उभारणी करते आणि भाजपा सत्तेत आली की त्याच संस्था विकते. भाजपा खाजगीकरणावर विश्वास ठेवणारा पक्ष आहे, भाजपा सर्व राष्ट्रीय संस्था, राष्ट्राची संपत्ती खाजगी लोकांच्या हाती देते त्या भाजपाला राष्ट्रवादी पक्ष म्हटले जाते पण राष्ट्राचे हित पाहणाऱ्या काँग्रेस पक्षाला मात्र तसे म्हटले जात नाही हे दुर्दैवी आहे. आयडीबीआय बँकेचे आजचे बाजारामुल्य १.४१ लाख कोटी रुपये असताना सरकारने मात्र ८७ हजार कोटी रुपये दाखवले आहे. आज ही बँक १० हजार कोटी रुपये नफ्यात आहे. भारत सरकारने बँकेचे मुल्य कमी दाखवून ही बँक कवडीमोल भावाने विकली आहे. आयडीबीआय बँक विकल्यानंतर बँकेतील कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यासुद्धा धोक्यात जाणार आहेत, त्यांच्या नोकऱ्या राहतील याची खात्री नाही असेही राजीव रंजन म्हणाले..
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व प्रास्ताविक महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वित्त विभागाचे प्रमुख विश्वास उटगी यांनी केले.
Marathi e-Batmya