अखेर पुरंदरेंबाबत लेखक जेम्स लेनने केला मोठा खुलासा, मला कोणीही… एका इंग्रजी साप्ताहीकाला दिलेल्या मुलाखतीत केला खुलासा

राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यानंतर जाती-पातीतील राजकारणाला सुरुवात झाल्याचा आरोप करत त्यासाठी शरद पवारांनी सॉफ्ट टार्गेट म्हणून सातत्याने शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंवर टीका केल्याचा गंभीर आरोप केला. त्यावर शरद पवारांनीही जेम्स लेनने लिहिलेल्या पुस्तकात पुरंदरेंचे नाव असून त्यास छत्रपती शिवाजी महाराजांची चुकीची माहिती दिल्याने आपण त्यांच्यावर टीका केल्याचे स्पष्ट केले. अखेर या जेम्स लेनने या पुस्तकासाठी कोणी माहिती दिली याबाबत इंडिया टुडेने विचारणा केली, त्यास उत्तर देताना लेन याने स्पष्ट केले की आपणाला छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल कोणीही माहिती दिली नाही. मात्र त्यावेळी मी योग्य पध्दतीने युक्तीवाद केला नाही. त्याचा नाहक त्रास इतरांना झाल्याची स्पष्टोक्ती दिली.

जेम्स लेन यांनी १६ एप्रिलला इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत २००३ मध्ये प्रकाशित झालेल्या आपल्या Shivaji: Hindu King in Islamic India या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या वडीलांबद्दल चुकीची माहिती देण्यात आली. यासंदर्भात विचारणा केली असता शिवशाहीर पुरंदरे माहितीचे स्त्रोत नव्हते असा खुलासा केला.

पुस्तकातील वादग्रस्त माहिती तुम्हाला कोणी पुरवली याबद्दल विचारलं असता जेम्स लेन यांनी सांगितलं की, तुम्ही हा प्रश्न चुकीच्या पद्धतीने विचारत आहात. कोणीही मला माहिती पुरवली नाही. माझं पुस्तक कथा आणि लोक ते कसं सांगतात; त्या कथा सांगणाऱ्या लोकांच्या मूल्यांबद्दल आपल्याला काय कथा सांगतात याबद्दल होतं. उदाहरणार्थ…काही लोक शिवाजी महाराजांचा संबंध रामदास गुरुंसोबत जोडतात तर काहीजण तुकाराम महाराजांसोबत. यापैकी कोणती माहिती योग्य आहे आणि एक गट ‘अ’ कथानकाला का पसंती देतो आणि दुसरा गट ‘ब’ ला का यात मला रस नसल्याचे सांगितले.

तुम्हाला मिळालेल्या माहितीचा आधार काय होता? असं विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, जो कोणी माझं पुस्तक नीट वाचेल त्याला मी कोणताही ऐतिहासिक दावा करत नसल्याचं लक्षात येईल. मी शिवाजी महाराजांचा अपमान केला अशी टीका करणाऱ्यांनी नीट वाचलेलं नाही. पुन्हा सांगतो की मी फक्त कथा सांगतो, ऐतिहासिक तथ्य नाही.

तुम्ही कधी बाबासाहेब पुरंदरेंसोबत चर्चा केली केली का? आणि केली तर त्यांचा प्रतिसाद कसा होता? असं विचारण्यात आलं असता जेम्स लेन यांनी आपली कधीच एका शब्दानेही त्यांच्याशी चर्चा झाली नसल्याचे स्पष्ट केले.

जेव्हा तुम्हाला त्या टिप्पणीबद्दल खेद वाटला आणि ते परत घेण्याचा निर्णय घेतला, तेव्हा तुमच्या मनात काय चालले होते? असं विचारलं असता ते म्हणाले की, मी माझे युक्तिवाद करताना अधिक सावधगिरी बाळगली नाही आणि त्याचा परिणाम म्हणून इतरांना त्रास सहन करावा लागला याची खंत होती.

बाबासाहेब पुरंदरे तसंच त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांप्रती केलेल्या योगदानाकडे कसं पाहता? असं विचारण्यात आलं असता त्यांनी सांगितलं की, पुरंदरे हे एकेकाळी छत्रपती शिवाजी महाराजांचे सर्वात प्रख्यात समर्थक होते आणि त्याबद्दल ते बराच काळ आदरणीय होते. १८ व्या आणि १९ व्या शतकातील राजकीय लिखाणावरुन आज त्यांच्यावर टीका केली जात आहे, जेव्हा शिवाजी महाराजांच्या वंशजांना काही ब्राह्मणांनी खरे क्षत्रिय मानण्यास नकार दिला होता. त्यानंतरच मराठा आणि ब्राह्मण इतिहासाच्या लेखनात वाद निर्माण झाल्याचेही त्यांनी सांगितले.

जवळपास दीड दशकांनंतरही पुस्तकाबाबतच्या वादग्रस्त बातम्या वाचून तुम्हाला काय वाटतं? अशी विचारणा केली असता ते म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज हे महान वीर होते. पण मला खेद वाटतो की त्यांचे चरित्र हा विद्वत्तेचा विषय नसून समकालीन राजकीय वादाचं साधन झाले आहे.

About Editor

Check Also

भाजप आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांचे बंधू अरविंद पाटील निलंगेकरानां उच्च न्यायालयाचा दणका ४० कोटींच्या कर्ज घोटाळा प्रकरणात दोषमुक्तीचा अर्ज फेटाळला; खटल्याचा मार्ग मोकळा

युनियन बँक ऑफ इंडियाच्या कथित कोट्यवधी रुपयांच्या कर्ज घोटाळा व कागदपत्रांतील फेरफार प्रकरणात आरोपी असलेल्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *