मोदींनी दिला भाजपाच्या पदाधिकाऱ्यांना २५ वर्षाचा रोडमॅप लोकांसाठी काम करण्याचं देखील केले आवाहन

देशातील सर्वात मोठे राज्य असलेल्या उत्तर प्रदेशात पुन्हा एकदा मंदिर विरूध्द मस्जिद असा संघर्ष सुरु झालेला असताना तर दुसऱ्याबाजूला महाराष्ट्रात भोंगे, हनुमान चालीसा, नेत्यांचे आरोप-प्रत्यारोप यामुळे राजकीय वातावरण तापलेलं असताना राष्ट्रीय स्तरावर गुजरात, हिमाचल प्रदेश या राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपाने तयारी सुरु केली आहे. या दोन्ही राज्यांमध्ये या वर्षाअखेरीस विधानसभा निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर जयपूरमध्ये भाजपाच्या देशभरातील पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संबोधित करत भाजपा पदाधिकाऱ्यांना पुढील २५ वर्षांच्या दृष्टीने पावलं उचलण्याचे निर्देश दिले.
या महिन्यातच केंद्रात एनडीए अर्थात भाजपाप्रणीत आघाडीचे सरकार येण्याला ८ वर्ष पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपा पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना मोदी म्हणाले, या महिन्यात भाजपाला केंद्रात ८ वर्ष पूर्ण झाले आहेत. ही वर्षे देशाची सेवा करण्याची होती. गरीबांच्या आणि मध्यम वर्गाच्या कल्याणासाठी, महिलांच्या सबलीकरणासाठी काम करण्याची होती. जनसंघाच्या काळात देखील आपलं निवडणूक राजकारणात अस्तित्व अल्प होते. पण तरी आपल्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रउभारणीच्या कामात झोकून देऊन काम केल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काही विरोधी पक्षांवर नाव न घेता निशाणा साधला. आपण पाहातोय की मूळ मुदद्यावरून लोकांचं दुसरीकडेच लक्ष भरकटवणं हे काही पक्षांचं काम होऊन बसलं आहे. आपण त्यांच्या जाळ्यात न अडकता त्यांच्यापासून सावध राहायला हवं असा टोला त्यांनी काँग्रेससह विरोधकांना लागावला.
दरम्यान, यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुढील २५ वर्षांवर लक्ष केंद्रीत करण्याचं आवाहन पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना केलं. आपण आता पुढील २५ वर्षांसाठीचं उद्दिष्ट निश्चित करत आहोत. आता वेळ आली आहे की भाजपानं पुढील २५ वर्षांसाठीचं ध्येय निश्चित करायला हवं. हे ध्येय सर्व अडचणींवर मात करत सातत्याने देशाच्या नागरिकांसाठी काम करत राहाणं आणि त्यांच्या आकांक्षांची पूर्तता करणं हे असायला हवं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आगामी २५ वर्षाचा रोड मॅप देत पुढील भविष्यातही सत्तास्थानी राहण्याचा कानमंत्र मोदींनी दिल्याचे सांगण्यात येत आहे. भाजपा पदाधिकाऱ्यांना मोदींनी संबोधित करण्याची ही मागील आठ वर्षातील ही दुसरी वेळ असावी.

About Editor

Check Also

विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांचे निर्देश, महिन्यात अंमलबजावणी अहवाल सादर करा चित्रपट व करमणूक क्षेत्रातील कंत्राटी कामगारांच्या प्रश्नांवर बैठक

मुंबईतील गोरेगाव येथील चित्रनगरीसह राज्यातील चित्रपट व करमणूक क्षेत्रातील कंत्राटी फिल्म कामगार आणि ज्युनिअर कलाकारांच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *