Breaking News

देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास, कर्जत जामखेडमध्ये भाजपा परिवर्तन घडविणार शरद पवार गटाचे मधुकर राळेभात, उबाठा चे संजय काशीद यांचा भाजपा प्रवेश

राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार येणार आणि कर्जत जामखेड जागेवर परिवर्तन होऊन भारतीय जनता पार्टीचा उमेदवार निवडून येणार, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी व्यक्त केला.

शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत जामखेड विधानसभा प्रमुख आणि नगर जिल्हा परिषद माजी सदस्य मधुकर राळेभात, उबाठा शिवसेनेचे जामखेड तालुका अध्यक्ष संजय काशीद यांनी अनेक कार्यकर्त्यांसोबत अनेकांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. या पक्षप्रवेश कार्यक्रमामध्ये देवेंद्र फडणवीस बोलत होते.

भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या कार्यक्रमाला भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, महसूल मंत्री आणि नगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री आणि आमदार राम शिंदे, आ. सुरेश धस, आ. अतुल भातखळकर आदी उपस्थित होते. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राळेभात, काशीद आणि त्यांच्यासोबतच्या कार्यकर्त्यांचे पक्षात स्वागत केले.

मधुकर राळेभात यांचे स्वागत करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, कर्जत,जामखेड मध्ये ज्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस रुजवली असे ज्येष्ठ नेते मधुकर राळेभात यांच्या प्रवेशामुळे भाजपाची ताकद वाढणार आहे. भाजपाच्या परिवारात आपण एकजुटीने काम करू अशी ग्वाहीही त्यांनी नव्याने प्रवेश करणा-या सर्वांना दिली. कुकडीच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न महायुती सरकारने केल्याचे नमूद करत देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पश्चिम वाहिनी नद्यांचे वाहून जाणारे ५५ टीएमसी पाणी गोदावरी खो-यात आणण्यासाठी कॅबिनेटने मान्यता दिली आहे. याच्या कामाचे पहिले टेंडरही निघाले असून संपूर्ण जिल्हा जलमय करण्यासाठी महायुती सरकार वेगाने काम करत आहे. महायुती सरकारने शेतकरी हितार्थ घेतलेल्या निर्णयांचा ही उल्लेख केला.

यावेळी राळेभात म्हणाले की, मागच्या निवडणुकीत रोहित पवार यांना निवडून आणण्यासाठी आम्ही जीवाचे रान केले. कुकडीच्या पाण्यासह अनेक समस्या सोडवण्याची त्यावेळी केवळ आश्वासने दिली. गेली मात्र पाच वर्षांत काहीच काम केले नाही. जाती जातीत दरी निर्माण करण्याचे प्रयत्न केले गेले. कार्यकर्त्यांचे खच्चीकरण करण्यात आले. त्यामुळे व्यथित होऊन आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून कर्जत जामखेडच्या विकासासाठी भाजपा मध्ये येण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले.

भाजपा नेतृत्व जे काम सांगेल ते करू, पक्षातर्फे जो उमेदवार दिला जाईल त्याच्या पाठीशी उभे राहू असेही त्यांनी स्पष्ट केले. राळेभात यांच्या सोबत कर्जत – जामखेड तालुक्यातील अनेक सरपंच, नगरसेवक, पदाधिका-यांनी ही भाजपामध्ये प्रवेश केला.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत