द्राक्ष शेतावरील प्लास्टिक आवरणावर अनुदान देण्यास शासन सकारात्मक मंत्री दादाजी भुसे यांची विधानसभेत माहिती

द्राक्ष फळ पीके संवेदनशील आहे. अवकाळी पाऊस, गारपीट तसेच वादळ वारा यामुळे द्राक्ष फळ पिकाचे नुकसान मोठ्या प्रमाणावर होते. द्राक्ष फळ पिकाच्या शेतीवर प्लास्टिक आवरण असल्यास होणारे नुकसान टाळता येऊ शकते. यासाठी शासन प्लास्टिक आवरणासाठी अनुदान देण्यास सकारात्मक आहे, असे मंत्री दादाजी भुसे यांनी आज विधानसभेत तारांकित प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.

द्राक्ष उत्पादकांच्या समस्या बाबत सदस्य रोहित पवार यांनी प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाच्या चर्चेमध्ये सदस्य जयंत पाटील, दिलीप बनकर, विश्वजीत कदम यांनीही सहभाग घेतला.

मंत्री दादाजी भुसे म्हणाले, शेतकऱ्याच्या शेतावर जाऊन काही व्यापारी द्राक्ष माल खरेदी करतात. मात्र काही प्रकरणात शेतकऱ्यांना पैसे न दिल्यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्यास अशा प्रकरणात पोलीस कारवाई करण्यात येते. जुलै ते ऑक्टोबर २०२४ दरम्यान झालेल्या अवकाळी पावसाने नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादकांचे झालेल्या नुकसानीपोटी १९३ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. तसेच नोव्हेंबर ते डिसेंबर २०२४ मध्ये झालेल्या नुकसानीपोटी ९६ लक्ष रुपये नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे. सांगली जिल्ह्यातही या कालावधीत झालेल्या नुकसानीपोटी ८०५ लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर ही मदत जमा करण्याची कार्यवाही गतीने पूर्ण करण्यात येणार आहे.

शेवटी बोलताना दादाजी भुसे म्हणाले, शासन कोरडवाहू शेतीचे नुकसान झाल्यास प्रति हेक्टरी १३ हजार ६००, बागायती २७ हजार ५०० आणि फळबाग नुकसानीपोटी ३६ हजार रुपये नुकसान भरपाई देते. या नियमानुसार फळबाग नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात येईल, असेही सांगितले.

About Editor

Check Also

औषध निरीक्षक परीक्षा पेपरफुटीप्रकरणी आरोपांवर एमपीएससीचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांचा खुलासा एमपीएससी पेपरफुटी प्रकरणी वैयक्तिक आरोप झाल्यानंतर खुलासा केला

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) औषध निरीक्षक परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणावरून माझ्याविरोधात वैयक्तिक आरोप करण्यात येत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *