रायगड जिल्ह्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली महत्वपूर्ण बैठक मंत्री आदिती तटकरे, खासदार सुनील तटकरे यांची विशेष उपस्थिती

रायगड जिल्ह्याच्या रोहा तालुक्यातील जामगाव येथे उभारण्यात येत असलेल्या डॉ. सी. डी. देशमुख जैवविविधता, वने व उद्यान प्रकल्पात राखीव वने तसेच निसर्ग पर्यटनस्थळांच्या विकासाचा ८० कोटींचा सुधारित प्रस्ताव तात्काळ सादर करावा. वित्त विभाग प्रस्तावाची पडताळणी करुन त्वरित मान्यता देईल तसेच आवश्यकतेनुसार निधी उपलब्ध केला जाईल. उपलब्ध ३० कोटींच्या निधीतून  सध्या सुरु असलेली कामे तातडीने पूर्ण करावीत, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रायगड जिल्ह्यातील विविध विकासकामांना गती देण्यासाठी मंत्रालयात आयोजित बैठकीत दिले.

रायगड जिल्ह्यातील विकासकामांबाबत बैठकीत चर्चा

रायगड जिल्ह्याच्या रोहा तालुक्यातील जामगाव येथील डॉ. सी. डी. देशमुख जैवविविधता, वने व उद्यान प्रकल्पातील विकासकामे, रोहा तालुक्यातील मौजे तिसे येथील केदारजननी माता देवस्थानाच्या ठिकाणी रोपवेची उभारणी करणे, रोहा तालुक्यातील मौजे संभे या दरडप्रवण गावाचे सुरक्षिततेच्या कारणास्तव पुनर्वसन करणे, तळा तालुक्यात गिरणे येथे डॉ. बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठांतर्गत खारभूमी संशोधन केंद्राची उभारणी, श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर येथे केंद्र शासन पुरस्कृत स्वदेश दर्शन योजनेतून मत्स्यालय, पर्यटक निवारा केंद्राची निर्मिती, मुरुड तालुक्यातील पद्मदुर्ग किल्याचा समावेश गडकोट किल्लेसंवर्धन योजनेत करण्यासह मुरुड किल्ला परिसर आणि राजापूरी ग्रामपंचायत क्षेत्रातील अडचणी सोडवण्यासंदर्भात आज एका विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीला महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, कृषीमंत्री माणिकराव कोकाटे, खासदार सुनील तटकरे, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, नगरविकास विभागाचे अपर मुख्य सचिव असीमकुमार गुप्ता, मदत व पुनर्वसन विभागाच्या अपर मुख्य सचिव डॉ. सोनीया सेठी,  वित्त विभागाचे प्रधान सचिव सौरव विजय, उपमुख्यमंत्री कार्यालयाचे सचिव डॉ. राजेश देशमुख, पर्यटन विभागाचे प्रधान सचिव अतुल पाटणे, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, कोकणचे विभागीय आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी, रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे आदींसह शासनाच्या संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

डॉ. सी. डी. देशमुख जैवविविधता, वने व उद्यानाचा विकास

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठकीत संबंधित विषयांचा सखोल आढावा घेतला. कोकणचे सुपुत्र, थोर अर्थतज्ज्ञ डॉ. चिंतामणराव देशमुख यांच्या कार्याच्या स्मतीप्रित्यर्थ जामगाव येथे उभारण्यात येत असलेल्या जैवविविधता आणि वनउद्यानासाठी निधीची उणीव भासू देणार नाही. सध्या सुरु असलेली कामे तातडीने पूर्ण करावीत. निसर्गपर्यटनाचा प्रस्ताव तात्काळ शासनाकडे पाठवावा. प्रस्तावाची पडताळणी करुन तातडीने मान्यता देण्यात येईल. आवश्यतेनुसार टप्प्याटप्याने निधी उपलब्ध केला जाईल. यासंदर्भातील प्रशासकीय कार्यवाही तातडीने पूर्ण करावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

तिसे येथील केदारजननी माता देवस्थान परिसरात रोपवे

रोहा तालुक्यातील मौजे तिसे येथील केदारजननी माता देवस्थानाच्या ठिकाणी रोपवे उभारणीसंदर्भातही बैठकीत चर्चा झाली. केंद्र शासनाच्या पर्वतमाला योजनेंतर्गत राज्यात  कळसूबाई, हरिश्चंद्रगड, माथेरान, सिंहगड, शिवनेरी, राजगड, भीमाशंकर, लेण्याद्री, जेजुरी, निमगाव खंडोबा आदी ४५ ठिकाणी रोपवे प्रकल्प प्रस्तावित करण्यात आले आहेत. या यादीत तिसे येथील केदारजननी माता देवस्थानचा समावेश करण्यासंबंधीचा प्रस्ताव सादर करावा.  तो शासनाच्या मंजूरीसह केंद्र शासनाकडे पाठविण्यात येईल. हा प्रकल्प तातडीने मार्गी लावण्यासाठी वनविभागाकडून आवश्यक परवानगी मिळविण्याची कार्यवाही तातडीने सुरु करावी, असे निर्देशही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

संभे गावाचे सुरक्षित स्थलांतर व पुनर्वसनाचे निर्देश

रोहा तालुक्यातील मौजे संभे गावाला भूस्खलन आणि दरड कोसळण्याचा असलेला धोका लक्षात घेऊन सुरक्षिततेसाठी सदर गावाचे स्थलांतर आणि पुनर्वसनाची कार्यवाही युद्धपातळीवर करावी. यासाठी आवश्यक प्रशासकीय बाबी तातडीने पूर्ण करुन घ्यावात. राज्य शासनासाठी नागरिकांचा जीव वाचवणे सर्वात महत्वाचे असल्याने धोकादायक गावांच्या स्थलांतर, पूनर्वसनासंदर्भात कोणताही हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही, असा इशाराही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला.

तळा तालुक्यातील गिरणे येथे खारभूमी संशोधन केंद्र

तळा तालुक्यात गिरणे येथे डॉ. बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठांतर्गत खारभूमी संशोधन केंद्राची उभारणीबाबतही बैठकीत चर्चा करण्यात आली. विद्यापीठाची जमीन अधिग्रहीत करताना सिडकोकडून देण्यात आलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यात येईल. विद्यापीठाला शेती, शेतीसंशोधन, शेती विस्तार, खारभूमी संशोधन केंद्रासाठी आवश्यक जमीन आणि मूलभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यात येतील. त्यासाठी लागणारा निधी सिडको आणि राज्य शासन देईल. यासंबंधीचा वस्तूनिष्ठ प्रस्ताव विद्यापीठाने सादर करावा, त्यावर राज्य शासन सकारात्मक निर्णय घेईल, असेही बैठकीत ठरले.

पद्मदुर्गचा समावेश गडकोट किल्ले संवर्धन योजनेत करणार

मुरुड तालुक्यातील पद्मदुर्ग किल्याचं ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेऊन या किल्ल्याचा समावेश गडकोट किल्लेसंवर्धन योजनेत करण्याचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला पद्मदूर्ग किल्ला बघण्याची अनेक इतिहासप्रेमी व पर्यटकांची इच्छा असते, जेट्टीचा अभाव आणि पुरेशा सोयींअभावी त्यांना पद्मदूर्ग किल्ल्यावर जाता येत नाही. त्यासाठी पद्मदूर्ग किल्ल्यावर जाण्यासाठी पर्यटनजेट्टी उभारण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे विचाराधीन आहे. त्यास केंद्र शासनाच्या पूरातत्व विभागाकडून मंजूरी मिळवण्याची कार्यवाही तातडीने पूर्ण करावी, असे निर्देशही उपमुख्यमंत्र्यांनी दिले. मुरुड किल्ला परिसर आणि राजापूरी ग्रामपंचायत क्षेत्रातील अडचणी सोडवण्यासंदर्भात  तसेच श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर येथे केंद्र शासन पुरस्कृत स्वदेश दर्शन योजनेतून मत्स्यालय, पर्यटक निवारा केंद्र उभारण्याबाबतही बैठकीत चर्चा करण्यात आली. यासंदर्भात आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संबंधित विभागांचे अधिकारी तसेच रायगडचे जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना दिले आहेत.

About Editor

Check Also

रोहित पवार यांचा आरोप, अजित पवार यांच्या विमान अपघातात प्रभावशाली लोक या मंत्र्याचा राजीनामा घ्यावा

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाला. मात्र या विमान अपघातावरून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *