राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंविरोधात विडंबनात्मक गाणे केल्याप्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यासाठी हास्यकलाकार कुणाल कामराने दाखल केलेल्या याचिकेची उच्च न्यायालयाने दखल घेतली. पोलीस, तक्रारकर्ते तथा शिवसेना आमदार मुरजी पटेल यांना न्यायालयाने नोटीस बजावली आणि भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले.
कुणाल कामराच्या याचिकेवर उच्च न्यायालयाचे न्या. सारंग कोतवाल आणि न्या. एम. एस. मोडक यांच्या खंडपीठासमोर मंगळवारी तातडीने सुनावणी झाली. प्रतिवादींना (पोलिस आणि पटेल) नोटीस बजावा त्यावर ते सूचना घेतील आणि उत्तर सादर करतील, असे स्पष्ट करून न्यायालयाने सुनावणी १६ एप्रिल रोजी ठेवली.
तत्पूर्वी, मद्रास उच्च न्यायालयाने सोमवारी हास्य कलाकारला दिलेले अटकेपासूनचे अंतरिम संरक्षण १७ एप्रिलपर्यंत वाढवले असल्याची माहिती कुणाल कामराच्या वतीने वरिष्ठ वकील नवरोज सिरवई यांनी उच्च न्यायालयाला दिली. दुसरीकडे , कुणाल कामरा हा सध्या तमिळनाडू मध्ये आहे. २०२१ पासून ते तिथे वास्तव्यास आहे. या प्रकरणामुळे याचिकाकर्त्याच्या जीवाला धोका आहे. या धोक्याच्या पार्श्वभूमीवर व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे ( व्हिसी ) चौकशीसाठी हजर राहण्याची परवानगी तीनवेळा पोलिसांकडे लेखी स्वरूपात मागण्यात आली. परंतु जी अद्याप त्यावर कोणतेही उत्तर मिळाले नाही. हा खूनाशी संबंधित खटला नाही. हा एका स्टँड-अप कॉमेडी शोमध्ये केलेल्या विडंबनात्मक गाण्यातून दाखल केलेला एफआयआर आहे. त्यासाठी कामरा व्हिसीद्वारे चौकशीत सहकार्य करण्यास तयार आहेत. परंतु, पोलीस अधिकारी कामराचा जबाब नोंदवण्यासाठी नव्हे तर त्याला प्रत्यक्ष रित्या मुंबईत आणण्यास अधिक उत्सुक आहेत, असा दावाही सेरवाई यांनी केला. त्यांचा युक्तिवाद थोडक्यात ऐकून घेतल्यानंतर पुढील सुनावणीला सर्व मुद्द्यांवर विचार केला जाईल, असे स्पष्ट करून न्यायालयाने प्रतिवाद्याना नोटीस बजावली आणि सुनावणी तहकूब केली.
प्रकरण काय ?
कुणाल कामराने आपल्या कार्यक्रमामध्ये राज्यातील राजकीय परिस्थितीवर भाष्य करत टीका केली होती. यामध्ये कामराने शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फुटीचा संदर्भ देताना महाराष्ट्राच्या निवडणुकीत त्यांनी काय केलं आहे, त्यांना सांगावं लागेल. आधी शिवसेना भाजपामधून बाहेर पडली, नंतर शिवसेना शिवसेनेतून बाहेर पडली. राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रवादीतून बाहेर पडली, असे म्हणत कुणाल कामराने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत एक व्यंगात्मक गाणेही केलं होते. मात्र, व्यंगात्मक गाणे सादर केल्यानंतर शिवसेनेच्या (शिंदे) कार्यकर्त्यांनी मुंबईतील खारमधील स्टुडिओची तोडफोड केली होती. तसेच, कामराविरोधात आमदार मुरजी पटेल यांनी खार पोलिसांकडे एफआयआर दाखल केली असून ती रद्द करण्यासाठी कामराने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
Marathi e-Batmya