आशिष शेलार यांची माहिती, टास्क फोर्सच्या अहवालानंतर सोशल मीडिया नियंत्रणाबाबत धोरण ठरणार लहान मुलांच्या संदर्भात तयार करणार ठोस धोरण

राज्यातील अल्पवयीन मुलांच्या सोशल मीडिया वापरावर नियंत्रण आणण्याबाबत शासनाने नेमलेल्या टास्क फोर्सच्या अहवालानंतरच ठोस धोरण किंवा कायदा तयार केला जाईल, अशी माहिती माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी विधानसभेत दिली.

विधानसभेत सदस्य राजेश पवार यांनी सोशल मीडिया, ऑनलाइन गेम्स आणि डिजिटल प्लॅटफॉर्मच्या वाढत्या वापरामुळे अल्पवयीन मुलांवर होणाऱ्या परिणामांबाबत लक्षवेधी उपस्थित केली होती.

मंत्री ॲड. आशिष शेलार म्हणाले, इतर राज्यांनी सोशल मीडिया वापर बंदीसंबंधी केवळ घोषणा केल्या असून, ठोस कायदे अद्याप अस्तित्वात आणलेले नाहीत. मात्र, महाराष्ट्राने या विषयाकडे गांभीर्याने पाहत २ फेब्रुवारी २०२६ रोजी टास्क फोर्स स्थापन केला आहे. या टास्क फोर्सकडून अल्पवयीन मुलांचा सोशल मीडिया वापर, त्याचे मानसिक, शारीरिक व शैक्षणिक परिणाम तसेच डिजिटल जाहिरातींचा प्रभाव यांचा अभ्यास करण्यात येत आहे. तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय नियमांचा अभ्यास करून योग्य कायदेशीर, तांत्रिक व प्रशासकीय उपाय सुचवले जाणार आहेत.

शेवटी बोलताना आशिष शेलार म्हणाले की, १८ वर्षांखालील युवाशक्तीच्या सोशल मीडिया किंवा मोबाईल वापरावर सरसकट बंदी घालणे योग्य ठरणार नाही, कारण शिक्षण व्यवस्थेत इंटरनेटचा महत्त्वाचा उपयोग आहे. त्यामुळे संतुलित दृष्टिकोन ठेवणे आवश्यक आहे. टास्क फोर्सला तीन महिन्यांचा कालावधी देण्यात आला असून, त्याच्या अहवालानंतर राज्य शासन राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय नियामक चौकटीचा अभ्यास, माहिती तंत्रज्ञान कायदे सुधारणा, एज व्हेरिफिकेशन, स्क्रीन टाइम लिमिट, तसेच शाळांमध्ये डिजिटल सेफ्टी शिक्षण यासारख्या उपाययोजनांवर निर्णय घेईल. तसेच विद्यार्थ्यांसह शिक्षक आणि पालकांसाठीही डिजिटल सुरक्षिततेबाबत प्रशिक्षण आणि जनजागृती कार्यक्रम राबवण्याबाबत विचार सुरू असल्याचे सांगितले.

या प्रश्नाच्या चर्चेत सदस्य समाधान आवताडे यांनी सहभाग घेतला.

About Editor

Check Also

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती, एसटीच्या अतिरिक्त जमिनींच्या व्यावसायिक विकासाला वेग • पीपीपी तत्वावर विकासातून एसटीला भरीव उत्पन्नाचा नवा स्रोत • प्रत्येक जागेसाठी स्वतंत्र निविदा बंधनकारक

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ताब्यातील अतिरिक्त जमिनींचा अधिकाधिक व्यावसायिक वापर करून महामंडळाचे उत्पन्न वाढविण्याच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *