मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत उद्योग विभाग- एएम इंटेलिजन्स लॅब यांच्यात सामंजस्य करार महाराष्ट्रात १.१४ लाख कोटींची गुंतवणूक; ८,००० जणांना मिळणार रोजगार!

राज्याच्या औद्योगिक आणि तंत्रज्ञान क्षेत्राला मोठी गती देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्योग विभाग आणि ‘एएम इंटेलिजन्स लॅब्ज प्रायव्हेट लिमिटेड’ समवेत १ लाख १४ हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा सामंजस्य करार  आज झाला.

मुख्यमंत्री समिती कक्षात झालेल्या या कराराच्या वेळी उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ.पी. अन्बळगण, उद्योग विकास आयुक्त दीपेंद्रसिंह कुशवाह, सहसचिव डॉ.श्रीकांत पुलकुंडवार, सहसचिव लक्ष्मीकांत ढोके, एएम इंटेलिजन्स लॅब्जचे अध्यक्ष अनिल चलमलाशेट्टी, संचालक मौर्य पायदा, उपाध्यक्ष पंकज कुमार आदी उपस्थित होते. या प्रकल्पामुळे राज्यात तब्बल ८ हजार प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहे.

या सामंजस्य करारामुळे मुंबई महानगर प्रदेशात (MMR) ‘इंटिग्रेटेड ग्रीन डेटा सेंटर पार्क’ आणि ‘एआय कॉम्प्युट हब’ उभारला जाणार आहे. यासाठी कंपनी १,१४,००० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. हा प्रकल्प पूर्णपणे अक्षय ऊर्जेवर आधारित असेल, ज्यामुळे पर्यावरणाचे रक्षणही होईल.उच्च तंत्रज्ञान क्षेत्रात कुशल आणि निमकुशल अशा ८ हजार तरुणांना रोजगाराची संधी मिळणार आहे. यामध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर्स, डेटा सायंटिस्ट आणि ऑपरेशन्स टीमचा समावेश असेल. प्रकल्पाच्या बांधकाम कालावधीत सुमारे २ हजार अतिरिक्त रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.

हा प्रकल्प ५०० मेगावॅट क्षमतेचा असून यामध्ये २,५०,००० उच्च क्षमतेचे ‘एआय चिपसेट्स’ वापरले जातील. तसेच या प्रकल्पाचा दोन टप्प्यांत विकास करण्यात येईल. २०० मेगावॅट क्षमतेचा पहिला टप्पा सन २०२८ पर्यंत तर ३०० मेगावॅट क्षमतेचा दुसरा टप्पा २०३० पर्यंत पूर्ण करण्यात येणार उद्दिष्ट आहे.

हा प्रकल्प राज्याच्या माहिती तंत्रज्ञान धोरण २०२३ तसेच हरित एकात्मिक डेटा सेंटर पार्क धोरण २०२४ अंतर्गत विकसित करण्यात येणार आहे. महाराष्ट्राला कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रात राष्ट्रीय व जागतिक स्तरावर अग्रस्थानी नेण्याचा उद्देश या प्रकल्पामागे आहे.

About Editor

Check Also

विशाल, अतिविशाल प्रकल्पांना विशेष प्रोत्साहन; १८ प्रस्तावांना मुख्यमंत्र्यांची मंजुरी महाराष्ट्रात ₹२.५६ लाख कोटींची गुंतवणूक आणि १ लाखांहून अधिक रोजगारनिर्मितीचे लक्ष्य

राज्यात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक आकर्षित करून रोजगारनिर्मितीला चालना देण्यासाठी तब्बल ₹२,५६,१३७.०१ कोटींच्या १८ विशाल व …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *