वर्षा गायकवाड यांची मागणी, एसआयआर नोंदणी, रोल बॅक व दावे हरकतीसाठी कालावधी वाढवून द्या ‘शहरी नक्षलवादी’, ‘दिमागी नक्षलवादी’, असे शब्द पंतप्रधानांच्या तोंडी येतातच कसे? देशाचे भविष्य असलेले विद्यार्थी दिमागी नक्षलवादी आहेत का?

महाराष्ट्रात पुढील तीन वर्षांत कोणत्याही निवडणुका होणार नाहीत, असे असताना निवडणूक आयोग ‘एसआयआर’ (SIR) प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी इतकी घाई का करत आहे? मुंबईतील प्रत्येक नागरिकाचे नाव योग्यरित्या नोंदवले जाईपर्यंत ही प्रक्रिया सुरुच ठेवली पाहिजे. मतदान हा प्रत्येकाचा घटनात्मक अधिकार आहे आणि तो हिरावून घेण्याचा अधिकार कोणालाही नाही, त्यामुळे १७ ऑगस्टची मुदत संपली असली तरी ही मुदत वाढवावी, असे मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी म्हटले आहे.

मुंबई काँग्रेसच्या संसदीय कामकाज समितीची बैठक मुंबई काँग्रेस अध्यक्ष खा. वर्षा गायकवाड, AICC चे मुंबई प्रभारी यू. बी. व्यंकटेश, माजी मंत्री अस्लम शेख, CWC सदस्य नसीम खान, आमदार अमिन पटेल, राजेश शर्मा यांच्या उपस्थितीत पार पडली. या बैठकीत राजकीय, सामाजिक प्रश्न यासह मुंबई शहरातील समस्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

बैठकीची माहिती देताना खासदार वर्षा गायकवाड पुढे म्हणाल्या की, निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमानुसार मतदारांना गणना प्रपत्र भरून देण्याची मुदत १७ ऑगस्ट २०२६ रोजी संपली आहे परंतु मुंबईत एसआयआरचे काम पूर्ण झालेले नाही, आजही लाखो मतदारांचे अर्ज भरलेले नाहीत. शहरातील काही भागातून हजारो नावे स्थलांतरीत/मृत दाखवून ती वगळण्यात आली आहेत.काही भागात BLO यांनी घरोघरी जाऊन अर्ज भरून घेतलेले नाहीत, किंवा घरोघरी जाऊ शकले नाहीत.कोणाचेही नाव योग्य कागदपत्र असतानाही मतदार यादीतून वगळले जाणार नाही याची खबरदारी घेणे आवश्यक आहे. निवडणूक आयोगाने दावे/हरकती दाखल करण्याचा कालावधी २४ ऑगस्ट ते २३ सप्टेंबर २०२६ आहे,या कालावधीत दहीहंडी, रक्षाबंधन, गणेशोत्सव आहेत, त्यामुळे या कालावधीत दावे व हरकती दाखल करण्यास अडचणी येतील, त्यामुळे हा कालावधी एक महिना वाढवून द्यावा. स्थलांतर झालेल्या पण त्यांची नावे मतदार यादीत समाविष्ट करण्यात आलेली नाहीत त्यांची नावे समाविष्ट करावीत, सर्व बीएलए यांच्या कामाचा त्वरीत आढावा घ्यावा आणि सर्व पात्र मतदारांना अर्ज मिळाले आहेत याची खातरजमा करावी, असे खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या. यासंदर्भात मुंबई काँग्रेसने राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांना पत्र पाठवले आहे.

वर्षा गायकवाड पुढे बोलताना म्हणाल्या की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ ऑगस्टच्या स्वांतत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून भाषण करताना ‘दिमागी नक्षलवादी’ असा शब्द प्रयोग केला, त्याचा समाचार घेत खा वर्षा गायकवाड पुढे म्हणाल्या की, आधी शहरी नक्षलवादी म्हटले आता दिमागी नक्षलवादी असे म्हटले आहे, असे शब्दप्रयोग पंतप्रधानांच्या तोंडी येतातच कसे? संविधानाने जनतेला दिलेल्या स्वातत्र्यांची गळचेपी करण्याचा हा प्रकार आहे, महाराष्ट्रातही अशाच पद्धतीचे विधेयक आणण्यात आले होते. विद्यार्थी हे देशाचे भविष्य आहेत, त्यांनाच दिमागी नक्षलवादी ठरवले जात आहे, हे आक्षेपार्ह असल्याचे सांगितले.

आजच्या बैठकीत चार प्रस्ताव मंजूर करण्यात आले. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी उत्तराखंड येथील हल्दवानी येथे घेतलेल्या रॅलीच्या सभास्थळी तथाकथित शुद्धीकरण करून त्यांचा अपमान करण्यात आला, या घटनेचा निषेध करण्यात आला. मुंबईतील बेस्ट उपक्रमाचे सुरु असलेले खाजगीकरण थांबवावे हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला तसेच विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी विद्यार्थांसाठी सुरु केलेल्या ‘छात्रों की गुंज’ या २२ तारखेला पुण्यात होणाऱ्या अभियानात विद्यार्थीनींनी मोठ्या संख्यने सहभागी व्हावे, असे आवाहन करणारा प्रस्तावही मंजूर करण्यात आला. मुंबईत मोकळ्या जागांची तीव्र कमतरता असतानाही मोकळ्या जागांचे आरक्षण रद्द केले जात आहे, हा शहरी पर्यावरण विषयक अन्यायापेक्षा कमी नाही. मोकळे भूखंड विकण्याचे, आरक्षण बदलण्याचे काम बीएमसीने थांबवावे असाही प्रस्ताव या बैठकीत मांडण्यात आला.

About Editor

Check Also

मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, मेट्रो आता वसई-विरारपर्यंत धावणार मीरा भाईंदर ते वसई-विरार मेट्रो मार्ग १३ आणि पुणे रिंगरोडच्या विस्तारीकरणास पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत मान्यता

मुंबई महानगरप्रदेशातील वाहतुकीला चालना देण्यासाठी मेट्रो १३ -मिरा भाईंदर ते वसई विरार या प्रकल्पास तसेच …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *