हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी, अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयातील जळीतकांडाची सखोल चौकशी करून शिक्षा करा राज्याचे आरोग्य मंत्री कुठे आहेत? रुग्णालयाच्या फायर ऑडिटचे काय झाले? जळीतकांडाची जबाबदारी मुख्यमंत्र्यांनी घ्यावी

अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयात आग लागून तीन नवजात बालकांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत वेदनादायी व संताप आणणारी आहे. भंडाऱ्यातील रुग्णालयात असाच प्रकार झाल्यानंतर राज्यातील सर्व रुग्णलयाचे फायर ऑडिट करण्याचे आदेश सरकारने दिले होते, त्याचे काय झाले, कशा प्रकारे फायर ऑडिट करण्यात आले. या जळीत कांडांशी संबधितांची सखोल चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली.

प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपा सरकारचा समाचार घेतला, ते म्हणाले की,एकीकडे गर्भपात करू नये यासाठी अभियान राबविले जाते तर दुसरीकडे नवजात बालके जळून मृत्यू पावतात हे अत्यंत दुर्दैवी आहे.राज्यात सरकार, प्रशासन, कायद्याचा धाक कुठेच अस्तित्वात राहिलेला नाही. केवळ दंडेलशाही आणि सत्तेची मस्ती सुरु आहे. राज्याचा आरोग्य मंत्री कोण हे महाराष्ट्राला माहित नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फक्त मोठ्या गप्पा मारतात. अमरातवी जळीत कांडात नवजात बालकांचा जळून मृत्यू झाला हे पाप भाजपा सरकारचेच आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेची जबाबदारी घेऊन प्रायश्चित घेतले पाहिजे.

सणासुदीत साखर महाग..

हर्षवर्धन सपकाळ पुढे बोलताना म्हणाले की, राज्यात सध्या सणासुदीचे दिवस आहेत आणि सारखचे भाव मात्र गगनाला भिडले आहेत. ४० रुपये किलोची साखर अचानक ८० रुपयावर गेली व १०० रुपयांवर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. या महागाईस भाजपा सरकारची धोरणेच जबाबदार आहेत. सरकारचे महागाईवर नियंत्रण नाही, मुठभर उद्योगपतींचे भले करणे हेच भाजपा सरकारचे काम आहे.सामान्य जनतेला महागाईचा फटका बसतोय त्याचे सरकारला काहीही पडलेले नाही. ६० रुपयांचे पेट्रोल ११० रुपये झाले, ४५० रुपयांचा सिलेंडर १ हजारावर गेला आहे, त्याप्रमाणे साखरही महागली आहे पण सरकार मात्र झोपेतच आहे.

देवेंद्र फडणवीसांची बेताल वक्तव्ये…

पुढे बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बोलघेवडे म्हणायचे असेल पण त्यांनी राहुल गांधींचे नाव घेतले. ना खाऊंगा, ना खाणे दुंगा, प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रुपये जमा करणार, दरवर्षी २ कोटी रोजगार, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार, १०० स्मार्ट सीटी उभारणार हे नरेंद्र मोदी म्हणाले होती. म्हणजे बोलघेवडेपणा तर मोदी यांनी केला. उलट राहुल गांधी यांनी कोरोनाचे संकट, नोटबंदीमुळे देशाचे होणारे आर्थिक नुकसान, ऑपरेशन सिंदूर, अमेरिकेच्या दबावासमोर मोदी सरकार झुकले हे सांगितले होते व काळाच्या कसोटीवर ते तंतोतंत खरे ठरले आहे पण फडणवीस यांनी ‘वड्याचे तेल वांग्यावर काढले’. वास्तविक पाहता राहुल गांधी यांचा पुण्यातील कार्यक्रम प्रचंड यशस्वी झाला. भाडोत्री कार्यकर्त्यांकडून हिंसा पसरवण्याचा भाजपाने प्रयत्न केला.तरीही कार्यक्रम प्रचंड यशस्वी झाला, त्यामुळे भाजपाच्या पायाखालची वाळू सरकारली आहे म्हणून फडणवीस बेताल वक्तव्ये करत आहेत. पैसे देऊन गर्दी केल्याची चौकशी करु असे त्यांनी म्हटले आहे तर त्यांनी खुशाल चौकशी करावी सरकार त्यांचेच आहे, असेही म्हणाले

फडणवीसांनी विद्यार्थिनींची माफी मागावी..

हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांच्या पुण्यातील ‘छात्रों की गुंज’ या विद्यार्थीनींसाठी विशेष कार्यक्रमास केवळ पुणेच नव्हे तर महाराष्ट्रातील विद्यार्थिनींचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. त्यामुळे पोटशूळ उठलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘पैसे देऊन विद्यार्थिनींची गर्दी केली’ असा बिनबुडाचा विषारी आरोप करून सावित्रींच्या लेकींचा घोर अपमान केला आहे. मुलींचा अपमान करणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर माफी मागावी अशी मागणीही यावेळी केली.

About Editor

Check Also

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत ढोल ताशाला जागतिक नामांकन इंडिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स व एशिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद

शिक्षण कौशल्य, क्रीडा स्टार्टअप आदी क्षेत्रात युवा पिढीचा सकारात्मक सहभाग आहे. त्यांचा हा सहभाग वाढविण्यासोबतच …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *