बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कूपर आणि सायन रुग्णालयांसाठी क्ष-किरण यंत्रे खरेदी प्रकरणी दोन वर्षांच्या विलंबाकडे समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी लक्ष वेधले. रोग निदानासाठी आवश्यक असलेल्या उपकरणांच्या अभावामुळे रुग्णांचा जीव धोक्यात आला असून अनेकांना खाजगी रुग्णालयांत महागड्या उपचारांचा आधार घ्यावा लागत आहे, असा आरोप आमदार रईस शेख यांनी केला.
आमदार रईस शेख म्हणाले की, यंत्रांच्या प्रदीर्घ विलंबाप्रकरणी अलीकडच्या काळापर्यंत आरोग्य आणि मध्यवर्ती खरेदी (सेंट्रल परचेस) या दोन्ही विभागांची जबाबदारी सांभाळणारे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त विपिन शर्मा यांच्या भूमिकेची चौकशी करण्याची मागणीही केली.
पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांना लिहिलेल्या पत्रात आमदार रईस शेख यांनी नमूद केले आहे की, या दोन यंत्रांची अंदाजित किंमत ३ कोटी रुपये होती. निविदा प्रक्रियेत ‘कोनिका मिनॉल्टा’ या जपानी कंपनीने प्रतिसाद दिला होता. तत्कालीन अतिरिक्त महानगरपालिका आयुक्तांच्या (पश्चिम उपनगरे) मंजुरीनंतर उघडण्यात आलेली या कंपनीची दर-निविदा अंदाजित किमतीपेक्षा १९ टक्के कमी होती.
आमदार रईस शेख पुढे आपल्या पत्रात म्हणाले की, जेव्हा ती फाईल ‘डीएल’ प्रक्रियेसाठी पाठवण्यात आली, तेव्हा अतिरिक्त महानगरपालिका आयुक्तांनी निविदा रद्द करण्याचे निर्देश दिले. या निर्णयामुळे कोणतेही समर्थनीय कारणे नसताना अत्यावश्यक दोन यंत्रांच्या खरेदीची प्रक्रिया मात्र विनाकारण रखडली गेली, असा आरोपही यावेळी केली.
पुढे आपल्या पत्रात आमदार रईस शेख म्हणाले की, एकाच निविदाकाराचा सहभाग असलेल्या अन्य एका खरेदी प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर, निविदा रद्द करण्याच्या पालिकेच्या निर्णयावर आमदार शेख प्रश्नचिन्ह उपस्थित केले. अनेस्थेशिया वर्कस्टेशन्ससाठी चिनी कंपनी ‘माइंड्रे’ची एकमेव निविदा मंजूर करण्यात आली आणि त्याच काळात ‘डीएल’ प्रक्रियाही सुरू करण्यात आली. या विसंगतीमुळे निविदा प्रक्रियेबाबत अनेक शंका निर्माण झाल्या आहेत. कारण जपानी कंपनीला अन्यायकारकपणे लक्ष्य केल्याचे दिसून येते, असे पत्रात नमूद केले.
आमदार रईस शेख म्हणाले की, सायन आणि कूपर रुग्णालयांमधील रेडिओलॉजी विभागांचे प्रमुख आणि अधिष्ठाता यांनी या यंत्रांची आवश्यकता अधोरेखित केली होती. आपत्कालीन आणि ट्रॉमा केसेस, बालरोग विभाग, शस्त्रक्रिया कक्ष आणि अतिदक्षता विभाग यांच्यासाठी ही यंत्रे गरजेची होती. असे असतानाही खरेदीत विलंब करण्यात आल्याचा ठपका ठेवण्यात आला.
शेवटी आमदार रईस शेख म्हणाले की, रोग निदानासाठी आवश्यक असलेल्या उपकरणांच्या अभावाचा रुग्णांवर परिणाम होत आहे. त्यांना उपचारांसाठी विलंब सहन करावा लागत असून खाजगी रुग्णालयांमध्ये क्षमतेबाहेर खर्च करावा लागत आहे. ही केवळ प्रशासकीय अकार्यक्षमता नसून मुंबईतील सार्वजनिक आरोग्याला असलेला थेट धोका असल्याचा गंभीर आरोपही पत्रामध्ये केला.
Marathi e-Batmya