महाराष्ट्राची जीवनवाहिनी असलेल्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाला (एसटी) आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम करण्यासाठी उत्पन्नवाढीवर भर देतानाच खर्चातही काटकसर करणे आवश्यक आहे. त्यासाठी पारंपरिक कार्यपद्धतीच्या चौकटीबाहेर जाऊन नाविन्यपूर्ण प्रयोग राबवावेत. विशेषतः विनावाहक बससेवेला प्राधान्य देऊन मनुष्यबळावरील खर्चात बचत करण्याबरोबरच प्रवाशांना अधिक सुलभ आणि गतिमान सेवा उपलब्ध करून द्यावी, असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले.
एसटी महामंडळाच्या आर्थिक स्थितीत सुधारणा करण्यासाठी विविध उपाययोजनांचा आढावा घेताना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ही भूमिका मांडली. ‘एसटी’ची आर्थिक घडी मजबूत करण्यासाठी उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण करणे, अनावश्यक खर्चाला आळा घालणे आणि उपलब्ध मनुष्यबळ व संसाधनांचा कार्यक्षम वापर करणे, या तिन्ही बाबींवर एकाच वेळी लक्ष केंद्रित करण्याची गरज व्यक्त केली.
पुढे बोलताना प्रताप सरनाईक म्हणाले की, एसटीला आर्थिकदृष्ट्या सक्षम करायचे असेल तर केवळ तिकीट दरवाढ हा पर्याय असू शकत नाही. प्रवाशांना अधिक चांगली सेवा देत उत्पन्न वाढवणे आणि त्याचवेळी खर्च कमी करणे, हा शाश्वत मार्ग आहे, असे सांगितले.
प्रताप सरनाईक पुढे बोलताना म्हणाले की, विनावाहक बससेवेमुळे काही मार्गांवरील वाहकाचा खर्च कमी होण्यास मदत होऊ शकते. डिजिटल तिकीट प्रणाली, क्यूआर कोड, स्मार्ट कार्ड तसेच इतर आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून ही सेवा अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने नियोजन करावे, असेही सांगितले.
पुढे बोलताना प्रताप सरनाईक म्हणाले की, ‘एसटी’चा आर्थिक तोटा कमी करण्यासोबतच प्रवाशांचा ‘एसटी’वरील विश्वास अधिक दृढ होणे गरजेचे आहे. त्यासाठी प्रवाशांच्या गरजा, बदलती प्रवासाची पद्धत आणि स्थानिक मागणी लक्षात घेऊन प्रवासीभिमुख योजना राबवाव्यात, असे निर्देश दिले.
शेवटी बोलताना प्रताप सरनाईक म्हणाले की, प्रवाशांना वेळेत, सुरक्षित, स्वच्छ आणि विश्वासार्ह सेवा मिळणे ही एसटीची प्राथमिक जबाबदारी आहे. एसटी ही केवळ सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नसून महाराष्ट्राच्या सर्वसामान्य जनतेच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग आहे. त्यामुळे तिचे आर्थिक बळकटीकरण करताना प्रवाशांच्या हिताशी कोणतीही तडजोड न करता आधुनिक, कार्यक्षम आणि किफायतशीर सेवा देण्यावर भर राहील, असे सांगितले.
Marathi e-Batmya