मतदारयाद्यांमध्ये फेरफार करून लोकशाहीची हत्या करणारे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्या विरोधात काँग्रेस पक्षाने आक्रमक भूमिका घेतली आहे. आज राज्यभर जिल्हाधिकारी कार्यालयांवर काँग्रेस पक्षाने मोर्चे काढून निषेध व्यक्त केला. अमरावती येथे ज्ञानेशकुमार यांच्या पुतळ्याची गाढवावरून धिंड काढण्यात आली. ठाण्यात ज्ञानेशकुमार यांच्या पुतळ्याला उठाबशा काढायला लावल्या. पुणे, कोल्हापूर, सोलापूर, नाशिक, नागपूरसह राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये निषेध मोर्चे काढण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन ज्ञानेशकुमार यांना सेवेतून तत्काळ बडतर्फ करून अटक करा, अशी मागणी करण्यात आली.
कोल्हापूर येथे विधान परिषदेतील काँग्रेस पक्षाचे गट नेते, माजी मंत्री आ. सतेज ऊर्फ बंटी पाटील यांच्या नेतृत्वाखाली, सोलापूर येथे काँग्रेस वर्किंग कमिटीच्या सदस्या खासदार प्रणिती शिंदे, अमरावती येथे काँग्रेस वर्किंग कमिटीच्या सदस्या माजी मंत्री अॅड. यशोमती ठाकूर, खा. बळवंत वानखेडे, छत्रपती संभाजीनगर येथे खा. डॉ. कल्याण काळे, चंद्रपूर येथे खा. प्रतिभा धानोरकर, नांदेड येथे खा. रविंद्र चव्हाण, लातूर येथे खा. डॉ. शिवाजी काळगे, ठाणे येथे माजी खा. कुमार केतकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आंदोलन करण्यात आले यासोबतच पुणे, नाशिक, बीड, लातूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, धाराशिव, यवतमाळ, हिंगोली, जालना, परभणी, बीड, पालघर, नंदुरबार, भंडारा, अकोलायासह राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्या विरोधातील एल्गार मोर्चात पक्षाचे वरिष्ठ नेते, माजी मंत्री, आमदार, खासदार, जिल्हाध्यक्ष यांच्यासह, युवक काँग्रेस, महिला काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाच्या भ्रष्ट कारभाराची पोलखोल केली होती. मतदार याद्यांमध्ये घोटाळे करून सत्ताधारी भाजपाला फायदा होईल असे काम त्यांनी केले आहे. राहुल गांधी यांनी पुराव्यासह निवडणूक आयोगाच्या कारभाराची लक्तरे वेशीवर टांगली होती. त्यानंतर दोन निवडणूक आयुक्तांनीच लेखी आक्षेप घेऊन ज्ञानेशकुमारांचा भ्रष्ट कारभार उघड केला आहे, त्यामुळे राहुल गांधी यांनी केलेल्या पोलखोलवर शिक्कामोर्तब झाले आहे. ज्ञानेशकुमार हे भाजपा सरकारच्या हाताखालचे बाहुले बनून मनमानी कारभार करत आहेत. ज्ञानेशकुमार यांच्या भ्रष्ट कारभारामुळे निवडणूक आयोगाची विश्वासार्हता धोक्यात आली असून लोकशाही व संविधानाची पायमल्ली केली आहे. एसआयआरच्या माध्यमातून देशभरातील १३ कोटी मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत. ज्ञानेशकुमार हे पदावर राहणे लोकशाहीसाठी घातक आहे, असा आरोप काँग्रेस पक्षाने केला आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांना पदावरून हटवून त्यांच्यावर कठोर कारवाई केली जात नाही तोपर्यंत काँग्रेसचा लढा थांबणार नाही, हे आंदोलन आणखी तीव्र केले जाईल, असा इशाराही काँग्रेस पक्षाने यावेळी दिला.
Marathi e-Batmya