शालेय शिक्षण अभ्यासक्रमात लवकरच कृषी विषयाचा समावेश होणार शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांच्यासोबतच्या बैठकीनंतर कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांची माहिती

कृषी विषयाचा समावेश शालेय शिक्षणाच्या अभ्यासक्रमात करण्याबाबतचा प्राथमिक अहवाल आज शिक्षण विभागाने स्वीकारला आहे. याबाबत तज्ज्ञांची समिती नेमून अभ्यासक्रमाचा आराखडा निश्चित केला जाणार असल्याची माहिती कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली.

यासंदर्भातील अहवाल आज मंत्री सत्तार यांनी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याकडे सुपूर्द केला. कृषी केंद्रीत आशयामुळे शेतीचे अध्ययन होईल. शेतीकडे विद्यार्थ्यांचा ओढा वाढेल तसेच शेती व शेती व्यवसाय करणाऱ्यांबद्दल जाणीव व संवेदनशीलता निर्माण होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त केला.

यावेळी मंत्री सत्तार म्हणाले की, शालेय विद्यार्थ्यांना लहानपणापासून शेतीविषयक ज्ञान मिळाले तर पुढील जीवनात त्यांना त्याचे महत्व निश्चितच समजण्यास उपयुक्त ठरणार आहे. कृषी शिक्षणविषयक एकात्मिक आराखडा तयार करताना इयत्ता पहिली ते पाचवी, सहावी ते आठवी आणि नववी ते दहावी अशा पद्धतीने अभ्यासक्रम ठेवावा. कृषी विषयक प्रशिक्षणासाठी जे जे साहित्य आणि मदत लागेल, ते उपलब्ध करुन देण्याची तयारी कृषी विभागाची भूमिका असल्याचे सांगितले.

शालेय अभ्यासक्रमातील इतर सर्व विषयांच्या सहसंबंधातून शेतीचे महत्व, उपयोजना, व्यवसाय संधी, शेतीविषयक जाणीव अशा अनेक पैलूंकडे लक्ष केंद्रित करुन विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधणे शक्य होईल, असा विश्वास मंत्री सत्तार यांनी व्यक्त केला.

मंत्री केसरकर म्हणाले की, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन परिषद आणि कृषी परिषद यांनी तज्ज्ञांची समिती नेमून अभ्यासक्रमाचा आराखडा तयार करावा. अभ्यासक्रमाची रचना करताना विद्यार्थ्यांना संबंधित विषयाबद्दल रुची निर्माण होईल, या पद्धतीने असावी.

यावेळी कृषी विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओल, शालेय शिक्षण विभागाचे सहसचिव ई. मु. काझी, सहसचिव (कृषि) बाळासाहेब रासकर, कृषी आयुक्त सुनील चव्हाण, महाराष्ट्र राज्य कृषी परिषदेचे महासंचालक रावसाहेब भागडे, कृषी संचालक (शिक्षण) प्रा. डॉ. उत्तम कदम, संचालक (संशोधन) डॉ. हरिहर कौसडीकर, अवर सचिव उमेश चांदिवडे आदींची यावेळी उपस्थिती होती.

About Editor

Check Also

दत्तात्रय भरणे यांचे निर्देश, भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेत द्राक्ष पिकाचा समावेश द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा

राज्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळावा यासाठी द्राक्ष शेतीचा भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेमध्ये समावेश …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *