राहुल गांधी यांची मागणी, हल्दवानी प्रकरणी अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करा काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी भाषण केलेल्या जागेच्या शुद्धीकरण प्रश्नी राहुल गांधी यांची मागणी

हल्दवानी येथे काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या रॅलीच्या ठिकाणी कथित ‘शुद्धीकरण’ विधीवरून निर्माण झालेला वाद आता राजकीय आरोप-प्रत्यारोपाच्या वळणावर पोहोचला आहे. काँग्रेसने दलितांविरुद्धच्या भेदभावावरून भाजपावर आरोप सुरु केले आहेत.

काँग्रेस नेते विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी या घटनेस जबाबदार असलेल्यांविरुद्ध ‘अनुसूचित जाती/जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्या’ (SC/ST Act) अंतर्गत गुन्हा (FIR) दाखल करण्याची मागणी केल्यानंतर हा संघर्ष अधिकच वाढला. याला प्रत्युत्तर देताना भाजपने राहुल गांधी आणि काँग्रेसवर “दलित-विरोधी आणि सामंतवादी” मानसिकतेचा आरोप केला.

शनिवारी काँग्रेस मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना राहुल गांधी म्हणाले की, हा कथित विधी म्हणजे अस्पृश्यता पाळण्यासारखेच असून त्यातून “भाजप-आरएसएसची मानसिकता” दिसून येते. घटनेनंतर २० दिवस उलटूनही कोणतीही कारवाई करण्यात आली नाही, असा आरोपही यावेळी केला.

राहुल गांधी पुढे बोलताना म्हणाले की, ही घटना भाजप-आरएसएसच्या लोकांची मानसिकता दर्शवते, जे अजूनही अस्पृश्यता पाळतात. त्यांना दलितांनी प्रगती करावी, सन्मानाने जगावे आणि यशस्वी व्हावे, असे वाटत नाही असा आरोपही यावेळी केला.

राहुल गांधी यावेळी म्हणाले की, जबाबदार व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला जाईल याची खात्री करावी, अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली.

राहुल गांधी यांनी उत्तराखंड भाजपचे अध्यक्ष महेंद्र भट्ट यांच्यावरही या विधीचे समर्थन केल्याचा आरोप केला आणि मोदींच्या मौनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

राहुल गांधी म्हणाले की, पंतप्रधान मोदी म्हणतात की ते सर्व जातींचे आहेत आणि देशाचे पंतप्रधान आहेत, परंतु उत्तराखंडमधील त्यांचेच पक्षप्रमुख ‘शुद्धीकरणा’चे समर्थन करतात. केंद्र आणि उत्तराखंडमधील भाजप सरकारांनी कारवाई केली नाही, तरीही काँग्रेस जबाबदार व्यक्तींविरुद्ध कारवाईसाठी पाठपुरावा करेल, असा इशाराही दिला.

तसेच, २०२४ च्या वायनाड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी प्रियंका गांधी वाड्रा यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला तेव्हा मल्लिकार्जून खर्गे त्या खोलीत का उपस्थित नव्हते, असा प्रश्नही पक्षाने उपस्थित केला. डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या वारशाचा सन्मान करण्यासाठी गेल्या १२ वर्षांत आपल्या सरकारने उचललेल्या पावलांचा हवाला देत, भाजपने म्हटले की त्यांना दलितांप्रती असलेली आपली कटिबद्धता काँग्रेसला सिद्ध करण्याची गरज नाही.

८ ऑगस्ट रोजी हल्द्वानी येथे काँग्रेसच्या एका रॅलीला मल्लिकार्जून खर्गे यांनी संबोधित केले होते. आपण दलित असल्यामुळे, त्यानंतर दोन दिवसांनी त्याच ठिकाणी भाजप-आरएसएसच्या कार्यकर्त्यांनी ‘शुद्धीकरण’ विधी केला.

१३ ऑगस्ट रोजी मल्लिकार्जून खर्गे यांनी संसदेत हा मुद्दा उपस्थित केला. काँग्रेसने या विधीचे वर्णन ‘अस्पृश्यतेचे कृत्य’ असे केले आणि अनुसूचित जाती/जमाती (SC/ST) कायद्यांतर्गत कारवाई करण्याची मागणी केली.

मल्लिकार्जून खर्गे पुढे म्हणावे की, त्यावेळी तिथे लाखो लोक उपस्थित होते. मी कोणत्याही समुदायाचे किंवा धर्माचे नाव घेतले नाही. मी केवळ तिथल्या लोकांना भेडसावणाऱ्या समस्यांबद्दल बोललो. पण माझ्या भाषणानंतर भाजप कार्यकर्त्यांनी हवन केले, असा आरोपही यावेळी केला.

काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी म्हटले की, या विधीचे वर्णन ‘शुद्धीकरण’ किंवा ‘सफाई’ असे केल्याने त्या कृतीचे स्वरूप बदलत नाही. एखाद्या प्रमुख दलित नेत्याच्या उपस्थितीनंतर ‘शुद्धीकरणाचा’ विधी करणे ही अस्पृश्यता पाळणारी कृती असल्याचे म्हटले.

तर काँग्रेस नेते जयराम रमेश म्हणाले की, भाजपशासित राज्यांमध्ये अशा घटना वारंवार घडतात, कारण यात सामील असलेल्यांना वरिष्ठ नेतृत्वाचा पाठिंबा असतो, वरिष्ठांचा पाठिंबा असल्याशिवाय अशी हिंमत होत नाही. अन्यथा, भाजपशासित राज्यांमध्ये अशा घटना वारंवार घडण्याचे कारण काय?” असा सवालही यावेळी उपस्थित केला.

About Editor

Check Also

एफएसएसएआयची एव्हरेस्ट मसाले आणि लालजी गोधूला नोटीस उत्पादने निकृष्ट दर्जाची आढळल्याने तात्पुरती बंदी घातली

प्रयोगशाळेतील चाचण्यांमध्ये उत्पादने निकृष्ट दर्जाची आढळल्यानंतर, भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (FSSAI) एव्हरेस्ट फूड …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *