‘हनुमान चालीसा’ म्हणण्याऐवजी ‘विकासाची संजीवनी’ लोकांपर्यंत पोचवा सरकार अस्थिर करण्यासाठी कितीही प्रयत्न करा... उलट भक्कम आहे-महेश तपासे

राज्यातील व देशातील महत्त्वाच्या प्रश्नांवर बोलायचं नाही… तर दुसरीकडे जातीय तेढ निर्माण करुन महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न भाजपाचे लोकप्रतिनिधी करत आहेत. मात्र हे सरकार अस्थिर होणार नाही तर ते अधिक भक्कम होईल असा स्पष्ट इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी दिला.
भाजपा पुरस्कृत खासदार नवनीत राणा आणि आमदार रवि राणा यांनी आज मुंबईत येवून उद्या सकाळी मातोश्री समोर जावून हनुमान चालिसा म्हणणार असल्याचा इशारा दिला. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांनी वरील इशारा दिला.
भाजपाचे लोकप्रतिनिधी जनतेच्या प्रश्नाकडे लक्ष देण्याऐवजी नको ते उद्योग करत आहेत. त्यातच भाजपा खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांनी हनुमान चालीसा पठणाचा कार्यक्रम घेतला आहे. हनुमान चालीसा म्हणण्याऐवजी विकासाची संजीवनी लोकांपर्यंत पोचवा अशी जोरदार टीकाही त्यांनी यावेळी केली.
मातोश्रीबाहेर हनुमान चालीसा म्हणण्याचे भाजप खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांनी जाहीर केले होते. वास्तविक हे लोकप्रतिनिधींचे काम आहे का? असा सवालही त्यांनी केला.
मुळात लोकप्रतिनिधींनी आपल्या मतदारसंघात विकासकामे व त्यासाठी निधी उपलब्ध करून द्यायचा असतो. मात्र भाजपाच्या विचाराने प्रेरित लोकप्रतिनिधींना जनतेच्या विकासकामांमध्ये रस नाही. त्यांना राज्यातील सरकार अस्थिर कसं होईल, धार्मिक व जातीय तेढ कशी निर्माण करता येईल यामध्ये जास्त रस आहे असा आरोपही त्यांनी केला.
वीजनिर्मितीसाठी लागणार्‍या कोळशाचे संकट देशातील सात ते आठ राज्यात आहे त्यात महाराष्ट्र आहे. भाजपच्या लोकप्रतिनिधींनी अतिरिक्त कोळसा मिळावा यासाठी आणि महागाईवर पंतप्रधानांवर दबाव आणायला हवा होता. कोळशाचे व वाढत्या महागाईचे नियोजन मोदी सरकारने का केले नाही याची विचारणा करायला हवी होती मात्र दुर्दैवाने भाजपाचे लोकप्रतिनिधी हेच प्रश्न विचारताना दिसत नाहीत असेही ते म्हणाले.

About Editor

Check Also

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम • १७, १८ आणि २४, २५ ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर विशेष शिबिरे • दावे-हरकतींसाठी २६ ऑक्टोबरपर्यंत मुदत

राज्यातील एकाही पात्र मतदाराचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या उद्देशाने मुख्य …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *