भाजपाचा चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका, काँग्रेसचा जाहीरनामा फसवा काँग्रेसने योजनांचे बजेट सांगावे

काँग्रेससह महाविकास आघाडीचा जाहीरनामा फसवा असून त्यावर कुणीही विश्वास ठेवणार नाही. मतांच्या लागूंलचालनाकरीता काँग्रेस खोटारडेपणा करीत असल्याची टीका भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली असून, काँग्रेसच्या रक्तात विकास नाही, असेही ते म्हणाले.

नागपूर येथे ते माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी योजनांच्या विरोधात भूमिका घेतली. काँग्रेसचे लोकही लाडकी बहिण योजनेच्या विरोधात न्यायालयात गेले. अशा योजना परवडत नाही अशी थेट भूमिका विजय वडेट्टीवार यांनी घेतली. आता तेच योजनेतून तीन हजार रूपये देणार असे सांगत नवी योजना आणत आहेत, या योजनेसाठी पैसा कसा आणणार हे काँग्रेसने जाहीर करावे. दुसरीकडे भाजपा-महायुती आणि केंद्रातील मोदीजींचे डबल इंजिन सरकार असल्याने योजनांचे बजेट तयार आहे. विकासकामांसाठी केंद्र सरकार आणि योजनेसाठी महायुती सरकार पैसा देणार.
काँग्रेस अध्यक्ष खर्गे यांच्या टीकेचा समाचार घेताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, कुणाचा पायगुण चांगला हे हरियाणाच्या निकालावरून संपूर्ण देशाने पाहिले. राहुल गांधींचा पायगुण चांगला नाही. देशाच्या विकासासाठी मोदीजी सत्तेत आले म्हणूनच ते युगपुरुष ठरले, असा विश्वास व्यक्त केला.

 महाराष्ट्राची जनता महायुतीच्या बाजुने

संघात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो नसल्याच्या खर्गे यांच्या वक्तव्यावर टोला लगावत चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, खर्गे संघ मुख्यालयात आले नाही, त्यांच्याकडे दुर्बीण आहे का? त्यांनी एकदा संघ कार्यालयात यावे व काय आहे ते प्रत्यक्ष पहावे. मनोज जरांगे यांची मागणी सामाजिक असून सरकार त्यांच्या मागण्यांची जबाबदारी नक्की घेईल, असे स्पष्ट करत शरद पवारांचा अनुभव मोठा असला तरी महाराष्ट्राची जनता महायुतीच्या बाजुने असल्याचा विश्वास व्यक्त केला.

 बेसा-पिपळा भागात प्रचार

कामठी मतदारसंघातील भाजपा-महायुती उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे यांनी रविवार, १० नोव्हेंबर रोजी सायंकाळी बेसा-पिपळा नगर पंचायत क्षेत्रात प्रचार केला. वस्त्यांमध्ये नागरिकांच्या भेटी घेत त्यांनी संवाद साधला. कामठी – मौदा विधानसभा मतदारसंघाचे सर्वांगिण विकासासाठी पुन्हा एकदा लोकप्रतिनिधी म्हणून संधी देण्याची विनंती केली. नागरिकांनी त्यांचे उत्साहात स्वागत केले व अनेक महिलांनी त्यांचे औक्षण केले. यावेळी त्यांच्यासोबत अजय बोढारे, सुनील कोडे, नरेश भोयर, वैशाली भोयर, प्रभू भेंडे, मुकुल उपासने, सोनाली परमार, धनंजय झाडे, उमेश भोयर, अनिकेत चौधरी, मदन मालव, मिथिलेश राय, निखिल भोयर, किरण बोढारे यांच्यासह मोठ्या संख्येने भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

About Editor

Check Also

हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी, धर्मेंद्र प्रधानांसह रॅकेटमधील सर्वांना कठोर शिक्षा करा नीट प्रकरणी संसदेत चर्चा, विद्यार्थ्यांवरील गुन्हे रद्द करणे व पंतप्रधानांनी माफी मागेपर्यंत काँग्रेसचा लढा सुरुच राहणार

नीट पेपर फुटीप्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला असला तरी अद्याप हा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *