पुण्यातील प्रसिद्ध दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात वेळेत उपचार न मिळाल्याने एका गर्भवती महिलेला प्राण गमवावे लागले ही घटना समोर आल्यानंतर विविध पक्ष संघटनांनी दीनानाथ रुग्णालय प्रशासनाच्या विरोधात आंदोलने केली. भाजपाच्या महिला मोर्चाने देखील रुग्णालयाच्या विरोधात आक्रमक आंदोलन करताना एका क्लिनिकची तोडफोड केली. या प्रकारामुळे खासदार मेधा कुलकर्णी यांनी या आंदोलनाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तर भाजपाचे शहराध्यक्ष असलेल्या धीरज घाटे यांनी आंदोलनकर्त्या महिलांची भूमिका योग्यच असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे या आंदोलनावरून भाजपामध्ये ठिणगी पडल्याचे दिसते.
या प्रकारावरून खासदार मेधा कुलकर्णी यांनी शहराध्यक्ष धीरज घाटे यांना पत्र पाठवून कुठल्यातरी सोम्या गोम्या, अर्ध्या हळकुंडाने पिवळ्या झालेल्या कार्यकर्त्यांनी कायदा हातात घेण्याचे काम नाही. शिवाय डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्या वडिलांच्या हॉस्पिटलचा या घटनेशी काहीही संबंध नसताना केलेल्या मोडतोडीचे उर्मट कृत्य अनेकांच्या जिव्हारी लागले आहे. या संदर्भात सातत्याने परिसरातील नागरिकांचे नाराजीचे फोनही मला येत आहेत. दिल्लीतील अधिवेशनातून परत आज आल्यावर मी याविषयी अनेकांकडून माहिती घेतली. पक्षाची प्रतिमा, व्यक्तीची राजकीय प्रतिमा या सर्व गोष्टी बनवण्यासाठी वेळ लागतो. परंतु अशा काही गोष्टींमुळे प्रतिमा डागाळली जाते व त्याचा परिणाम सर्वांनाच भोगावा लागतो. शिवाय वडाचे तेल वांग्यावर काढल्यामुळे विनाकारण एखाद्या व्यक्तीचे एखाद्या समूहाचे, किंवा विशिष्ट समाजाचेही कायमस्वरूपी नुकसान होऊ शकते, असे या पत्रात त्यांनी म्हटले आहे.
यावर भाजपा शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी प्रत्युत्तरादाखल म्हटले आहे की, कोणतंही पत्र माझ्यापर्यंत आलेले नाही. ते मी वाचलेले नाही. प्रसार माध्यमांच्या माध्यमातून ही माहिती मला मिळाली. त्यामुळे जे पत्र मला मिळाले नाही, जे पत्र मी वाचलं नाही, त्याबाबत अधिक बोलणे योग्य ठरणार नाही. मंगेशकर रुग्णालयामध्ये जी दुर्घटना घडली त्यानंतर जी प्रतिक्रिया आली ती स्वाभाविक होती. या घटनेच्या निषेधार्थ अनेक संघटनांनी आणि पक्षांनी आंदोलने केली. भाजपच्या महिला मोर्चाने केलेले आंदोलन देखील स्वाभाविक प्रतिक्रिया होती. त्या आंदोलनात काही गैर नव्हते.असे स्पष्ट केले आहे त्यामुळे भाजपामध्ये या आंदोलनावरून ठिनगी पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
एका महिले संदर्भात ही घटना घडली असल्याने महिलांचे नेतृत्व करणाऱ्या आमच्या पक्षाच्या महिला मोर्चाच्या हर्षदा फरांदे आणि त्यांच्या टीमने केलेल्या आंदोलन स्वाभाविक होते. त्यात काही चुकीचे होते, असे मला वाटत नाही. या प्रकरणांमध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील योग्य ती भूमिका घेतली आहे. मी देखील भाजपचा शहर अध्यक्ष म्हणून रुग्णालयाच्या प्रशासनाशी बोललो आहे. यापूर्वी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या माध्यमातून अनेक रुग्णांचे चांगले उपचार झालेले आहेत. रुग्णालयाने चांगले काम देखील केलेले आहे. मात्र, ही झालेली घटना ही दुर्दैवी असल्याने त्या विरोधात निषेध करणं चुकीचे नसल्याचे धीरज घाटे यांनी सांगितले.
खासदार मेधा कुलकर्णी यांचे पत्र माध्यमांमार्फत मला समजले. आमच्या पक्षाची एक चौकट आहे. पक्षाचे स्थानिक नेते आहेत, पदाधिकारी आहेत, पुण्यामध्ये पक्षाचे नेतृत्व करणारी चार जणांची टीम आहे. खासदार आमदार, मंत्री अशी सर्वच लोक पुण्यामध्ये आहेत. त्यामुळे पक्षाच्या सर्व नेते मंडळींनी एकत्रित बसून आपले काही मत असेल तर ते बैठकीमध्ये मांडले पाहिजे. असे माध्यमांमध्ये एखाद्या गोष्टीवर रियाक्ट होणे आणि त्याची चर्चा होणे हे सोयीचे नसल्याचे धीरज घाटे यांनी म्हटले असून खासदार मेधा कुलकर्णी यांना चांगलेच ठणकावले आहे.
Marathi e-Batmya