उध्दव ठाकरेंचा राजला टोला, जशी स्क्रिप्ट तशे वाचन… मी तर त्या बाबत पूर्वीच एका चित्रपटाचा संदर्भ देत स्पष्ट केले होते...

गुढी पाडव्या निमित्त आयोजित मनसैनिकांच्या मेळाव्यात मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी १८ वर्षापूर्वीचा किस्सा सांगताना शिवसेना सोडण्यामागे उध्दव ठाकरे हेच कारणीभूत असल्याचा ठपका ठेवत नारायण राणे यांच्याबाबतही तेच कारणीभूत असल्याचा आरोप केला. त्यामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा या मुद्यावरून चर्चेला सुरुवात झाली. अर्थसंकल्पिय अधिवेशनात मराठी भाषा भवन इमारतीच्या अनुषंगाने उध्दव ठाकरे हे विधान भवन परिसरात आले यावेळी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी राज ठाकरे यांनी केलेल्या आरोपाबाबत बोलताना उध्दव ठाकरे म्हणाले, त्या घटनेबाबत मी मागील वर्षी १४ मे रोजी बीकेसीतील मैदानावर झालेल्या सभेत एक चित्रपटाचा संदर्भ देत त्यावर भाष्य केले आहे. त्यामुळे त्यावर अधिक बोलण्याची गरज मला वाटत नाही. याशिवाय जशी स्क्रिप्ट आली असेल तशी वाचली असेल असा खोचक टोलाही राज ठाकरे यांना लगावला.

दादर येथील शिवाजी पार्क येथील पाडव्याच्या मनसे मेळाव्यात राज ठाकरेंनी आपल्या भाषणातून ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला होता. तसेच, शिवसेनेतून आपल्याला बाहेर पडण्यासाठी जाणूनबुजून प्रयत्न केले गेल्याचंही राज ठाकरे यावेळी म्हणाले. उद्धव ठाकरेंसोबत ओबेरॉयमध्ये झालेल्या भेटीचाही राज ठाकरेंनी यावेळी उल्लेख केला. राज ठाकरेंनी शिवसेना सोडण्यापूर्वी उद्धव ठाकरेंशी पक्षप्रमुख पदाबाबत झालेल्या चर्चेचा प्रसंग यावेळी भाषणात सांगितला. “मला बाजूला सारण्याचा प्रयत्न होत होता हे मला कळत होतं. मी एकदा उद्धवकडे गेलो आणि त्याला म्हटलं गाडीत बस आपल्याला बाहेर जायचंय. आम्ही ओबेरॉय हॉटेलमध्ये गेलो. मी त्याला समोर बसवलं. मी त्याला विचारलं बोल तुला काय हवंय? तुला पक्षप्रमुख व्हायचंय, हो. सत्ता आली तर मुख्यमंत्री व्हायचंय, हो. पण फक्त मला सांग माझं काम काय आहे? मला फक्त प्रचारासाठी बाहेर काढू नका. एरवी घरात ठेवायचं आणि प्रचाराला बाहेर काढायचं. मी प्रचार केल्यानंतर निवडून आलेल्या लोकांनी जबाबदारी सांभाळायची नाही. पुढच्या वेळी प्रचाराला जायचं. काय तोंड दाखवू त्यांना. मला उद्धव म्हणाला मला काही प्रॉब्लेम नाही, असं राज ठाकरेंनी सांगितले.

तिथून आम्ही घरी आलो. बाळासाहेब ठाकरे झोपले होते. मी त्यांना उठवलं आणि त्यांना सांगितलं की सगळा प्रॉब्लेम मी सॉल्व्ह केला. म्हणाले काय झालं? मी म्हटलं मी उद्धवशी बोललो. हे सगळं बोलणं झालं. सगळं मिटलं. त्यांनी मला मिठी मारली. मला म्हणाले उद्धवला बोलव. मी बोलावणं पाठवलं तर म्हणे येतायत. बाळासाहेब अधीर झाले होते. थोड्या वेळाने म्हणाले कुठे आहे उद्धव. मी परत बाहेर गेलो, तर मला तिकडे सांगितलं की ते बाहेर निघून गेले. या सगळ्या गोष्टी एवढ्यासाठी चालल्या होत्या की मी बाहेर कधी जातोय. त्रास देऊन ही माणसं बाहेर कशी टाकता येतील, असा दावा राज ठाकरेंनी आपल्या भाषणात केला होता.

दरम्यान, आज उद्धव ठाकरे विधानभवनात आले असता माध्यमांनी त्यांना राज ठाकरेंच्या आरोपांविषयी विचारणा केली. तेव्हा उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंच्या आरोपावर खोचक टोला लगावला. यावेळी बोलताना उध्दव ठाकरे म्हणाले, गेल्या १८ वर्षांत तीच रेकॉर्ड घासून-पुसून झाली आहे. गेल्या वर्षी १४ मे ला वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये झालेल्या सभेत मी माझं मत मांडलं होतं. तेव्हा मी एका चित्रपटाचा दाखला दिला होता. त्याच चित्रपटाचा दाखला तुम्ही बघू शकता, असं उद्धव ठाकरे म्हणाले. मात्र, यावेळी त्यांनी त्या चित्रपटाचा उल्लेख मात्र केला नाही.

यावेळी राज ठाकरेंनी माहिमच्या समुद्रात बांधकाम करण्यात आलेल्या मजारचा मुद्दा आपल्या भाषणात घेतला होता. त्यावर आज सकाळी पालिकेकडून कारवाई करण्यात आली. त्यावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, ते बांधकाम काही नवीन नव्हतं. त्याच्या आधीही तिथे इतर पक्षांचे आमदार होते, त्यांच्याही पक्षाचे आमदार-नगरसेवक होते. त्याच्या आधीपासूनचं ते बांधकाम होतं असे स्पष्ट केले.

तसेच पुढे बोलताना उध्दव ठाकरे म्हणाले, ठीक आहे. जशी स्क्रिप्ट आली असेल, तसं त्यांनी वाचलं असेल. नाहीतर एवढी वर्षे कारवाई होत नाही आणि आता तातडीने कारवाई होत असेल तर मग राज्यात असणाऱ्या अशा अनेक गोष्टी त्यांना कळवा. ते पत्र लिहितील आणि कारवाई होईल, असा खोचक टोलाही उद्धव ठाकरेंनी लगावला.

About Editor

Check Also

The Thackeray brothers will march in Mumbai today in protest against the ECI.

Thackeray brothers : आज मुंबईत निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा, ठाकरे बंधू नेतृत्व करणार

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना (यूबीटी) नेते उद्धव ठाकरे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *