प्रताप सरनाईक यांची माहिती, अवैध पार्सल वाहतूक करणाऱ्या खासगी बस चालकांवर परवाना निलंबनाची कारवाई वायू वेग पथकामार्फत नियमित तपासणी

राज्यात खासगी प्रवासी बसेस चालक मालकांनी  बसमधून कुरिअर पार्सल अथवा अवैध माल वाहतूक केल्यास त्यांच्यावर परवाना निलंबनाची कारवाई करण्यात येईल, असे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासावेळी सांगितले.

सदस्य शंकर जगताप यांनी विधानसभेत याविषयी प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाच्या चर्चेत सदस्य भास्कर जाधव, सुनील प्रभू आणि सिद्धार्थ शितोळे यांनी उपप्रश्न विचारत सहभाग घेतला.

मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले की, राज्यात मालवाहतूक करणाऱ्या खासगी प्रवासी बसेस संवर्गातील सर्व वाहनांची वायू वेग पथकामार्फत नियमित तपासणी करुन दोषींवर कारवाई केली जाते. मात्र, यापुढे वारंवार नियमांचे उल्लंघन  करणाऱ्या दोषी वाहन चालक आणि मालकांवर थेट  मोटार वाहन अधिनियम १९८८ च्या कलम ८६ नुसार कारवाई करण्यात येणार येणार आहे. यापुढे पहिल्या उल्लंघनासाठी ७ ते १० दिवस, दुसऱ्या उल्लंघनासाठी १० ते १५ दिवस, तिसऱ्यांदा उल्लंघन केल्यास १५ ते ३० दिवस आणि  चौथ्यांदा उल्लंघन केल्यास  परवाना थेट रद्द केला जाईल.

मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले की, वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कडक कारवाई केली जात असून वायू वेग पथकामार्फत २०२५- २०२६ मध्ये मालवाहतूक करणाऱ्या खाजगी प्रवासी बसेस संवर्गातील ५,७२८ दोषी वाहनांवर  कारवाई केली आहे. ४६१.७८ लाख इतका दंड वसूल केला आहे.  तसेच १ एप्रिल ते ३१ मे २०२६ पर्यंत १४५४ दोषी वाहनांवर कारवाई केली असून ७८.१८ लाख इतका दंड वसूल करण्यात आला आहे.

पुढे बोलताना प्रताप सरनाईक म्हणाले की, राज्यातील अनेक महानगरपालिकांच्या हद्दीत राष्ट्रीय महामार्गावरील पदपथांवर अनधिकृतपणे बसेस थांबवल्या जाऊ नयेत यासाठी  या जागेच्या मालकी हक्काबाबत महापालिकांकडून माहिती मागवण्यात आली असून भविष्यातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी  महानगरपालिकांना अधिकृत बस थांबे तयार करण्यासंदर्भात कळविण्यात आले असल्याचे सांगितले.

शेवटी बोलताना मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले की, महाराष्ट्र राज्य एसटी परिवहन महामंडळाने ८३०० बसेस घेतल्या असल्याने सध्या एसटी बसेसची कमतरता नाही. लोकप्रतिनिधींनी त्यांच्या विभागासाठी अधिकच्या एसटी बसेसची मागणी केल्यास त्यांनाही त्या उपलब्ध करून दिल्या जातील असेही म्हणाले.

 

About Editor

Check Also

जयंत पाटील यांचा टोला, तुम्हाला १२ वर्षात जे करता आलं नाही, ते आम्ही तुमच्या आधी केलं सत्ताधाऱ्यांना टोले लागवत आणि चिमटे काढत जयंत पाटील यांनी कर्जमाफी योजनेची हवाच काढली !

२०१४ पर्यंत तत्कालीन राज्य शासनाने तिजोरीतून एकदाही कर्जमाफी केली नाही असे सत्ताधारी म्हणतात. २००८ मध्ये …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *